शुभवार्ता
आजही आपल्या समाजात मुलगाच हवा, हा अट्टाहास मोठ्या प्रमाणात आहे. गर्भात मुलगी आहे, असे समजताच बऱ्याचदा भ्रूण हत्या केली जाते. मुलगी जन्मलीच तर तिची उपेक्षा केली जाते. म्हणूनच सरकारला “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” असे अभियान हाती घ्यावे लागते.
या पार्श्वभूमीवर एका दाम्पत्याने छान आदर्श निर्माण केला आहे…
खरं म्हणजे एखाद्या नवं दाम्पत्याच्या जीवनात आनंदाचा आणि हर्षोल्हासाचा क्षण म्हणजे, त्यांच्या उदरी बाळ जन्माला येणं! आणि अशाच एका नवं दाम्पत्याच्या घरात लक्ष्मीच्या रुपात एक नन्हीं परी जन्मास आली.
त्या गोड परीच्या आगमनानं तिच्या आईबाबांसोबतच संपूर्ण परिवारात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मुलगी झाली, आनंद झाला असं म्हणत. मुलगी झाली म्हणून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या या आई- बाबाची ही कृती निश्चितच अनुकरणीय आहे.
हे आई- बाबा म्हणजे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सारडे गावातील निसर्गप्रेमी दांपत्य श्री प्रितेश तुकाराम म्हात्रे आणि सौ.प्रज्योति प्रितेश म्हात्रे होय.
या माता-पित्यांनी आपल्या लेकीच्या आगमनाच्या आनंदाने ममतेचा वर्षाव करत एक संकल्प केला. ह्या गोंडस फुलासारख्या लाडलीच्या आगमनानिमित्त सुंदर अशी फुलझाडांची फुलबाग तयार करायची आणि ती संकल्पपूर्ती त्यांनी प्रत्यक्षात केली देखील.
यासाठी प्रितेश म्हात्रे यांनी तब्बल ५ हजार रुपयांची विविध प्रकारच्या फुलझाडांची रोपटीं आणून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क येथे सारडे विकास मंचच्या टीम सोबत स्वतःही लागवड करून एक पर्यावरण पूरक कार्य करत निसर्गाच्या सुंदर कवेत रंगी-बिरंगी छटा उधळल्या.
आपल्या लेकीच्या आगमनाचा सोनचाफ्यासारखा सुगंध चारही दिशेला पसरविणाऱ्या या निसर्गप्रेमी दाम्पत्याने “मेरी बेटी, मेरा अभिमान” म्हणत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला यात काहीच शंका नाही!
ह्या सुंदर आणि पर्यावरण पूरक संकल्पपूर्ती कार्यात विशेष सहकार्य केलं ते श्री विलास पाटील सर, सुनिल पाटील साहेब, सारडे विकास मंचचे कार्याध्यक्ष श्री रोहितजी पाटील, सौ.स्नेहाताई पाटील, सौ ज्योतिताई विलास पाटील आणि परिवार, सौ कविताताई गावंड, गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष श्री देविदास पाटील साहेब, श्री आ.बा.पाटील, श्री अनिलजी घरत, अल्पेश जोशी, कांतीलाल म्हात्रे, त्रिजन पाटील, सौ जागृतीताई संदीप पाटील, सौ जयश्रीताई श्रीकांत पाटील, सौ मंदाताई पाटील, सौ उज्वलाताई पाटील, सेजल पाटील, प्रतिद्या पाटील, स्नेहित, रिया, मानवी दानिश, श्रीवेद तन्विर यांनी.ह्या फुलझाडांच्या रोपट्यांनां नर्सरी मधून आपल्या ऑटो रिक्षा मधून मोफत आणण्याचं काम केलं ते श्री अल्पेश जोशी यांनी.
अशाप्रकारे तयार झालेल्या ह्या रंगी-बिरंगी फुलबागेत बागडणाऱ्या फुलपाखरांसोबतच येथे येणाऱ्या पर्यटकांचे आशिर्वाद त्या छोट्या परीला नक्कीच लाभतील यात तीळमात्र शंका नाही.
– लेखन : अनिल घरत.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.