नमस्कार, मंडळी.
अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचं निधन आपल्याला धक्का देऊन गेलं.
त्यांच्या जाण्याच्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार श्री जयप्रकाश दगडे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत व डॉ त्र्यंबक दूनबळे यांनी केलेलं त्यांच्या गाण्यांचं रसग्रहण आपण प्रसिद्ध केले.
कवी बा भ बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ गौरी जोशी कंसारा यांनी घडविलेलं त्यांच्या जीवन कार्याचे दर्शन व कवितांचे रसग्रहण वाचकांची दाद घेऊन गेले.
श्री विकास भावे यांच्या ओठावरचं गाणं या सदराला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्राप्त झालेल्या, निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे. कळावे, लोभ असावा.
आपलाच
देवेंद्र भुजबळ, संपादक
कोरोनाचा थकवा आणि उपाय ही खूप महत्त्वाची व उपयुक्त माहिती दिली सर,आपण.
या माहितीचा कोरोनातून बरे झालेल्यांना अनेक व्यक्तींना फायदा होईल. इतकी सविस्तर पण नेमकी माहिती मी पहिल्यांदाच वाचली.
– प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे, अकोला
आम्ही पुणेकर…
एकदम मस्त. ओघवती खुसखुशीत भाषा, पुण्याच्या सगळ्या ठळक जागांचा व व्यक्तींचा उल्लेख छान रितीने केला आहे. शेवटचे वाक्य पण चपखल. पुणेकरांचा पुण्याबद्दलचा अभिमान तिथले रस्ते हिरावून घेतांत हे पण लेखिकेनी समर्पक वाक्यात सांगीतले आहे. 👌👌
बोरकरांच्या कवितांचा सखोल केलेला अभ्यास व कवितांवरचे प्रेम जाणवते. खुप सुंदर शब्दांत कवितांचा घेतलेला आढावा मनाला भावाला. धन्यवाद.
– सौ. लीना फाटक, इंग्लंड.
एका महान नायकाची झालेली एक्झिट मनाला खूप वेदना देणारी आहे.. जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी या कलावंताचे विविध पैलू या मुलाखतीतून व्यक्त केले आहेत. आणि म्हणूनच हा कलावंत चिरकाल आपल्या स्मरणात राहील. या महान कलावंतांस भावपूर्ण श्रद्धांजली..! आपले मनपूर्वक अभिनंदन.
– बाळासाहेब जोगदंड.
श्री विकास भावे यांनी अनंत कणेकर
यांच्या कवितेच्या केलेल्या रसग्रहणा विषयी पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
काव्याचं रसग्रहण छान लिहिलंय. निसर्गरम्य वातावरणाचं दर्शन झालं.
असा अर्थ उलगडून दाखवला की ऐकणाराला गाणं ऐकायला आणखी मजा येते. काव्य, चाल चांगली आहे. ज्योत्स्नाबाईंनी गायल्या छान.चांगला उपक्रम आहे, चालू ठेवा.
– मधूवंती दांडेकर
विकास भावे यांनी अतिशय जुने गाणे आमच्यासमोर ठेवले आहे. माझी आजेसासू हे गाणे म्हणायची. त्यावेळचे अतिशय लोकप्रिय गीत आहे ते. आता संपूर्ण अर्थ सगितल्यावर कळले की एवढे लोकप्रिय का झाले ते. धन्यवाद विकासजी ! अतिशय सुंदर रसग्रहण दादा !
– दीपाली सुशांत.
गाणं परिचित. अनंत काणेकर या गाण्याचे कवि आहेत हे अनेकांना माहिती नाही. रसग्रहण वाचतांना कवीने केलेले निसर्गाचे वर्णन व त्याची दोन प्रेमीकांच्या भावनांशी केलेली तुलना उत्तम रीतीने मांडली आहे. अभिनंदन भावेजी.
– विवेक भावे
डॉ अंजुषा पाटील यांचा लेख आवडला. मुलांशी सुसंवाद साधणे अतिशय महत्वाचं आहे.
– मेघना साने.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण आपलं आयुष्य नक्कीच सुसह्य करू शकतो. खुपच प्रेरणादायी लेख.
डॉ. अंजूषा पाटील यांना खुप खुप धन्यवाद.
– सौ आकांक्षा गोखले.
संत नामदेव यांचे छान चरित्र. कुत्र्याच्या पाठीमागे संत एकनाथ तुपाची वाटी घेऊन पळाले होते .असं माझ्या वाचनात आलं आहे.
– सुरेखा बोर्हाडे
नमस्कार. आपला अंक वाचला आवडला. मा. विजय पवार यांनी लिहिलेला संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या वरील लेख मनापासून वाचला.
एकूण आपला अंक वाचनीय आहे.
लेखक पवार तसेच मा. संपादक श्री देवेंद्रजी यांचें हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
मा. श्री जयप्रकाश दगडे यांनी अभिनयाचा शहेनशहा असलेल्या मा श्री.दिलीपकुमार यांची घेतलेली मुलाखत पाहिली अन् वाचली.माझ्या सिने स्मृतींना उजाळा मिळाला आहे याबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.आपण ती मुलाखत पुन्हा पुनर्मुद्रित केली. खूप आनंद झाला आहे.धन्यवाद. शुभेच्छा
– नंदकुमार रोपळेकर, जेष्ठ पत्रकार, मुंबई
ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर यांची
न्युज स्टोरीटुडे, डॉ सुचिता पाटील यांनी शब्दबद्ध केलेलं कवितासंग्रहाचे परीक्षण वाचले.
घरबसल्या आम्हाला, आपण नित्यनेमाने जगाची सैर घडवत असता यासाठी खूप आभारी आहोत.
– सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्त पत्रकार, मुंबई
९-७-२०२१
नमस्कार वाचक हो,
८ जुलै २०२१ रोजी डॉ. गौरी कंसारा, न्यू जर्सी यांचा बाकीबाबांच्या कवितेवरील लेख न्युज स्टोरीवरती वाचला.
अप्रितम अशा पद्धतीने गौरी ताईंनी कविवर्य पद्मश्री बा. भ. बोरकर यांच्याविषयी, त्यांच्या कवितेंविषयी लेखन केले आहे.
कविमन कसे असते ते आपल्याला या लेखातून कळते. हळवे, प्रेमवेडे, निसर्गाच्या चमत्कारांनी भारावलेले.. एखाद्या कवितेबरोबर त्या कविविषयी – विशेष व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणे म्हणजे खास अशी मेजवानीच.
खरे कौतुक तर गौरी ताईंचे वाटते.
महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर असूनही त्या मराठी मातीशी, मराठी साहित्याशी जोडलेल्या आहेत.
बाकीबाबांच्या विषयीच्या लेखासाठी खूप धन्यवाद आणि पुढील लिखाणासाठी खूप शुभेच्छा.
असेच वरचेवर वाचकांना विविध प्रकारची मेजवानी देत चला.
– सौ. मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ.