“रिबेल सुलतान”
भारताच्या अत्यंत उत्तम तरुण इतिहासकार मनू पिल्लई यांचे या अगोदर “गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण” हे पुस्तक वाचल्यावर त्यांचे “Rebel Sultans:The Deccan from Khilji to Shivaji” या इंग्रजी पुस्तकाचे “रिबेल सुलतान” हे सविता दामले यांनी मराठीत अनुवादित केलेलं पुस्तक समग्र वाचून काढलं. पिल्लई यांनी अतिशय कौशल्याने आणि चित्रमय शैलीने आपल्याला ४०० हून अधिक वर्षाच्या अत्यंत खळबळजनक अशा इतिहासाची सफर घडवून आणून दख्खनभूमीचा मनोवेधक इतिहास, जो मध्य युगातील काळाचा अल्लाउद्दीन खिलजी पासून छ्त्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कथन केला आहे. दख्खन आणि दक्षिण आशिया येथील मध्य युगातील काळाशी संदर्भातील हे पुस्तक विस्मृतीत गेलेला एक भूतकाळ ते आकर्षित लेखनातून उलगडून दाखवतात हे एक फार मोठे योगदान आहे. एवढं की शेवटचं पान संपल्याखेरीज पुस्तक खाली ठेववतं नाही.
सन १२०६ मध्ये दिल्लीतील सल्तनीच्या स्थापनेपासून १७०७ बादशहा औरंगझेबाचा मृत्यू व मुघल साम्राज्याचा अस्त होऊ लागल्यापर्यंतचा समग्र खळबळक इतिहास यात पिल्लई यांनी एकत्रितपणे कथन केला आहे त्याची अद्वितीय खुमारी अनुभूती पुस्तक वाचतांना येते.
पुस्तकात एकूण सात प्रकरणे असून त्यांचे शीर्षक ‘पुत्र संतापाचे, मयूरपंखी सिंहासन, हिंदू सुलतान, बंडखोर सुलतान, सरस्वतीचा पुत्र, राजाचा इथोपियन पालक सरदार आणि मेष घराणे पर्यंत असून उपसंहारात मराठ्यांचा उदय’ यावर भाष्य केले आहे तर प्रारंभी ‘रक्त आणि हिरे’ आणि उपोदघातात ‘सम्राटाचे चरण’ याविषयावर विवेचन केले आहे.
दिल्लीत सल्तनीची स्थापना १२०६ मध्ये झाल्यानंतर ९० वर्षांनी देवगिरीच्या यादवांवर अल्लाउद्दीन खिलजीने मिळविलेल्या
विजयापासून १२ वर्षांनी मलिक काफूरने तीन चढाया करून काकतीय व होयसळांवर विजय मिळवून देवगिरी आपल्या राज्याला जोडून घेतली. या घटनेनंतर १३२० मध्ये तुघलक घराण्याचा उदय झाला. पुढे वरंगळच्या प्रतापरूद्रने केलेले बंड मोडून वरंगळचे दिल्लीच्या साम्राज्यात विलिनीकरण करुन १३२५ मध्ये महंमद बिन सुलतान बनला. दोन वर्षाने जुनेदेवगिरी
म्हणजे दौलताबाद येथे राजधानी केली. आठ वर्षांनी पुन्हा राजधानी दिल्लीत हलवली.
दरम्यान १३३६ मध्ये पहिला हरिहर संगमाने विजयनगर साम्राज्याची स्थापना करून दहा वर्षांनी सुलतानाशी लढा देऊन विजयोत्सव साजरा केल्या पर्यंतचा इतिहास कथन केला आहे.
पुढे पहिला बसायची सुलतान म्हणून हसन गंगूचा देवगिरी येथे राज्याभिषेक करून १३४७ मध्ये गुलबर्गा ही बहामनी साम्राज्याची राजधानी केली. १४१८ मध्ये विजयनगर कडून बहामनींचा पराभव केला गेला. देवराया द्वितीय याची विजयनगरच्या राजेपदी आणि सुवर्ण युगाचा शुभारंभ झाला.
१४६३ मध्ये आदिलशहाचा महंमुद गवान हा सल्तनीचा पंतप्रधान बनला. त्याने ९ वर्षांनी गोवा ताब्यात घेतला आणि त्याला ९ वर्षांनी मृत्यूदंड देऊन बहामनी राज्याचा अस्त झाला. १४८५ मध्ये विजयनगरचे संगमा घराण्याचे पतन झाले तरी तुलवा घराण्याने विजयनगरमधील सत्ता हस्तगत करून क्रृष्णदेव राजा झाला आणि दुस-या सुवर्ण युगाचा प्रारंभ १५०९ मध्ये झाला. त्याने आदिलशहाकडून रायचूर ताब्यात घेतले. दरम्यान अहमदनगर येथे निजामशाही, विजापूर येथे आदिलशाही, स्थापना झाली. क्रृष्णदेवाचे निधन झाले व रामराया विजयनगरच्या राजा झाला.
१५६५ मध्ये कुतुबशाह, आदिलशाह आणि निजामशाही यांनी रोटी-बेटी युती करून तालिकोटच्या लढाईत रामराया मारला गेला आणि विजयनगरचा नाश झाला.आणि अरिष्ट काळाची सुरूवात झाली. हा संपूर्ण इतिहास लेखकाने कथन केला आहे. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीची चांदबिबी पालनकर्ती झाली .तिने अहमदनगर चे संरक्षण केले. १५९७ मध्ये चांदबिबी, कुतूबशहा, आदिलशाह यांनी मुघलांशी युध्द केले पण त्यांचा पराभव होऊन तिची हत्या झाली. अहमदनगरचा ताबा मुघलांकडे आला. अकबर त्याकाळी मुघल बादशहा होता… १६३० वर्षी दख्खनमध्ये भीषण दुष्काळ पडला आणि त्याच सुमारास शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुढील इतिहास सर्व लहान थोरांना माहितच आहे. विस्तारभयापोटी मी उल्लेख करीत नाही. १७०७ मध्ये बादशहा औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल साम्राज्याचा अस्त होऊ लागला.
दख्खनचा इतिहास ब-याच नवतरुणांना फारसा माहित नसल्यामुळे मी प्रारंभी निवेदन केलेल्या सुलतान शाहींची माहिती थोड्या विस्ताराने दिली. पुस्तक वाचतांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे भारत आणि विशेषत: दख्खन ही त्याकाळी एक समृद्ध भूमी होती. बरेच परदेशी लोक सातत्याने येत होते.तसेच याचकाळात जहाजबांधणी आणि नौकानयन शास्त्र विकसित झाल्याने पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच आणि अन्य मंडळीही मोठ्या संख्येने येऊ लागली. या सर्वांचा येथील राजकारण आणि समाजकारणावर मोठाच परिणाम झाला होता तो सगळा या पुस्तकातून सजीव होऊन आपल्या नजरेसमोर येतो. हिंदू-मुस्लीम द्वेष किंवा संघर्ष हा इंग्रज आल्यावर भांडणे लावण्यासाठी रचला या सिध्दांतास या पुस्तकांतून पुष्टी मिळते. कारण मूळ पर्शियातून तेराव्या, चौदाव्या शतकात इथं नशीब आजमावयाला आलेल्यांनी या दख्खनी शाह्या स्थापन केल्या असल्या तरी पुढे त्यांनी येथल्याच स्त्रियांशी विवाह केला. त्यामुळे दोन एक पिढ्यानंतरचे त्यांचे वंशज भारतीयच झाले.
विजयनगरच्या रामराया द्वितीयने आपली कन्या फिरोज शाह बहामनी ला राजनैतिक कारणांसाठी विवाह करून हुंड्यासह आत्मसन्मानाने दिली. विजयनगरचे घराणे आणि पोर्तुगालचं राज घराणं यांच्यात सोयरीक जुळविण्याविषयी देखील पत्रव्यवहार आहे. तसच इब्राहिम कुतुबशाह स्वतः ला ‘सरस्वतीपुत्र’ समजत होता आणि सरस्वतीला वंदन करून आपली फर्मान काढीत होता. त्याला तेलगू कवी ‘अभिरामा’ म्हणायचे. परंतु या सर्व सुलतानांकडे भारतीय राज्यातील सरदार आणि सैनिक हिंदू, मुस्लीम दोन्ही असायचे.आणि या राजाकडून त्या राजाकडे नोकरीस जाण्यात आणि त्यांच्या बाजूने लढण्यात धर्माची आडकाठी येत नव्हती. हे काहींसे आश्चर्यकारक वाटणारे देखील भाष्य या पुस्तकातून दिसून येते.
गोवळकोंडा आणि विजापूर यांच्या कडे हि-यांच्या खाणी होत्या. तेथील मोठमोठे हिरे जगभर गेले. कलमकारी कापड, मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत आणि ब-याच किंमती मालाची जहाजे या सर्व राजे, सरदारांच्या मालकीची होती आणि त्या बळावर ते जगात फिरून भरपूर संपत्ती मिळवत होते.
दख्खनमध्ये व भारतात फार लढाया होत होत्या आणि या लढायांसाठी मोठ्याप्रमाणात हबशी गुलाम आणले जात होते. मूळ देशांपासून, आपल्या नात्यांच्या माणसांपासून तुटलेले आणि तेथे परत जाण्याची इतकिशी शक्यता नसलेले हबशी गुलाम मग मालकांप्रती प्रचंड निष्ठा बाळगण्यातच जीवनाचा अर्थ शोधू लागायचे.
मलिक अंबर हा त्यातलाच एक हबशी गुलाम होता. मोगल आक्रमणाला अहमदनगरच्या निजामशाहच्यावतीने रोखण्याचा मान त्यालाच आधी जातो.
मनू एस.पिल्ई यांच्या मन गुंतवून टाकणा-या या पुस्तकामुळे विद्वज्जड पुस्तकी जग आणि अधिक व्यापक असे सर्वसामान्य वाचकांचे जग यांच्यात पूल बांधण्याचे अत्यावश्यक कार्य ‘रिबेल सुलतान’ या पुस्तकाने केले आहे. अत्यंत भावपूर्ण आणि सुबोध शैलीत लिहिलेल्या या प्रवाही पुस्तकातून वाचकांना पार मंत्रमुग्ध करून सोडतात हा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या अभिप्राय मला अतिशय मोलाचा आणि आनंद देणारा वाटतो.
स्वत: पिल्लई यांनी आपले लिखाण हे विद्वानांच्या कित्येक पिढ्यांनी केलेल्या अभ्यासावर आणि कष्टपूर्वक संशोधनावर आधारलेले आहे अशी पानोपानी संदर्भग्रंथाची सुची देऊन त्यातील उत्कृष्ट स्तोत्रांमुळेच आहे अशी प्रामाणिक कबुली दिली आहे. त्यामुळे हे पुस्तक इतिहासाचा एक उत्तम दस्तऐवज झाला आहे. जमवलेल्या साहित्याची रचना करताना त्यातील तर्कशुद्ध मार्ग काढून, असामान्य सामर्थ्यशाली अशी कल्पनाशक्ती आणि शब्द निवडीची गुणवत्ता दाखवून पिल्लई यांनी लेखन- कथन केले आहे हे या पुस्तकाचे सर्वांत मोठे यश आहे. नव्या पिढीतील जिज्ञासू मंडळींनी आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी हे आकर्षक आणि मनोवेधक पुस्तक पुर्णपणे वाचलेच पाहिजे असे माझे तरी व्यक्तिशः मत झाले आहे.
आपल्या काही पुस्तकांना सर्वोत्तम पुरस्कार लाभलेल्या तरूण इतिहासकार मनू पिल्लई यांचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे.
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800