नमस्कार मंडळी.
आज विजया दशमी, अर्थात दसरा. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने वाचू या काही काव्य रचना.
— संपादक
१. विजया दशमी…
झेंडूच्या फुलांचे । बांधले तोरण
सजले अंगण । रांगोळीने ॥ १ ॥
विजयी पताका । घेउनिया हाती
आनंदाने गाती । भक्ती गिते ॥ २ ॥
विजय सत्याचा । असत्याच्या वरी
वध अहंकारी । विचारांचा ॥ ३ ॥
स्वार्थी विचारांचा l नि अंधश्रद्धांचा
धर्मांध वृत्तीचा l अंत व्हावा ॥ ४ ॥
तोडुया बंधने । जुनाट रूढींची
ज्योत विज्ञानाची । पेटवावी ॥ ५ ॥
दृष्ट प्रवृत्तींचे | करावे दहन
एकत्र स्वजन | करुनिया ॥ ६ ॥
विकास करावा | पर्यावरणाचा
नारी रक्षणाचा | वसा घ्यावा ॥ ७ ॥
जागतीक शांती | धर्म समभाव
असावा प्रभाव | शुध्दतेचा ॥ ८ ॥
माता कालिंकेचे। स्मरण करिते
भावे विनविते । स्नेहलता ॥ ९ ॥
— रचना : स्नेहलता झरकर-अंदुरे. धाराशिव
२. देते मी शुभेच्छा…
लाख लाख मी देते शुभेच्छा शुभमुहुर्तावरी
तुमच्यासाठी दसरा भरू दे सोन्याच्या घागरी…
सखसमृद्धी घरोघरी ती पाणी भरो लक्षुमी
जीवनात ना कधी पडावी आपणा काहीही कमी
जीवन व्हावे सरिता आपुले नीतळ जलधीपरी
लाख लाख मी देते….
निकोप आपली मने रहावी शुद्ध मेघ बरसावा
सौहार्दाचे करू या शिंपण प्रेमवेल बहरावा
षड्रिपूंना जिंकून घेऊ साधूसंतांपरी
लाख लाख मी देते…
शांती नांदो जगात साऱ्या वैरभाव संपावा
माणूस आणि माणूसकीने हर दुवा सांधावा
बहरून यावी जीवनवेल ही जावी गगनावरी…
लाख लाख मी देते…
संजीवन हा जीवन मंत्र अमृत कुंभ भरावा
सहजतेने हात आपला प्रेमभरे धरावा
बीजमंत्र हा सर्व सुखाचा आपण धरूया करी
लाख लाख मी देते…
— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
३. दैत्यखोरं…!
माणसासारखे वागून,
माणूस व्हावे तू..!
सोडावे स्वार्थी पण
अंतरात जागून…!
करावे हद्दपार…
मनाचे दुर्गुण..!
बुरसटलेल्या रुढी-परांपरा
मुळा-सगट उपटून…!
व्हावे माणूस तू…
मिथ्ये सत्य जाणून…!
इथे स्वर्ग भाष्यील तू…
भुतली राहून..!
एक माणूस खरा…
भेद उगा कशाला…!
रक्तचा शोधला झरा…
सागर आटला कशाला…!
जा विसरून सारे…
माणूसकीचे वैर…!
कर सिमाउल्घोन…
मन, दैत्यखोरं..!
— रचना : बबनराव वि.आराख. बुलडाणा
४. दसरा
नवरात्र जागरण, आज सोन्याचा दिवस,
झाला असुरांचा वध, भयमुक्ती गेला त्रास,
आनंदाच्या या सणाची वाढवावी हो गोडी,
आनंदाची पखरण, आठवण वेळोवेळी,
अपट्याची पाने वाटू, सोन्यासारख्या लोकांना,
काही हेच माझे सखे, भेट देऊ वा शुभकामना,
नात्यांची, मैत्रीची ही वीण, घट्ट करू आज खरी,
गोड-धोड खाऊ घालू, रांगोळी तोरणे ही दारी,
उत्साहाने, उल्हासाने, साजरे हे करू सण,
विजयाचे प्रतीक, गाऊ सत्य, शस्त्रगान,
घेऊ नवीन प्रतिज्ञा, आत्मरक्षण करुया,
निग्रह करू मनाचा, माणसांना जागवूया…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
दसरा निमित्ताने काव्य रचना, सर्व कवी कवयित्रींच्या कविता उत्कृष्ट आहेत.
गोविंद पाटील जळगाव.