विषण्ण उदास मन
रस्ता चुके समोरचा
भाळावरल्या घामाला
थंड वारा कवितेचा
दुःखाने मन पिचले
डोह नयनी अश्रूंचा
हळुवार फुंकर घाली
सूर मंजुळ कवितेचा
आठवांची मेघमाला
घेई ठाव हृदयाचा
तेव्हा गुंफून शब्दांना
होतो गजरा कवितेचा
भाव भावनांना मिळे
टेकू हळव्या शब्दांचा
तेव्हाच आला हुंकार
अलवार कवितेचा
अखंड नाते तिच्याशी
मृदु सुवास प्रीतीचा
हर्षाचा जल्लोष जेव्हा
फुटे झरा कवितेचा
आली दिवाळी जीवनी
दीपोत्सव अक्षरांचा
शब्दज्योतीचा अर्पिला
दीपहार कवितेचा
रेखते रेखीव रांगोळी
ठिपका तो अक्षरांचा
मंथन सुविचारांचे
चित्रहार कवितेचा
भक्तीत ओली अक्षरे
दंडवत प्रतिभेचा
पंक्तीपंक्तीतून केला
हा मुजरा कवितेचा
– रचना : शुभदा दीक्षित. पुणे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800