ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा दरवर्षी जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा होतो. त्या प्रमाणे तो काल साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुढे काही कविता देत आहोत. मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
१. मैत्री पुस्तकांची
लहान मोठा आकार
पुस्तके ज्ञानभांडार
करी जीवन साकार
महा त्यांचे उपकार
विनोदी रहस्यमय
चरित्रे ग्रंथसरिता
विज्ञान कथासंग्रह
असती बालकविता
इतिहास घडविती
जगास बदलविती
निसर्गात रमविती
विद्या ज्ञान वाढविती
लेखक कवींचे दान
करावा त्यांचा सन्मान
ठेविती भाषेचा मान
दिले आम्हा वरदान
जपा मौल्यवान ठेवा
बुद्धीसाठी खास मेवा
योग्य वेळी भेट द्यावा
संस्कार तोची जपावा
केली पुस्तकांची मैत्री
गाई त्यांचे गुणगान
झालो बहू धनवान
तरीही अतृप्त मन
–– रचना : डॉ. सौ.अनुपमा पाटील. ठाणे.
२. मित्र प्रेम
मैत्रीच्या पावसाने भिजतं
आनंदाने चिंब प्रत्येकाचं मन
मैत्रीच्या नात्याने
सुंदर बनतं जीवन
मित्रांच्या सहवासात असतो
प्रत्येक क्षण श्रावण
राम लक्ष्मणासारखं फुलतं प्रेम
कुणीच नसतो रावण
सर्वश्रेष्ठ नात्याची
सोनेरी किनार असते मित्रत्व
कुणीच कुणावर
गाजवत नाही श्रेष्ठत्व
निरपेक्ष प्रेम काय असतं
ते ख-या मैत्रीत कळतं
घ्यायचं काहीच नसतं
सर्वस्वाचं निःस्वार्थी समर्पण असतं
पद्माकर सर शेठ किंवा साहेब
मित्रासाठी असतो लाडातला पदा
मित्रांच्या मदतीला धावून जायचं
एवढच माहीत असतं त्याला सदासर्वदा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
अनेक मित्र भेटतात
पण शालेय जीवनातले बाल मित्र
सदैव ह्रदयाच्या अत्तरकुपीत असतात
- — रचना : राजेंद्र वाणी. मुंबई .
३. मैत्री
मैत्री असावी
कृष्ण सुदामा सारखी
कधीही प्रेमाला
होऊ नये पारखी
दोन्ही जीवांची एकमेकांवर मालकी
भरभरून प्रेम, समाधान देणारी ||
ह्रदयासी ह्रदय
संलग्न असावी
डोळ्यांची भाषा डोळ्यांना कळावी
शब्दावाचून तार जुळावी
मनास तेथे विश्रांती मिळावी ||
संवाद सदैव
खेळिमेळी व्हावा
आपुलकीचा
धागा जुळावा
सारा भार व्हावा हलका
श्रमल्या जीवास आधार मिळावा ||
सुखात हसणारा , दुःखात अश्रू पुसणारा
जीवाच्या अंतापर्यंत साथ न सोडणारा
मित्र एक असा असावा
आत्म्याशी आत्म्याचे नातं जोडणारा !!!!
— रचना : आशा दळवी. दुधेबावी
४. मैत्री
धावता मन ,
वाऱ्या सारक्या !
मैत्रीक भेटून ,
घिता गिरक्या ॥१॥
पयली वयली ,
माय माजी मैत्रीन !
माज्या विश्वातली ,
मायेची मास्तरीन ॥२॥
भातुकलीच्या खेळान ,
बालपन सरला !
लग्नाच्या निमसान ,
परक्यापन गावला ॥३॥
आयेचो वांगड ,
पाटी ऱ्हवलो !
घोवाचो वांगड ,
जन्माचो झालो ॥४॥
सूर जुळले दोगवानचे ,
तुजा ता माजा !
नि माजा ता तुजा ,
मैत्र झालव आयुष्यभराचे ॥५॥
पायवाटी वळनार ,
लय नाती जोडलव !
मैत्रीच्या पानार ,
काव्या रचलव ॥६॥
कशाक तो देखावो ,
फ्रेंडशिप धाग्याचो !
हृदयात ओलावो ,
मैत्रीच्या सुवासाचो ॥७॥
मायेन गोंजारत ,
प्रेमान ऱ्हवया !
सुखद:खी आयुष्यात ,
मैत्री अमर ठेवया ॥८॥
— रचना – सौ. वर्षा महेंद्र भाबल.
५. हॅप्पी फ्रेंडशिप डे
मैत्रीच्या रेशीम गाठी
असतात मऊ मुलायम
रेशीम धागा असला तरी
नाही हा कच्चा कमजोर !!
मैत्री म्हणजे शिंपल्यातील
अप्रतिम शुध्द खरा मोती
ह्याच मोत्यांची सुंदर माळ
म्हणजेच माझ्या गोड मैत्रिणी !!
मैत्री म्हणजे असते फक्त
मज्जा मस्ती धमाल
एकत्र येता सगळ्या मैत्रिणी
करतात अनोखी कमाल !!
मैत्री असो बालपणीची
असो अगदी क्षणभराची
मैत्री असो ऑनलाईनची
किंवा असो नात्याची !!
मैत्री हि मैत्री असते फक्त
निःस्वार्थ निर्मळ निरागस
थोडासा रूसवा थोडासा अबोला
खुप सारा गोडवा आणि
अगणित प्रेम जिव्हाळा !!
आपली मैत्री राहो कायम अशीच
छान सुंदर आनंदी अखंड
अगदी फेविकॉल सारखी !!
तुमची आंनदी मैत्रिण:::–
– सौ.मंदा विजय शेटे… 🌹
संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800