समाजभुषण 2
समाजाला भुषण ठरलेल्या तेजोमय व्यक्तींचे प्रेरक जीवनदर्शन घडविणारे “समाजभुषण 2″ हे पुस्तक वाचून मन उल्हसित झाले याबद्दल मला लेखिका सौ रश्मी हेडे यांचे प्रथम अभिनंदन केले पाहिजे !
या पुस्तकात समाजाला भूषण असे तेजोमय हिरे असल्याचे नमुद करून एक नव्हे तर 37 अष्टपैलू व्यक्तिमत्वांचा सुरेख जीवनपट साकारला गेला आहे. ज्या गुणांनी या प्रेरणादायी व्यक्तींनी यशाचे शिखर जिद्दीने आणि दृढ इच्छाशक्तीच्या बळावर गाठले त्याचा प्रत्यक्ष भेटून सुरेख परिचय केला गेला आहे. अनेकांनी खडतर परिस्थितीवर मात करून हे यश मिळविले आहे ते भावी पिढीला नेहेमीच प्रेरणादायी, उद्बोधक, आदर्श्ववत ठरेल यात कसलीही शंका नाही़ !
या पुस्तकात काय नाही ? सुमारे 37 अतिशय कर्तबगार समाजभुषणांचा जीवन परिचयासह कर्तृत्वाचा आलेख अतिशय सुरेखपणे रश्मीजींनी रेखाटला आहे .
पहिलाच लेख दानशूर उद्योजक भाऊ खुटाळे यांच्यावर असून त्यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाचा, सुसंस्कृतपणाचा छान पैकी परिचय करून दिला आहे.
अमेरिकेत मराठी झेंडा फडकविणा-या ऋतुजा इंदापुरे यांचा जीवनपट नव्या पिढीला उपयुक्त ठरणार आहे. बीए झाल्यावर एल् एल् बी परिक्षेत प्राविण्य व स्काँलरशिप मिळवून इंग्लंड मधील मास्टर्स ‘ इन इंटरनॅशनल कमर्शियल लाँ ” पूर्ण केले, विवाहानंतर अमेरिकेत स्थायिक होऊन आता त्या काँस्को कंपनीत मॅनेजर आहेत. याखेरीज ऋतुजा वाँशिंग्टन राज्याच्या स्टेट वुमन्स कमिशनच्या अध्यक्ष आहेत तसेच अनेक सामाजिक संघटनेत त्या सक्रीय आहेत.
आणखी एक देवश्री देवेंद्र भुजबळ मुंबईत सात वर्षे पूर्ण इंग्रजी पत्रकारिता केल्यानंतर अमेरिकेतील अत्यंत प्रख्यात असलेल्या न्यूयॉर्क स्थित कोलंबिया विद्यापीठात युनिव्हर्सिटी मध्ये ‘मास्टर्स इन जर्नालिझमची’पदवी सुवर्ण पदक-प्राविण्य संपादन करून प्राप्त केली आहे (अर्थात हा लेख वरील अभ्यासक्रम करतांना रश्मीजींनी लिहिला आहे. तिच्या पदवीदान समारंभात पिताश्री देवेंद्रजी आणि मातोश्री अलकाताई भुजबळ अमेरिकेत जातीने उपस्थित होते)
ही देवश्री अवघ्या सव्वा वर्षाची असताना तिने 14 दिवस चाललेल्या राष्ट्रीय हिमालय पदभ्रमण 12428 उंचीवर यशस्वीरीत्या पूर्ण करून एक विश्वविक्रम केला आहे हे वाचून तर तिच्या या धाडसाचे कौतुकच केले पाहिजे.
खडतर परिस्थितीवर मात करून चार्टर्ड अकाऊंटंट झालेले, धाकटा भावांना पुढे आणणारे, समाजहितदक्ष दादासाहेब नारायणराव यांनी जवकर यांच्या कार्याचा परिचय त्यांचे बंधू दीपक जवकर यांनी करून दिल्याचा लेखही या पुस्तकात आहे.
असे घडले लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे यांचा धाडसी जीवनपरिचय छानपैकी दिला आहे तो तरुणांना निश्चितच स्फुर्तीदायक आहे.
इतिहास घेऊन एम्.ए. झालेल्या आधुनिक हिरकणी प्रिती डुडुलकर यांचा धडाडीचा प्रवास अतिशय वाचनीय आहे. सात वर्षे पोलिस उप निरीक्षकाचे काम करून पुन्हा एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या घर ,मूलबाळ सांभाळत तहसीलदार झाल्या.प्रचंड इच्छाशक्ती, सकारात्मक विचारसरणी, जिद्द, चिकाटी आणि प्रेमळ स्वभाव अशा सर्व गुण संपन्न प्रितीताई सर्व तरुणींसाठी आदर्श, प्रेरणादायी ठरल्या आहेत.
तर राज्य सरकारच्या गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार प्राप्त झालेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रकांत हलगे यांचा जीवनपट तेवढाच मनोज्ञ आहे.
नशिबाला दोष न देता जिद्दीने आपले भविष्य उज्ज्वल करणारी महिला म्हणजे सौ. प्रांजली बारस्कर! त्या शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त आहेत. या उच्चपदी कार्यरत असल्याने कौशल्य, रोजगार, विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाची जबाबदारी चोख बजावतात. प्रांजलीताईंचे जीवन खडतर, त्या पाच वर्षाच्या असतांना आईचा मृत्यू, नंतर पुढे लहान बहिणीचा मृत्यू अशा दुर्दैवाच्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिले आहे. विशेष म्हणजे जुळ्या मुली झाल्या असताना एमपीएसीच्या स्पर्धा परिक्षेत उतीर्ण होऊन त्या क्लास वन अधिकारी झाल्या हे कौतुकास्पद आहे. आपल्या कुटुंबातील मंडळीसह आजोबांच्या नावाने त्यांनी ‘आनंदवड’ संस्था स्थापन केली. जेष्ठांना या संस्थेच्या माध्यमातून मदत केली जात असते, आपले नशीब आपणच घडवायचे असते हेच प्रांजलीताईंच्या जीवनातून प्रेरणा घेणारे आहे, ही यशकथा रश्मीजींनी सुरेखपणे साकारलेली आहे .
पत्रकारितेत अनेक पुरस्कार मिळविणारे, सत्तरी पार केलेल्या श्री प्रकाश कथले यांची प्रेरक कथा स्वतः देवेंद्र भुजबळ यांनी कथन केली आहे. त्यांनी लिहिलेल्या लेखाचा समावेश रश्मी हेडे यांनी या पुस्तकात समाविष्ट केला आहे. मुंबईत झालेल्या समारंभात मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशजींना जीवन गौरव पुरस्कार यावर्षीच मिळाला त्यांचे कार्याचा आदर्श तरुण पत्रकारांना निश्चित मार्गदर्शक ठरेल.
स्रीशक्तीचे ज्वलंत उदाहरण असलेल्या महिला उद्योजक सौ तृप्ती ढवण यांचा गेल्या एक तपाहून अधिक काळ चाललेल्या सोमेश्वर मसाला उद्योगाच्या पार्टनर आहेत. त्यांचे जीवन-कार्य प्रेरक ठरणारे आहे. तृप्तीताईंच्या घरात कोणत्याही कामाला बाई नाही, त्या उद्योग सांभाळून सर्व काम स्वतःच करतात याचा उल्लेख रश्मीजींनी लेखात केला आहे हे विशेष !
आधुनिक सरस्वती सौ जोत्स्ना कासार यांनी 15 मुलांच्या शिकवणीला सुरूवात करून, आज स्वतःची गुरुवर्या शाळा सुरू करण्यापर्यंत झाल्याचा प्रवास रश्मीजींनी उत्तम प्रकारे विशद केला आहे.
तसाच परिचय आधुनिक व्यावसायिक श्री मोहित कोकीळ यांच्या कार्याचा देखील केला आहे. ‘मशीन वर्किंग आणि डेटा सायन्स कन्सलटिंग’ या पदव्युतर पदवीचे विद्यापीठ सुवर्णपदक विजेते मोहित कोकीळ यांनी चांगली नोकरी सोडून स्वतःची ‘मार्किटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ‘कंपनी अंधेरीत सुरू केल्याची हकिकत चांगल्याप्रकारे लिहिली आहे़.
या खेरीज समाजभुषण पुस्तकात सोलर उद्योजक रविंद्र सासवडे, आदर्श उद्योजक मामा मुरूडकर, वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ श्रुती गाडेकर मांगले, निष्णात सर्जन डॉ सचिन लोखंडे, डॉ स्वाती दगडे, नवसैनिक डॉ सुनील अंदुरे, संगीतकार डॉ महावीर बागडे, स्कीलबुक जनक डॉ किरण जयकर, राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे, राष्ट्रीय खेळाडू भावना भेलोंडे, चमकदार कामगिरी: सुवर्णा वनगुजर, तसेच समाजभुषण गृहिणी, व्यापारी, शिक्षिका, उद्योजक प्राध्यापक, समाजसेवी, अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या अनेक गुणीजनांचे परिचय सुरेखपणे लेखिकेने रेखाटले आहेत.

समाजाला भूषण ठरलेली ही एकूण 37 मंडळींचे योगदान फार मोठे आहे या सर्वांनी जिद्द, आत्मविश्वास, धडाडी, दृढ इच्छाशक्ती, प्रचंड मेहनतीने हे नेत्रदीपक यश मिळविलेले असल्याने ते समाजातील सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारे आहे.
सौ रश्मी हेडे यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक या सर्व मान्यवरांचे जीवनदर्शन उत्तमपणे घडवून आणण्यात आपल्या लेखन कौशल्याची साक्ष या पुस्तकातून दिली असल्याने त्यांचे अभिनंदन करणे उचित आणि सुयोग्य ठरेल.
पुस्तकाची प्रस्तावना श्री देवेंद्र भुजबळ यांनी उत्कृष्ट लेखनशैलीतून उत्तम प्रकारे कथन केली आहे. तर या पुस्तकाची निर्मिती न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन च्या सौ अलकाताई भुजबळ यांनी अपार कष्ट घेऊन केलेली दिसून येते. अक्षरजुळणी, मुद्रित संशोधन, अंतर्गत मांडणी या विविध निर्मिती संलग्न बाबी आणि उत्कृष्ट मुखपृष्ठ यावरून प्रकाशकाचे अविरत परिश्रम लक्षात येतात. मात्तबर प्रकाशकांच्या आकर्षक पुस्तकांच्या तोडीचे हे पुस्तक सौ अलकाताईंनी निर्मित केले असल्याचे स्पष्ट पणे दिसून येते. त्यामुळे संपादक देवेंद्र आणि प्रकाशक अलकाताई यांचे समाजाने ऋण मान्यच केले पाहिजे.
मुखपृष्ठावर 37 यशस्वी मानकरींचे फोटोंची मांडणी अप्रतिम कौशल्यपुर्ण दिसून येते. यास्तव उभयतांचे निष्ठेने केलेल्या या सुंदर, सुरेख पुस्तकाच्या निर्मितीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यास धन्यवादासह पात्र आहेत असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

— परीक्षण : सुधाकर तोरणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Great people..proud filling as A Kasar..
हो बरोबर. ह्यातील प्रत्येकानेच मेहनत घेत अडचणींचा सामना करत यश मिळविले आहे. सर्वांचा आदर्श ठेवल्यासारखा आहे. छान संकल्पना आहे पुढच्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी अश्या प्रकारे जिद्दीने यश संपादन केलेल्या समाजातील लोकांची माहिती देणे.
उत्तम पुस्तक परिचय.