जागतिक आरोग्य संघटनेतर्फे १९९७ पासून रक्त गटाचे संशोधक कार्ल लॅण्डस्टेनर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १४ जून हा रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. १४ जून १८६८ हा त्यांचा जन्मदिवस. रक्तदान दिन. ते ऑस्ट्रियाचे नामवंत जीव व भौतिक शास्त्रज्ञ होते.
लॅण्डस्टेनर यांनी १९०० साली माणसाच्या रक्तातील अग्गुल्युटिनिनच्या आधारे ए, बी, एबी आणि ओ असे रक्तगटाचे वर्गीकरण करून वैद्यकीय शास्त्रात अभूतपूर्व योगदान दिले.
कोणतीही सुदृढ, सशक्त, रोग न झालेली व्यक्ती रक्तदान करू शकतो. वयाच्या १८ व्या वर्षापासून ६५ व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचे वजन ४५ किलोच्या वर असावे. रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ असावे. नाडीचे ठोके ८० ते १०० असावेत. रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो.
यंदा जागतिक रक्तदान दिवसाची थीम ‘सुरक्षित रक्त, जीव वाचवते‘ असून. ‘रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा‘ हे या वर्षीचं घोषवाक्य आहे.
भारताची लोकसंख्या १३० कोटी असूनही केवळ एक कोटी २० लाख लिटर रक्त पुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी ७४ लाख युनिट रक्त उपलब्ध झाले होते. आवश्यकतेपेक्षा ४० टक्के रक्ताची कमतरता होती. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. भारतात केवळ ०.६ टक्केच लोक रक्तदान करतात.
विदर्भात १० हजार लिटर रक्ताची आवश्यकता आहे. मात्र, त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये रक्ताची आवश्यकता असताना त्यांच्याकडे तेवढा साठा उपलब्ध नसल्याचे एका सर्वेक्षणानुसार लक्षात आले आहे.
आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही कृत्रिमरीत्या रक्त तयार करू शकलेले नाही. शासकीय पातळीवर रक्तदानासंदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाही.
एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणतः तीन महिन्यांनी रक्त देणे आवश्यक आहे. मधुमेह असलेले रुग्ण जर इन्शुलिन घेत असतील तर त्यांना रक्तदान करता येत नाही. रक्तदान करताना शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. रक्तदानानंतर शरीरात रक्ताची पूर्ती २४ तासात होते. रक्तदाताच्या शरीरातून ३५० किंवा ४५० मि.लि. पर्यंत रक्त घेऊ शकतात.
जे नेहमीच रक्तदान करतात त्यांना मधुमेह, हृदयरोग आणि रक्तचापसारखे आजार होत नाही, असेही तज्ज्ञ सांगतात. रक्त तपासणी संदर्भात न्युट्रिक ऍसिड टेक्नॉलॉजी निर्माण झाली आहे. मात्र, ती केवळ मुंबई आणि दिल्लीत आहे.
भारतात २ हजार ७५० रक्तपेढ्या आहेत, तर महाराष्ट्रात २८२ रक्तपेढ्या आहेत.
रक्तदानासंबंधीची जागरूकता वाढवून दरवर्षी कोट्यवधी लोकांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे, नियमितपणे ऐच्छिकरित्या मोफत रक्तदान करण्यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहन देणे, आणिबाणीच्या काळात राष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सुरक्षित साठा करून ठेवणे, नियमितपणे ऐच्छिक रक्तदान करणार्या व्यक्तींचा मानसन्मान करून, समाजापुढे त्यांचा आदर्श ठेवणे, त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना रक्तदानाचे कार्य चालू ठेवण्यास प्रोत्साहन देणे.
सुरक्षित रक्त ही अलीकडची वैश्विचक समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी, जगभरात ९ कोटी युनिट इतके रक्तदान केले जाते. पण, हा पुरवठा कमी पडतो. बाळंतपणात होणारे मातांचे मृत्यू आणि कुपोषण आणि विविध प्रकारच्या ऍनिमियामुळे होणारे बालमृत्यू, हे रक्तदानाच्या अभावी घडून येत आहेत.
रस्त्यावरील अपघातांचे बळी, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण, रक्तातील त्रुटी असलेल्या व्याधीग्रस्त व्यक्ती; यांनासुद्धा रक्ताची खूप गरज लागते. जगातल्या ७० देशात रक्ताचा मोठा तुटवडा आढळून येतो. तसेच पैसे देऊन रक्तदान करणार्या व्यक्तीपासून एचआयव्ही, हिपेटिटीस बी आणि हिपेटिटी सी सारख्या आजारांची लागण होण्याची शक्यताही असते.
या दिवसाच्या साजरीकरणात रेड क्रॉस सोसायटीचा हिरिरीने सहभाग असतो. रक्तदानासंबंधी काही गैरसमजूती आहेत व त्यांचे तज्ज्ञांकडून निराकरण करून घेतले पाहिजे.

– लेखन :संजीव वेलणकर.
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
सुंदर लेख! रक्तदानाने अनेक जणांना जीवदान मिळते. हिमोग्लोबिन व निरोगी आरोग्य ज्या व्यक्तींना, देवाने भरभरून दिले आहे. त्यांनी जरूर रक्तदान करावे.
रक्तदान हेच जीवनदान. 🌹 लेखक श्री संजीव वेलणकर.यांनी रक्तदान विषयी खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि आभार 🙏