जगणे संपत आले तरी जगायचे राहून गेले
केस पांढरे झाले तरी शिकायचे राहून गेले
ग्रंथ वाचले पोथ्या झाल्या
पदव्या घेतल्या मोठाल्या
प्रश्न नवा आला की कळते
कळायचे राहून गेले !
धाव धाव धडपडलो
किती जिंकल्या शर्यती
चौरस्त्यावर योग्य दिशेला
वळायचे राहून गेले !!
दिली भाषणे येथे तेथे
बरेच बोललो काही बाही
आप्त जवळच्याना थ्यांक यू
म्हणायचे राहून गेले !!!
सदा ठेवला गोड चेहरा
दिसू दिली ना लक्तरे
तरी नकळत माझे अश्रू
डोळ्यातून वाहून गेले !!!!
देश विदेशी झाल्या वाऱ्या
स्थळे माणसे किती पाहिली
अवती भवती शेजारी पण
बघायचे राहून गेले !!!!!
प्रत्येकाला दिले वचन मी
जाताना येतो म्हणुनी
वाट पाहणाऱ्याना पुन्हा
भेटायचे राहून गेले !!!!
— रचना : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
— संपादन :देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800