Monday, June 30, 2025
Homeसाहित्यवारी : काही कविता

वारी : काही कविता

१. पंढरपूरची वारी

माऊलीच्या दर्शनासाठी गेलो
भवसागर नकळत होऊन गेलो
घेता हाती हात सुरकुतलेले
स्पर्श अध्यात्माचा हरखून गेलो

विठूच्या गजराने आसमंत दुमदुमला,
डोईवर तुळस, मुखी नाम ज्ञानोबाचे
टाळ, मृदुंग संगे टाळ चिपळ्यांचा
स्मरण श्वासात अन् हृदयी तुकोबाचे

भाव ऐहिक होऊन जायी कचरा
निर्माल्य होऊन जायी अहंकार
बंधूभाव, सौहार्दतेचा ठायी ठायी
निरागस, निष्पापतेचा जयजयकार

इथे पताका मिरवतो शांततेची
नसे युद्धाची करी कोणी भाषा
मिसाईलपेक्षा पणती मिणमिणती
परंपरा वारीची जपली जाते या देशा

अनोळखी अनामिक  चेहऱ्यांचा
युगानयुगे चाले भावनांचा उत्कट तांडा
दर्शनासाठी आसुसला विठू पंढरपुरी
चंद्रभागेचे अश्रू बनती श्रावणधारा ….

— रचना : मिलिन्द बल्लाळ. ठाणे

२. विठू नामाचा गजर

अवघे गरजे पंढरपूर
जाहला विठूनामाचा गजर //ध्रु//

रंगली रंगरंगोटी, दारी रांगोळी सुंदर.
रथ लावून तोरणे, सजली मखर.
कंठी हार, तुळशी माळा.
कपाळी चंदनाचा टिळा.
जयघोषाने गरजे पंढरपूर
जाहला विठूनामाचा गजर //१//

टाळ म्रुदुंग विना हाती.
वारकरी विठ्ठल गाणी गाती.
दिंडी चालली पंढरी
विठ्ठल उभा विटेवरी
आला आनंदाचा पूर
जाहला विठूनामाचा गजर //२//

दिंडी चाले पाई पाई.
विठ्ठल वसे ठाई ठाई.
वारकरी हरीनामात दंग
रंगी रंगला श्रीरंग
पंढरपूर संतांचे माहेर
जाहला विठूनामाचा गजर//३//

टाळघोष पडता कानी,
मुर्ती विठ्ठलाची असे ध्यानी.
रूप पाहून सुंदर, हरपली तहान भूक.
पाहे विठ्ठलाचे रूप, चरणी ठेवि मस्तक.
हरीनामाचा करतो जागर
जाहला विठूनामाचा गजर //४//

आम्ही विठ्ठलाचे वारकरी
पाई चालतो पंढरी.
महा पातके जळती, स्नान चंद्रभागेतीरी.
कर ठेवून कटेवरी, विठ्ठल उभा विटेवरी.
चरणी ठेवून मस्तक दूर झाला अंधार
जाहला विठू नामाचा गजर //५//

अवघे गरजे पंढरपूर
जाहला विठू नामाचा गजर

— रचना : सौ भारती वाघमारे. मंचर, जिल्हा-पुणे

३. अहंकार ! (काल्पनिक काव्य)

अहंकार नाही गेला
विठ्ठल नाही भेटला

वाकडा मनाचा गुंता
वेडा सुटता सुटता
भक्ती मार्गास लागला
विठ्ठल नाही भेटला

मी पणा आडवा येतो
जोरात अभंग गातो
धुळीत नाचू लागला
विठ्ठल नाही भेटला

बायको फोन करते
खुप सुचना करते
गुढ कोड्यात पडला
विठ्ठल नाही भेटला

व्यसने सोडली सारी
मनात वादळे तरी
मौन पाळून राहिला
विठ्ठल नाही भेटला

आली पंढरी आषाढी
मंदिरी भगवी गुढी
चरण स्पर्शून आला
विठ्ठल नाही भेटला.

— रचना : गज आनन म्हात्रे. करावेगाव, नवी मुंबई.

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील