Wednesday, February 25, 2026
Homeसाहित्यवेड्यांचा बाजार, शहाणे बेजार !

वेड्यांचा बाजार, शहाणे बेजार !

तुमच्या लक्षात आलेय का ? आता या जगाला, समाजाला शहाणी, विद्वान, अभ्यासू माणसे नकोशी झाली आहेत. त्याऐवजी कशाचेही सोयरसुतक न मानणार्‍या “महान” : व्यक्तींशी तुम्ही हात मिळवणी करणारे असाल तरच आजच्या जगात तुमचा निभाव लागेल.

गेल्या काही दशकात धुमाकूळ घातलेल्या संगणक क्रांतीने, त्यानंतर आलेल्या समाज माध्यमांनी जगाचा, समाजाचा चेहरा आरपार बदलून टाकलाय. यापूर्वी देखील अशा तीन चार क्रांतीच्या परिवर्तनशील अनुभवातून जग गेले आहे. पण आताचे बदल हे अभूतपूर्व स्वरूपाचे असे आहेत.

पूर्वी सज्जन, शहाणे, विद्वान, तज्ञ, अभ्यासू व्यक्तींना समाजात मान सन्मान होता. त्यांच्याकडे आदराने, सन्मानाने, अपेक्षेने बघितले जायचे. आता त्यांच्याकडे तुच्छ नजरेने बघितले जाते. समाजाला अशा मंडळीची अडचण वाटते. त्यांना रस्त्यावरचा अडचणीचा धोंडा समजले जाते. उलट कामचलाऊ, फारसा विचार न करणारी, खोलात न शिरणारी, प्रश्न, शंका न विचारणारी मंडळी हवीहवीशी वाटतात. वरवरची माहिती, अर्धवट ज्ञान म्हणजेच खरे ज्ञान अशी खोटी समजूत झाल्याचा हा परिणाम आहे.

पूर्वी नव्या संशोधनासाठी, अभ्यासासाठी, समस्या सोडविण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी लागत असे. ग्रंथ वाचायचे, त्याचे विश्लेषण करायचे, अर्थ समजून घ्यायचा, ते सिद्ध करण्यासाठी प्रयोग करायचे अशा चक्रातून जावे लागत असे. याला साधना, तपश्चर्या म्हणत.आता संगणक सगळे काम चटकन करणार.प्रयोग करण्याऐवजी सिम्युलेशन ने पटकन चांगले रिझल्ट मिळणार. सगळी ग्रंथ संपदा, हवी असणारी माहिती हाताच्या मुठीत, मोबाईल वर, संगणकावर क्षणात मिळणार. घराबाहेर जाऊन पायपीट करायची गरज नाही. रात्रीचे दिवे जाळायची गरज नाही. कुण्या तज्ञ व्यक्तीला प्रश्न, शंका विचारण्याची देखील गरज नाही. पण या शॉर्टकटने तुमची बुद्धी कितपत तेज होईल, तुम्ही किती हुशार, शहाणे व्हाल देवच जाणे. आता त्या प्रशस्ती पत्राची गरज देखील राहिली नाही कुणाला. तुमचे महत्व, तुमचे शहाणपण, तुमची लोकप्रियता ही लाइक्स, फॉलोअर्स यातून मोजली जाते. आता तुमच्या पदव्या, ग्रेड, गुण यांना फारशी किंमत नाही. म्हणजे सुवर्णपदक, गुणवत्ता धारक मंडळी तर आजच्या जगात हास्यास्पद!

आपल्याला पूर्वी याची सवय नव्हती. अभ्यास करावा लागे, परिश्रमा शिवाय पर्याय नव्हता. हुशार प्राध्यापकाची गरज होती. ते लक्षात राहायचे जन्म भर. त्यांना मानाचे स्थान होते प्रत्येकाच्या आयुष्यात. आता त्यांची गरज उरली नाही. ती मंडळी अल्पसंख्याक, हास्यास्पद झालीत. सुमार प्राध्यापकांची संख्या भूमिती श्रेणीने वाढली. ट्युशन क्लासेस, जुगाड, टेस्ट क्रैक करण्याचे विशिष्ट तंत्र अशा शॉर्टकट तंत्रांचा बोलबाला झाला. तुम्हाला काय, किती येते, समजते, तुम्ही किती हुशार, अभ्यासू आहात, तुमची किती मेहनत करण्याची तयारी आहे, नवनवे शिकण्याचा, जाणून घेण्याचा तुम्हाला कितपत ध्यास आहे हे कुणीही विचारत नाही. विद्यार्थी, पालक सगळ्याची मनोवृत्ती आरपार बदलली आहे. किती समजले यापेक्षा किती गुण मिळाले हे महत्वाचे. सगळा आकड्यांचा खेळ !
खरे तर हा विरोधभास वाटतो. सामाजिक प्रगतीसाठी, आपल्या स्वतंत्र ओळखीसाठी आपले वेगळेपण महत्त्वाचे असायचे. आता तुम्ही वेगळे असाल तर समाजापासून एकटे पडाल. गर्दी पासून दूर फेकले जाल .

