Wednesday, September 10, 2025
Homeलेखव्यंग कथा

व्यंग कथा

आमरण उपोषणावर पीएचडी !

कसलीही महत्वाची मीटिंग वगैरे नसल्याने कुलगुरू आपल्या दालनात निवांतपणे बसले होते. सहज काही कामाने आलेल्या प्रकुलगुरूशी गप्पा मारत होते. तेव्हढ्यात शिपायाने वर्दी दिली.
“सर, दोन तीन पीएचडी प्रवेश घेतलेले विद्यार्थी भेटायला आले आहेत. त्यांना तुमच्याशी चर्चा करायची आहे. सल्ला हवा आहे म्हणतात.”
“दे पाठवून” कुलगुरूंनी परवानगी दिली.
“आपली पीएचडी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालीय ना ?” त्यांनी प्र कुलगुरू ना विचारले.
“हो सर. कसलीही अडचण न येता वेळेत नियमाप्रमाणे आपण सर्व शाखात प्रवेश पूर्ण केलेत. आता विषय निवड करून, संदर्भ शोधून मुलानी कामाला सुरुवात करायची.” कुलगुरूंनी समाधान व्यक्त केले.

कुलगुरूंच्या दालनात कुणालाही सहज प्रवेश मिळत असे. ते शांतपणे ऐकून घेत. नियमात बसत असेल तर तक्रारीचे तिथल्या तिथे निवारण होत असे. जे कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे शक्य नाही त्याला स्पष्ट नकार मिळत असे. कुठलेही काम, निर्णय पेंडीग ठेवायचे नाही हा त्यांचा नियम होता.तीन विद्यार्थी आले.त्यात दोन मुली होत्या.
“बसा. बोला काय समस्या आहे ?” मुले उभीच राहिली. एकमेकाकडे बघत. “संकोच करू नका. बसा अन् नीट सांगा काय ते. प्रत्येकाचा वेळ महत्वाचा असतो. हे तुम्हाला आता पासूनच कळायला हवे.”
विद्यार्थी बसले. दोघांनी एका मुलीकडे बघत खूण केली, तू बोल म्हणत..
ती धीट होती. आपली ओढणी सावरत ती बोलायला लागली.
“सर आमचे रजिस्ट्रेशन होऊन दोन महिने झाले. पण आम्हाला पीएचडी चा विषय भेटत नाही !”
तिचे हे विचित्र बोलणे ऐकून कुलगुरू गालातल्या गालात हसले. त्यांनी प्र कुलगुरू कडे हसून बघितले.
“विषय भेटत नाही म्हणजे काय ? विषय म्हणजे तुमची मैत्रीण नाही अशी सहज भेटायला ! तुम्ही आपल्या गाईड शी चर्चा करा. लायब्ररीत जा. संदर्भ ग्रंथ वाचा. तुम्ही अन् तुमचे गाईड मिळून विषय ठरवायचा असतो.”
विद्यार्थी एकमेकाकडे बघायला लागले. प्र कुलगुरूंनी कुलगुरूंच्या कानात काहीतरी सांगितले.
गाईड मंडळींना विषय सुचत नाहीत. समजत नाही. त्यांना फक्त जास्तीत जास्त विद्यार्थी हवे असतात गाईड करायला. मुलानी स्वतःचे स्वतः बघून घ्यावे. हवे तर पैसे देऊन इतर कुणाचे मार्गदर्शन घ्यावे. याची त्यांना हरकत नसते. आमच्या कडे इतके विद्यार्थी पीएचडी करताहेत, इतके पीएचडी गाईड केले या संख्येशी त्यांना मतलब असतो. आपला बायोडेटा फुगवायचा असतो.

