लग्न लग्न म्हणजे काय हो म्हणायचं
तुझा तो वाद माझा मात्र संवाद
आपल्या सोईप्रमाणे समोरच्याला गृहीत धरायचं
आणि ह्यालाच लग्न असं म्हणायचं
आयुष्य भराची साथ अशी मिळमिळीत का घालवायची
म्हणून थोडं तिखट थोडं मीठ
सगळ्या चवी गोड मानून चालायचं
आणि ह्यालाच लग्न असं म्हणायचं
रुसवे फुगवे मान-पान
सगळं हसत मुखाने झेलायचं
जेवताना मात्र दोघांनी एकत्रच बसायचं
अहो ह्यालाच तर लग्न म्हणायचं
विचार जुळवताना मतभेद कायम ठरलेले
कधी ह्याने कधी तिने माघार घेत
पुढे चालत राहायचं
वाद घालण्यात पटाईत असलो
तरी प्रेम करण्यात कमी नाही पडायचं
ह्यालाच लग्न असं म्हणायचं
लग्न लग्न म्हणजे काय हो म्हणायचं
खोडी काढत एकमेकांची
प्रेमाचं पांघरून घालायचं
न पटणारे गुण जरी जास्त असले
तरी सगळयांना सर्वगुण संपन्न
असंच सांगायचं
आणि ह्यालाच लग्न असं म्हणायचं
– रचना : राधा
– संपादक : अलका भुजबळ. 9869484800.