हे बदल एकाएकी झालेले नाहीत. आपल्या कळत नकळत गेले काही वर्षे हे इंटरनेट, संगणक क्रांतीचे जाळे झपाट्याने, आपल्याला लक्षातही येणार नाही इतक्या वेगाने पसरत गेले.आपण त्यात खुशीने फसत गेलो. भ्रष्टाचार, घाणेरडे राजकारण, दूषित वातावरण, पोखरत गेलेली लोकशाही, बेगडी स्वातंत्र्य हे सगळे सगळ्यांनी आनंदाने स्वीकारले. आपल्याला कडक शिस्तीची शाळा नको असते. आपल्याला उत्तम गुणवत्ता असलेले प्राध्यापक नको असतात. शुद्ध चारित्र्य असलेल्या पुढाऱ्यांना आपण निवडून देत नाही. नियम पाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत नाही. सेवाभावी नेत्यांना किंमत नाही. उलट कसलेही कष्ट न घेता फुकटात, त्वरेने काम झाले की आपल्याला आनंद होतो. झटपट निकाल मिळाले की आपल्याला समाधान मिळते. राजकारण्याच्या भ्रष्टाचाराला नावे ठेवण्याऐवजी त्याच तत्वाला (!) मान्यता देण्यात आपल्याला धन्यता वाटते.

मग आधीचे विद्वान संशोधक, साधना करणारे कलावंत, समीक्षक, चारित्र्य संपन्न देशभक्त, समाजसेवक हे सगळे मूर्ख होते का ? ज्यांच्यामुळे आपली संस्कृती, प्रगती, इथवर पोहोचली, त्यांचे काहीच महत्व नाही का ?आतापर्यंतची आपली समृद्ध वाटचाल हे सगळे निरर्थक होते का ? मुळीच नाही ! पण आपल्या ध्यानी मनी नसलेल्या करोना विषाणूंने जसे आपल्या गाफिल आयुष्यावर आक्रमण केले, तसेच आक्रमण आपल्याला बेसावध करत या संगणक डिजिटल क्रांतीने देखील केले. आपल्याला आळशी बनवले.आपल्या टोकदार बुद्धीला निकामी केले. आपण विवेकाने विचार करणे सोडून दिले. समाज माध्यमाची अशी काही गुंगी आपल्यावर चढली की त्या नशेत आपल्यासाठी चांगले काय, वाईट काय याचा तारतम्याने विचार करणेच आपण सोडून दिले. उत्तमाचा ध्यास, बुद्धीची कास, खोलवर अभ्यास, याचा पाठलाग करण्याऐवजी आपण या इंटरनेटच्या मृगजळामागे धावत सुटलो.

आता तर त्याच्या सोबतीने ए आय,एम एल, नावाची नवी भुते आपल्या पाठीशी लागली आहेत. गंमत म्हणजे ही त्या करोना सारखी नैसर्गिक दैवी आपत्ती नाही. हे सगळे आपणच निर्माण केलेले नवे तंत्रद्न्यान आहे जे केवळ आपल्या मनावर, बुद्धीवर आक्रमण करून थांबणारे तंत्र नाही. ते आपल्याबरोबर आपल्या भवतीच्या समाजाचा देखील ताबा घेत आक्रमण करीत आहे.त्याचा वेग अचंबित करणारा आहे. त्याचे परिणाम संभ्रमित करणारे असतील. म्हणूनच सुरुवातीला म्हटले, आता शहाण्याची गरज नाही.या प्रवाहात सहज विचार न करता वाहवत जाणाऱ्या निर्बुद्ध लोकांचा हा जमाना आहे.

मग शहाण्या लोकांनी काय करायचे ? सध्या तरी आपल्या कोषात जाऊन आपले काम करीत स्वस्थ बसायचे. क्रांतीच्या भानगडीत न पडता, समाज बदलण्याचा अट्टाहास न करता सध्या तरी स्वस्थ, शांत रहायचे. कारण तुम्ही कितीही आरडाओरडा केला तरी तुमचे कुणी ऐकून घेणार नाही. तुम्ही एकटे पडाल. तुम्हाला वाळीत टाकले जाल. नवे काही सांगू पाहणाऱ्या सॉक्रेटिस चे काय झाले ? चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकाराम यांचे काय झाले ?
ते जुने जाऊ द्या..आता आता त्या प्रशांत किशोर चे बिहारमध्ये काय झाले ? तत्वनिष्ठ आय ए एस अधिकारी, कडक शिस्तीचे कुलगुरू, प्रामाणिक डॉक्टर, वकील..या मंडळीचे काय होते आजच्या जगात ? त्यांना घरी बसावे लागते. चूप केले जाते.त्यांची फजिती होते. त्यांना नामुष्की सहन करावी लागते. सुशिक्षित, सुसंकृत म्हणविणारे पालक मुलांचे प्रवेश करताना शिक्षक, प्राध्यापक कसे चांगले आहेत हे नाही बघत. कॅम्पस बघतात. एअर कंडिशन्ड इमारती बघतात. बाहेरचा झगमगाट बघतात. शिस्त नको असते.स्वैर स्वातंत्र्य हवे असते. आपणच हे असे बदलत चाललो आहोत. कुटुंब व्यवस्था, लग्न संस्था, नीती अनीतीच्या कल्पना देखील बदलत आहेत. दोष कुणाला देणार ? आपणच हे निर्मिले. आपणच हे स्वीकारले. आपणच या दलदलीत फसलो, वाहवत गेलो. उद्या काय होईल, कुणालाच काही माहिती नाही. वर गेलेल्या आपल्या आधीच्या पिढीला तरी कुठे काय माहिती होते, हे जग इतक्या वेगाने, इतके ओळखण्या पलीकडे बदलेल म्हणून ? ही आधीची सर्व वर गेलेली मंडळी फिदीफिदी हसत असतील आपल्या आजच्या जगाकडे बघून! उद्या परवा आपणही हसूच की या इथल्या उद्याच्या परवाच्या पिढीकडे बघून ! ते म्हणतील बरे झाले आपण या वेड्यांच्या बाजारातून निघून आलो !

डॉ विजय पांढरपट्टे

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments