वाचन हा आपल्या जीवनाचा अंगीकृत भाग असला पाहिजे. पुस्तक मग ते कुठलेही असो हातात आल्यावर त्याच्या पानांवरून नजर ही फिरलीच पाहिजे. वाचनाने आपल्या कक्षा रुंदावतात. जगात घडणाऱ्या घडामोडींबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल, नवनवीन टेक्नोलॉजीबद्दल, इतकेच काय पण मानवी मनातील गुंतागुंतीचे रहस्य पण आपल्याला कळते.
आपण सतत नवनवीन वाचत राहिले पाहिजे तरच आजच्या या आधुनिक युगात आपण सक्षमपणे आपली वाटचाल करण्यात यशस्वी होऊ. आपणच आपल्या उज्ज्वल भवितव्याचे साक्षीदार होऊ आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही न डगमगता, आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे आपले पाय भरभक्कम रोऊ.
अलीकडेच ओफ्रा विंफ्रे या लेखिकेचे “WHAT I KNOW FOR SURE” हे पुस्तक माझ्या वाचनात आले आणि खरोखरच या पुस्तकाने माझ्या अंतरंगात खळबळ माजली. माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. सकारत्मकतेने कसे जगावे याचे सखोल ज्ञान हे पुस्तक आपणास देते. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा मिळवायचा आणि तो पुरेपूर कसा उपभोगावा हे आपण यातून शिकतो. तुम्ही जगाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहता, तोच दृष्टिकोन तुम्हाला जगाच्या नजरेतून दिसतो. म्हणूनच आपण नियमितपणे वाचन केले पाहिजे.
– लेखन : मानसी लाड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.