Monday, July 14, 2025
Homeलेखमुलांचं मन

मुलांचं मन

“मुलं म्हणजे देवाघरची फुलं” असं आपण आधी म्हणायचो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे, कुटुंब व्यवस्थेमुळे परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. या परिस्थितीचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. नवनवीन समस्यांना या मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना देखील सामना करावा लागत आहे.हे सर्व पाहून आपण आजपासून “मुलांचं मन” ही लेखमाला सुरू करीत आहोत.

बाल मानस तज्ञ डॉ राणी दुष्यंत खेडीकर या, ही लेखमाला लिहिणार आहेत.

संक्षिप्त परिचय
डॉ. सौ राणी दुष्यंत खेडीकर यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या मातांच्या अपत्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, मानसिक, आरोग्य या विषयावर आचार्य पदवी प्राप्त केली आहे.

या विषयावर त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. पालकत्व या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात त्या कार्यशाळा घेत असतात. अनेक सामाजिक संस्थावर महत्त्वाच्या पदावर त्या कार्यरत आहेत. अनेक वृत्तपत्रातून, मासिकातून त्यांनी लेखन केलं आहे. डॉ.सौ राणी दुष्यंत खेडीकर यांचं आपल्या परिवारात स्वागत. आजचा पहिलाच लेख आहे.

कोरोना आणि मुलं”….
आज आपण सगळेच शारीरिक मानसिक आरोग्यास घातक ठरलेल्या अश्या कोरोना काळात वावरतोय. या परिस्थीतीत पालक आणि पाल्य यांच्या समोर एक वेगळं आव्हान पेलण्याची जबाबदारी आली आहे.

कोरोना या महामारी काळात आपल्याला सुरक्षा नियमांचे, शिस्तीचे पालन करणं गरजेचं झालं आहे. त्यासाठी घरी राहणं भाग आहे. अश्या परिस्थितीत मुलं साहजिकच कंटाळली आहेत.

गेल्या वर्षभरात संपूर्ण जीवनशैलीत मोठा बदल आपण अनुभवतोय. मुलांचा स्क्रीन टाईम खूप जास्त वाढला आहे, आणि ती सध्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मुलांच्या हातात इंटरनेट नावाचं, योग्य उपयोग केला तर वरदान नाहीतर शाप असं खेळणं आलेलं आहे, आणि ते खेळणं मुलांना हक्काने आपल्या ताब्यात ठेवत आहे. ही गोष्ट पालकांसाठी मानसिक ताप देणारी ठरत आहे. त्याच प्रमाणे मुलं घरी राहून एकलकोंडी होत चालली आहे. जास्त चिडचिड करू लागली आहेत. अशा अनेक वर्तणूक समस्या मुलांमध्ये निर्माण होत आहेत.

करोना काळापूर्वी थोडं मागे जाऊन आपण बाल मानसशास्त्र समजून घेत आता करोना काळात निर्माण झालेल्या समस्यांवर उपाय योजनांचे नियोजन निश्चितच करू शकू. गेल्या काही वर्षापासून संपूर्ण मानवी जीवनावर आधुनिकतेचा पगडा वाढत गेला आहे. त्यामुळे मानवी नाते संबंध, सामाजिक जाणीव यामध्ये देखील मोठा बदल दिसून येत आहे. यंत्र युगात प्रवेश झाल्या नंतर जी प्रगती होत गेली त्याच बरोबर, माणसं, भावना, आई बाबा आणि मुलं देखील एक यंत्र होऊ लागले आहेत. चावी, रिमोट आणि बटणं यात सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची जणू खोडच लागली आहे.

मोठ्या माणसांनी लहान मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दयावी आणि त्या कौतुकाच्या, प्रेमाच्या स्पर्शात लपलेली माया, जिव्हाळा यामुळे मुल सुखावुन जावी आणि त्यांना नवी दिशा मिळावी असं घडणं दुर्मिळ होत चाललय. कौतुक करण्याची आणि करून घेण्यासाठी आता बरेच साधन अर्थात गिफ्ट्स खूप महत्वाचे झालेय.

काही महिन्यांपूर्वी एक नोकरीदार इंजिनियर आई आपल्या सात वर्षाच्या मुलीला समुपदेशनासाठी माझ्याकडे घेऊन आली. आपल्या लेकीची तक्रारीची लांबलचक यादी ती माझ्या पुढे वाचत होती. त्यात तीची अडचण नको म्हणून तिने आपला मोबाईल मुलीच्या हवाली केला होता.एका पायावर दुसरा पाय ठेवत आई बोलू लागली “कालचं हिला ड्रॉइंग मध्ये गुड मिळालं म्हणून ऑनलाइन रिमोट डॉल्स ऑर्डर केल्या, आणि किती करायचं या मुलांचं तुम्हीच सांगा ? तरी उलट उत्तर, मोबाईल तर हवाच आणि सतत काही तरी डिमांड असतेच”. मी शांतपणे ऐकत होते सारे. आणि ती लहानशी पोर तिला कशाशीच काही घेणं देणं नव्हतं. कोण जाणे काय शोधत होते तीचे इवले इवलेसे बोटं त्या मोबाईल मध्ये. माहीत नाही मनाच्या कुठल्या गरजेची खळगी भरत होते ते भुकेले, तहानलेले निरागस डोळे.

कोरड्यात कोरड कितीही मिसळत गेलं तरी गोळा तयार होत नाही. चार थेंब ओलावा शिंपडल्या शिवाय कोरड उपयोगी सिद्ध होत नाही. मायेचा ओलावा, आई बाबाची सोबत, आईचा स्पर्श, आईच्या हातानी बनलेल्या खाउची चव या सगळ्या बालहक्काच्या गोष्टी मुलांसाठी दुर्मिळ होत चालल्या आहेत. चावीची खेळणी, रिमोटच्या बाहुल्या तसेच सगळंच विकत मिळणारी बाजारपेठ आणि सगळंच विकत घेऊ शकण्याची क्षमता या आविर्भावात वावरणारी आई बाबा आणि मुलांची जमात, कदाचित नात्यांची वीण सैल करत चालली आहे.

मुलं वास्तव नाकारून काल्पनिक विश्वात रमू लागली आहें, नव्हें तेच खरं समजू लागली आहे. ही परिस्थीती दिवसंदिवस भयानक रूप घेतेय. पालकांना याची गंभीरता लक्षात घेणं खूप गरजेच आहे. मुलं का एकलकोंडी होत आहेत ? कोणी पाहुणे आले की, त्यांच्याशी न बोलता आपल्या खोलीत बंद का होतात ?चार माणसांशी बोलताना त्यांना अवघडल्या सारखं का होतं ?, ते कायम एखाद्या वेगळ्याच विश्वात का वावरतात ? असे प्रश्न निर्माण झाल्यास पालकांनी पाल्याशी संवाद साधण खूप आवश्यक आहे.

एकदा तेरा वर्षाच्या एका मुलाला त्याचे बाबा खोटं सांगुन माझ्याकडे घेऊन आले. तो रागात बोटाची नखं कुरतडत अत्यंत अस्वस्थपणे वेळ काढत होता. त्या पूर्वी ते गृहस्थ माझ्याकडे मुला बाबत अनेक तक्रारी नोंदवून गेले होते. मुलगा खूप उलट उत्तर देतो, खोटं बोलतो, सारखा मित्रामधेच असतो, आभ्यास करत नाही, मोबाईल अजिबात सोडत नाही, आई बाबांशी फक्त हो किंव्हा नाही एवढंच बोलतो. अश्या खूप गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. मुलाच्या अश्या वागण्यामुळे तें खूप चिंतीत होते. आपला मुलगा हाताबाहेर गेलाय याचं दुःख त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.

मग त्यांनी काय करावं ? तर सतत ओरडणं, टोमणे मारणं, त्याच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणं आणि उपदेशांचा ओव्हर डोझ देणं. हे सगळं अगदी नियमितपणे सुरू केलं. त्यामुळे मुलावर नकारात्मक परिणाम होत आहेत. हे जाणवत असतानाही आपला राग शांत करण्यासाठी त्यांनी हे उपाय सुरू ठेवले. परिणामस्वरूप मुलगा त्यांच्या पासून आणखी आणखी लांब होत गेला. असे पालक आणि पाल्य नियमीतपणे येत असतात.

नेमकी कशी, कधी दरी निर्माण झाली माहिती नसतं. पण पालक, पाल्य यांच्यातला संवाद हरवत चाललाय एवढं मात्र निश्चित. पाल्यांशी मैत्रीचं नात कसं निर्माण करावं..आणि ते कसं जपावं ? हा आत्मचिंतन आणि अभ्यासाचा विषय आहे, कारण अस प्रत्यक्ष घडणं इतकं सोपं नाहीय. पालकाना एकाएकी हा प्रयोग जमण शक्य होत नाही आणि त्यामुळे मूल आणखी गोंधळतात. त्यांच्या आत असलेली प्रचंड अस्वस्थता प्रत्येक क्षणाला नवीन गोंधळ निर्माण करत असते.आणि अश्या अवस्थेत पालक मुलांशी त्यांना हवं तेंव्हा मैत्रीच नातं जोडतात आणि हवं तेंव्हा परत पालक या भूमिकेत शिरतात. असं, जाणवल्यास मुलं आपल्या मनाची दार, आपली गुपितं आणखी घट्ट करत जातात.

आपल्या वागण्यात, बोलण्यात दैनंनदिन व्यवहारात कृत्रिमता आणि कोरडेपणा येत जातोय का ? आणि त्याचा परिणाम आपल्या नात्यावर, कुटूंबावर होतोय का ? आपण सगळ्यांनीच हे तपासून बघणं गरजेचं झालं आहे. आपल्या वागण्यातील ही कृत्रिमता आपल्या नात्यांची वीण सैल करत चालली आहे. आणि जिव्हाळ्याने कुरवाळून मुलांना आपलंसं करून, त्याच्या कडून अनेक चांगल्या गोष्टी करून घेण्याची पालकांची जादूची कांडी हरवत जातेय. कदाचित ही जादूची कांडी आपली जादू विसरून कुठल्यातरी कृत्रिम रिमोटच्या अधीन होत चालली आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे.

आज जेव्हां आपण या कोरोना काळात घरी राहण्यास बाध्य आहोत ही खूप मोठी संधी आहे, की आम्ही आपल्या पाल्यांना वेळ देऊ शकतो. त्यांच्या सोबत राहून जी एक पोकळी, दुरावा निर्माण झाला आहे तो भरून काढू शकतो. बऱ्याच कुटुंबात आता घरकाम घरातील सदस्य मिळून करू लागले आहेत. या छोट्या छोट्या कामात मुलांना सहभागी करून घेत त्या सहवासातून मुलांना त्यांच्या मनात साठलेल्या अनेक गोष्टी बोलण्याची संधी द्यावी. पालकांनी मुलांशी बोलताना कायम केवळ कुठल्यातरी आदर्श गोष्टीचा मारा करत राहणं आवश्यक नसतं. तर, मुलांना जास्तीत जास्त व्यक्त होण्याची संधी देणं आणि त्यांचा मनात असलेला गोंधळ आणि द्विधा मनस्थिती या विषयी चर्चा करणं. हे सगळं या कोरोना काळात आपण साधू शकतो.

बाल्यावस्थेतून कौमार्य अवस्थेत प्रवेश करताना मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आता तर मुलांना इंटरनेट वापरायला देणं याशिवाय आपल्या कडे पर्याय नाहीय. तरी मुलांच्या नकळत ते इंटरनेटच्या माध्यमातून कुठल्या विश्वात वावरत आहेत याचा अंदाज घेत राहणं आवश्यक आहे. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याशी अगदी सामान्य तसेच जे विषय आपण त्यांच्याशी बोलणं टाळतो ते विषय काढून त्यावर मुलांचे काय विचार आहेत हे जाणून घेऊन त्यावर पुढे चर्चा करत जाणं हे आता शक्य आहे. आणि जे आपल्याला त्यांना सांगायचं आहे ते गोष्टीच्या माध्यमातून आणि आपल्या स्वतच्या लहान लहान अनुभवातून सांगू शकतो.

विविध परिस्थितीत बालकाकडून घडू शकणाऱ्या वर्तनाची तत्त्वे आणि त्यांवर आधारित पूर्वकथन हा बाल मानसशत्राचा महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये बालकाकडून कोणत्या परिस्थितीत काय घडू शकते याचा पूर्व अनुमान अभ्यासाच्या आधारावर लावला जातो.

कोरोना काळात निर्माण होत असलेल्या समस्यांचे समाधान देखील याच काळात लपलेले आहे. या परिस्थितीत अनेक कुटुंबात या आजाराची बाधा झाली आहे. आणि प्रत्येकाचं मानसिक आणि भावनिक खच्चीकरण होताना दिसत आहे. पण या समस्येमुळे जरी सामाजिक दुरावा ठेवणं गरजेचं असलं तरी मनाने नाते संबंध जवळ येत आहेत. याची जाणीव मुलांना करून देण्याची ही योग्य वेळ आहे. सामाजिक जाणीव ही एक महत्त्वाची किनार आपण मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला लावू शकतो. आपल्या शेजारी किंव्हा मित्र नाते संबंधात या कोरोना मुळे आजारी असल्यास घरून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करणं. आणि, सतत बोर होत असल्याची तक्रार करणाऱ्या मुलांना त्या कामात सहभागी करून घेणं, उदा. कोणाला चपात्या किंव्हा आपल्या कडून शक्य झाल्यास जेवणाचा डबा काही दिवस पुरवण ही छोटी मदत करण्यात मुलांची मदत घ्यावी. आपल्या सूचना किंव्हा केवळ आदर्श गोष्टीचा मारा यातून मुलं शिकत नाही ते आपल्या वर्तणुकीचे अनुकरण करतात आणि त्याची बैठक घट्ट झाली की ते चांगल्या सवयी आणि तत्व अंगीकारतात. आपल्या सकारात्मक वर्तनाचा परिमाण मुलावर होत असतो. आपण केवळ गरजुंची मदत करायला हवी असं मुलांना सांगत जाणं यापेक्षा त्यांना सोबत घेऊन तशी कृती केल्यास ती गोष्ट त्यांच्यात रुजत जाते. मग शाब्दिक सूचना करण्याची गरज उरत नाही.

परवा एका आईचा फोन आला. त्यांचा दहा वर्षाचा मुलगा हल्ली खूप उलट बोलू लागला आहे आणि सारखा फोन साठी हट्ट करतो. सध्या शाळेचे वर्ग बंद आहेत. तरी मोबाईल मागतो. आणि नाही दिल्यास वस्तू फेकून देणं, राग राग कारणं सुरू असतं. मी तिला विचारलं त्यांच्या आसपास कोणी कुटुंब आहे का ज्यांना कोरोना मुळे मदतीची गरज आहे ? ती हो म्हणाली. मग त्यांना मुलाला मोबाईल देऊन त्यात पोष्टिक जेवणाची रेसिपी शोधायला सांगा आणि असं जेवण बनवून काही थोडे दिवस ज्यांना मदत हवी त्यांना डबा पाठवा आणि त्यात मुलाची पूर्ण मदत घ्या. अगदी गमती जमतीत हे काम करून घ्या. अगदी थोड्या प्रमाणात त्याच्या पिगीबँक मधून डब्यासाठी भाजी व फळ आणण्यासाठी पैसे देण्यास त्याला प्रवृत्त करा आणि यात त्याचा सहभाग घ्यावा.

आधी त्या आईला हे सगळं कठीण वाटलं पण, तिने सुरुवात केली. नंतर तिचा उगाच हट्ट करणारा, त्रागा करणारा मुलगा यात स्वतःच इतका गुंतू लागला की, चार दिवस सतत त्याने फळ आणि भाजी यासाठी पिगीबँक मधून पैसे काढून दिले. आणि आईला डबा करण्यात मदत करू लागला. ते दोघे रोज निवीन पौष्टिक रेसिपी शोधू लागले. अश्या प्रकारे मुलांना त्यांच्या पिगीबँक मधून थोडे पैसे काढून त्यातून थोडी मदत करण्याचे वळण लावणं या काळात शिकवायला हवं. त्यामुळे त्यांच्या वर्तूणुकीच्या समस्या आटोक्यात येऊन त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण होईल.

आपल्या मुलांसोबत घरी मनसोक्त खेळा, छान गाणी लावून मुला सोबत नाचा. उत्तम संगीत हे मानसिक आरोग्यासाठी मोठं वरदान आहे. खूप सारे ओले रंग घेऊन चित्र काढा, कलर थेरपी मानसिक आरोग्य छान ठेवण्यास खूप प्रभावी आहे. तसेच कपाल भारती, प्राणायाम हे मुलांना आपल्या समोर बसवून जरूर करावं. त्यामुळे मुलांना तुमचा सहवास मिळतो. तुमच्या डोळ्यातील भाव वाचण्याची आणि तुम्हाला त्यांच्या शरीर भाषेचं मर्म समजून घेण्याची संधी मिळते. याची सवय मुलांना जरूर लावावी.

खोट्या आभासिक जगापेक्षा तुमच्या कुशीत मुलांना जास्त आनंद मिळू शकतो. आणि त्या सुरक्षेच्या भावनेतून मुलं समाधानी होतं. मुलांच्या भावनिक, मानसिक गरजा आणि त्याच सकारात्मक नियोजन यावर त्याच व्यक्तिमत्त्व फुलत जातं.

पाल्य तर अजाण आहेत. त्यांच्यागाठी अनुभव नाहीय. सगळं जग त्यांना नवीन आहे. पालकांनी आपलं सक्षम बोटं त्यांच्या हाती ठेवण्याची कला अवगत करणं ही काळाची गरज आहे.

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर, बाल मानसतज्ञा, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अप्रतिम लेख
    सलाम डॉक्टर राणी यांच्या कार्याला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments