गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण
पुस्तकाचा शोध घेत असतांनाच पुस्तक विक्रेत्याने पाचच महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेलं एक नव पुस्तक, ‘गणिका, महात्मा आणि इटालियन ब्राह्मण’ माझ्या हातात दिलं. भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्याचं हे पुस्तक श्री.मनू एस. पिल्लई यांनी इंग्रजीत ‘The Courtesan, The Mahatma & Italian Brahmin’ लिहिलेलं आणि मराठीत सविता दामले यांनी अनुवादित केलेलं आहे.
मनू यांना ‘”द आयव्हरी थ्रोन'” यांच्या पहिल्याच पुस्तकाला २०१७ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. शिवाय आणखीही तीन चार पुस्तकांचे ते लेखक, इतिहासकार आहेत. मान्यवर ५-६ इंग्रजी वृत्तपत्रात ते नियमित लेखन करत असतात.त्यांचा एवढा परिचय पुरेसा आहे.
ब्रिटिश साम्राज्यापूर्वी आणि ब्रिटिश सत्ता काळातील या दोन विभागात पुस्तकाची रचना केली असून त्यांत एकूण ६० कहाण्या आणि निबंधवजा लेख लिहिले आहेत. तर तिसऱ्या भागात स्वातंत्र्यानंतर एकच आपल्या काळाचा निबंधाचा समावेश केला आहे.

मनू पिल्लई यांचा व्यासंग यात अलगदपणे येत असून त्यांची लेखनशैली मनोवेधक आहे.या पुस्तकात प्रत्येक कहाणी इतिहासातील अमूल्य किस्सा असून त्यातील असामान्य कथाप्रसंग आणि व्यक्ती रेखा आपलं मन वेधून घेतात.
जाती व्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावरच्या मराठा घराण्यातील राजपुत्राला पासून ते हिंदू मंदिरातील मुस्लीम देवते पर्यंत-एक गणिका जी योध्दा राणी बनली तिच्यापासून तर ग्रामोफोनवर गाणा-या गणिके पर्यंत -स्तनविहीन स्त्रीपासून तर तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत आणि पवित्र संस्कृतची भक्ती करणा-या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत विविध कहाण्या, लेख यात असून भारताच्या भूतकाळाचे बघण्याचे एक गवाक्षच उघडतात आणि या गवाक्षातून दिसणारे समृध्द जग पाहून आपण थक्क होतो.यातील कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून टाकल्या आहेत.
यातील राहुजी भोसले यांची कथा महत्वाची आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकानंतर १६८४ मध्ये अवघ्या १२ वर्षाच्या राहुजी भोसले या मुलाला तामिळनाडू मधील तंजावरच्या सिंहासनावर बसविण्यात आले. भावी काळात भारतीय उपखंडात या दीर्घ भागावर मराठा साम्राज्याची सत्ता गाजवण्याची् ही प्रतिकात्मक कार्यवाही होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा सावत्र पुतण्या राहुजी यांची तंजावरच्या गादीवर नियुक्ती झाली. त्यांनी राज्यकारभार सांभाळताना आणि सैन्याचे डावपेच आखतानाच त्यांचे नाव ‘कलेचे आश्रयदाते’ म्हणून ही होत होते. नेहेमीच्या काळात वेळ काढून त्यांनी ४६ बहुश्रुत विद्वानांना स्वतः चे नावाने’अग्रहारम’ (वर्षांसन) मानधन देऊ केलं होतं. ते स्वतः कवी होते.त्यांनी लिहिलेलं नीतिशास्त्रावरील सामाजिक परंपरांचे विडंबन करणारे एक नाटक त्याकाळी खुपचं गाजलं. ‘पंचभाषा विलास’ या दुसऱ्या नाटकामध्ये भोवतालच्या बहुविध संस्कृतीच्या खुणा दिसून येतात. त्यांत तामीळ, तेलगू, मराठी, संस्कृत, हिंदी भाषेतील कडवी देखील आहेत. या राजेंचा जवळपास २८ वर्षे सत्ताकाळ होता.
