१. निसर्ग
सोनेरी चमचमती
रविकिरणे कोवळी
नाहती प्रात:काळी
दवबिंदू सह पाकळी..1
रंगीत फुल वेलीचा
सुगंध वायूसह पसरे
आनंदाने बागडती
त्यावरी फुलपाखरे… 2
पक्षीगण किलबिलती
मोदे त्यावरी डोलती
रंगीबेरंगी फुले उमलती
मोर रानी वनी नाचती..3
हिरवा पर्ण शालू नेसूनी
वसुंधरा ही सजधजली
वाट पाहे आदित्याची
उधळण करी सप्तरंगाची…4
कवेत सहज सर्व घेऊनी
दाखवी निसर्ग रम्य शोभा
दिव्यत्वाची दिसे आभा
कोण फुलवी ही प्रतिभा?.. 5
आदित्याच्या प्रसन्न दर्शने
सकलजन हो आनंदती
निसर्ग गंधित फुलण्याने
नियंत्याची किमया घडती… 6
— रचना : सौ. मीना घोडविंदे. ठाणे
२. वसुंधरा दिन
हे सूर्य नारायणा….
करिते मी तुज प्रार्थना
तळपणे तुझे अति वाढले
सारे प्राणीजात भयभीत झाले
नको होऊ क्रोधी, जरा शांत हो ……!!
तप्त उन्हाच्या तीव्र झळा लागता
भूमीला ही भेगा पडू लागती
पक्षी पाखरांची तगमग वाढती
पाणपोईची छोटीशी करु सुविधा….!!
एक एक रोपटे लावूनी
वसुंधरेला हरित करु या
पाण्याचा थेंब थेंब वाचवूनी
रक्षण करु या पर्यावरणाचे……..!!
वसुंधरा दिना निमित्त दृढ संकल्प
सकलांना ही घेऊ सोबतीला
उद्याच्या पिढीला आश्वस्थ करण्या
प्राणी अधिवास जपताना मनी नको विकल्प..!!
— रचना : डॉ. प्रभा वाडकर. लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800