या खेरीज पुस्तकात अशा अनेक कथा लेखांचा समावेश आहे सर्वांचा उल्लेख करणे विस्तारभयास्तव शक्य नसल्याने महत्वाचे फक्त देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जग, बसवराज, स्त्रिया आणि लिंगायत परंपरा, अहमदनगर ची विस्मृतीत हरवलेली बेगम, स्तनविहिन स्त्री, विजयनगरचे साम्राज्य लयाला गेलं नसत तर, केवळ अकबराची राणी नव्हे तर त्याहून अधिक काही असणारी जोधाबाई, योध्दा मीनाक्षी, अल्लाउद्दीन खिलजी, गणिका झाली. राणी, आगळं वेगळं धाडस करणारी मीराबाई, लाडका जहांगीर, सुलतान आणि राजांचे ग्रंथ आणि परंपरा, कहाणी दोन शकुंतलांची, इत्यादी ब्रिटीश साम्राज्यापूर्वीचे लेख अत्यंत वाचनीय आहेत. तर ब्रिटिश सत्ता काळातील ५० हून अधिक कहाण्या लेखापैकी फुले दापंत्य आणि त्यांचा लढा, आगगाड्या आणि भारत, साम्राज्यवादी सत्ता आणि भारतातील देव, वाजिद अली शाहची कहाणी, युध्दाआधीची राणी मनुबाई, सावरकरांनी बोटीतून उडी मारली-तेंव्हा, अयोध्यातील मंदिराचा वेढा घातला जातो तेंव्हा, महात्माजी हत्या न होता जगले असते तर काय ? असे विविध स्वरुपाचे लेखांचा, कहाण्यांचा समावेश पुस्तकात केला आहे. वेगवेगळ्या अनुभवांचं सुरेख चित्रण त्यात आहे. परंतू शेवटी प्रत्येक वाचकाने यातून स्वतःचा निष्कर्ष हा स्वतःच काढावयाचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
या कहाण्यामध्ये अत्यंत मोहक, अनेकपदरी आणि गुंतागुंतींनी भरलेलं भारतीय इतिहासविश्वाचं प्रतिबिंब दिसून येतं हे या पुस्तकाचे मोठे वैशिष्ट्य आहे.
भारतात रेल्वे कधी आली, भारतीय फुटबॉलच्या इतिहास काय होता हे या कथा लेखातून कळते. सर्वांनी ज्याचा तिरस्कार केला त्या लाॅर्ड कर्झनने भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी प्रयत्न केले होते हे यातून कळते. जयपूरच्या महाराजांच्या फोटोग्राफीच्या कौशल्याची कहाणी समजते. या कहाण्या मधील स्त्री-पुरुष आपल्याला ‘तेंव्हा काय होतं’ हे दाखवतात आणि ‘काय असू शकतं असतं’ हे देखील सांगतात. तसं करता करता समतोल विचारांचे इतिहासकार, व कथाकार मनू पिल्लई तिसऱ्या भागात वर्तमानकाळातील चिंता आणि दृष्टिकोन या विषयीची भाष्य करतात हे फारच विलक्षण वाटते. अर्थात मनूंचे लेखन एकदम नेमके, प्रवाही आणि रंजक आहे.कहाण्या,निबंध लेखांची रचना अत्यंत हुशारीने केलेली असून मन गुंगून जातं. त्यामुळे माझ्यासह अनेक वाचकांच्या मनात बरेच प्रश्न उभे राहतात आणि त्यावर अधिक वाचन करण्याची इच्छा निर्माण होते हे या अप्रतिम सर्वांगसुंदर विविध चित्रांमुळे सजलेल्या या पुस्तकाचे आगळे वैशिष्ट्य मानले पाहिजेच !

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800