कुलगुरूंना विद्यार्थ्यांची अडचण समजली.
“तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट मध्ये आहात,” त्यांनी विचारले. समाज शास्त्र अन् राज्य शास्त्र विभागाचे ते विद्यार्थी होते.
“तुमच्या विषयात, प्रश्न समस्या शोधणे किंवा संशोधन करणे, तसे सोपे असते. कारण समाजात समस्यांच समस्या असतात. अन् सरकारातील राजकारणी मंडळी या समस्यांना खतपाणी घालत तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांना पीएचडी करायला विषय
पुरवीत असतात !”
कुलगुरूंनी मुलाना रिलॅक्स केले. ते एकमेकाकडे बघायला लागले.
“मी तुम्हाला एक ज्वलंत, समयोचित विषय सुचवू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. अभ्यास करावा लागेल. भरपूर डेटा गोळा करावा लागेल. तुम्ही आजुबाजूला नीट बघा. म्हणजे “उघडा डोळे बघा नीट”.. ते एका चॅनेल चे बोध वाक्य सांगते तसे. तुम्हाला अनेक प्रश्न दिसतील अवती भवती. वर्षानुवर्षे न सुटलेले, भिजत पडून असलेले प्रश्न. त्यासाठी मग समाजात वेळोवेळी सुरू असलेली, पूर्वापार चालत आलेली आंदोलने. आता स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा खूप अभ्यास झालाय. त्यावर बरेच ग्रंथ लिहिल्या गेलेत. पण सामाजिक चळवळी नेमक्या कशा, केव्हा सुरू झाल्या ? उदाहरणार्थ पहिले आमरण उपोषण कुणी सुरू केले ? कोणत्या मागणी साठी केले? सर्वात जास्त वेळा, सर्वात जास्त दिवस आमरण उपोषण कुणी केले ? त्याचे फलित काय झाले ? हे शोधून काढा. मोर्चा काढण्याची कल्पना कुणाची ? त्यात वेगवेगळ्या मजेशीर घोषणा देण्याची कल्पना कुणाची ? मोर्चा, उपोषण म्हणजे झेंडे आले, गळ्यात उपरणे आले, मंडप आले, घोषणा फलक आले.. हे सगळे नेपथ्य कुणी शोधले ? राजकीय रंगमंचासाठी संहिता कोण लिहिते ? याचा खोल अभ्यास करा. अशा आंदोलनासाठी वापरण्यात येणाऱ्या मैदानाला देखील इतिहास असतो. एक परंपरा असते. त्याचा शोध घ्या.त्या सर्व प्रसंगाचे विश्लेषण करा. फसलेले आंदोलन, सर्वात यशस्वी ठरलेले आंदोलन, फुसका बार ठरलेले आंदोलन अशी वर्गवारी करून नीट सांख्यिक दृष्टी कोनातून विश्लेषण करा. कशी वाटते कल्पना ?”
कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना गुगली सारखा प्रश्न विचारला. प्र कुलगुरू देखील चकित झालेले दिसले.

“पण सर अशा विषयाला कमिटी ची मान्यता मिळेल ?” एका विद्यार्थिनीने हिंमत करून विचारले. कुलगुरू मोकळेपणाने बोलताहेत हे पाहून त्यांनाही धीर आला. मुले आता मोकळेपणाने बोलायला लागली.
“का नाही मिळणार मान्यता ? पीएचडी चे विषय प्रासंगिक हवेत. काळाशी सुसंगत हवेत. भविष्याचा वेध घेणारे हवेत. त्यामुळे मी सुचविलेला विषय अगदी ज्वलंत आहे. सरकार विरोधात असहकार पुकारण्याची अहमहमिका लागली आहे आजकाल. मग ते कुठल्याही पक्षाचे सरकार असो. कुठल्याही राज्यातले असो किंवा केंद्रातले असो. प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा. अवाजवी मागण्या करायच्या. त्यासाठी कायदे कानून, एवढेच नव्हे तर संविधान देखील अपमानित करायचे,पायदळी तुडवायचे. म्हणजे मेरे मुर्गिकी एकही टांग हा अट्टाहास.. त्यासाठी उपोषण, ताडण, असहकार, हिंसाचार, जाळपोळ, अशी सगळी शस्त्र उपसायची.. सरकारला नामोहरम करून सोडायचे. व्यापाराचे नुकसान करायचे. शिक्षणावर बोळे फिरवायचे, चांगल्या उभरत्या अर्थ व्यवस्थेचा सत्यानाश करायचा. अन् योग्य असो नसो, न्याय्य असो नसो, आपले म्हणणे मान्य करून घ्यायचे. त्यापोटी दुसऱ्यावर अन्याय झाला तरी पर्वा नाही. आमचा स्वार्थ तेवढा मोठा. तुम्ही खोलात जाऊन अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. हे उपोषण, हे आंदोलन, हे मोर्चे सगळे राजकारणी कट कारस्थान असते फार मोठे. म्हणतात आमरण, पण वाट बघत असतात उपोषण सोडवायला कोण कधी कसा येईल याची ! कधी कधी तर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तोंडाला पाने पुसल्या गेलीत तरी हे माघार घ्यायला तयार होतात. पण वरवर दाखवायचा हावभाव अर्थातच वेगळा असतो. आपलाच विजय झाला हे दाखवायचा अभिनय असतो. सगळे खोटे मुखवटे असतात झालं.

या सगळ्या मनोवृत्तीचा अभ्यास करा. जेव्हा खरेच कुणा वर्गावर, जातीवर, विशिष्ट समुदायावर खरेच अन्याय होत असेल तर त्यासाठी लढा देणे केव्हाही उचितच. वर्षानुवर्षे जर कुणाला दुर्लक्षित केले जात असेल, बाजूला फेकल्या जात असेल तर तो अन्याय दूर व्हायलाच हवा. पण आजकाल स्वतःचे पुढारीपण सिद्ध करण्यासाठी आंदोलने केली जातात. वारंवार सरकारला वेठीला धरले जाते.अशा सगळ्या आंदोलनाचा, उपोषणाचा, मोर्चाचा सखोल अभ्यास करा. त्यासाठी वेगवेगळ्या वर्गातील, समाज घटकातील लोकांच्या मुलाखती घ्या. त्यांचा परस्पर संबंध शोधून काढा. कॉज अँड इफेक्ट अशी कारण मिमांसा करा. खरे तर हा एक फार मोठा सामाजिक, राजकीय, आर्थिक पट आहे. त्यामुळे तुम्ही तिघेही एकत्र मोठा प्रोजेक्ट करु शकता. म्हणजे विषयाची विभागणी करून, एकमेकाशी चर्चा करून, एकमेकाचे निष्कर्ष वेगवेगळ्या अँगलने तपासून छान प्रबंध लिहू शकता. यासाठी तुम्हाला मीडियाची मदत घेता येईल. पण ती घेताना सांभाळून ! दक्षता घ्या. कारण मिडिया पक्षपाती असते. एका बाजूला झुकली असते. सगळ्याच बातम्या विश्वासार्ह नसतात. तूम्हाला दोन पेपरात एकाच बातमीचे दोन चेहरे दिसतील ! त्यातला खरा कोण, मुखवटा कुठला हे शोधणं सोपं काम नाही. तसंही पीएचडी चे संशोधन म्हणजे शिव धनुष्य असते. उचलायला कठीण. आता या धनुष्याचे आमच्या च प्राध्यापक मंडळींनी कचकड्याचे बाहुले करून टाकले हा भाग वेगळा. पण ज्याअर्थी तुम्ही विषय निवडीसाठी थेट माझ्या कडे आलात त्यावरून तुम्ही गंभीर आहात असं मी गृहीत धरतो.”
कुलगुरूंनी प्रश्नार्थक मुद्रेने विद्यार्थ्याकडे पाहिलं.
“सर आम्ही सिरीयसली अभ्यास करू तुम्ही सुचविल्या प्रमाणे. आम्हाला फ्रेम करून भिंतीवर टांगण्यासाठी नकोय पीएचडी.आम्ही चांगले संशोधन करून ती कमवू. तशी पीएचडी हातात घेताना आमचाच आम्हाला अभिमान वाटेल असा प्रबंध लिहू.
“गुड देन.. आल द बेस्ट.. तुम्हाला या प्रोजेक्ट साठी काही अर्थ सहाय्य लागलं तर ते विद्यापीठाकडून मिळेल. कारण समाजाचे डोळे उघडणारं कार्य आपल्यालाच करायचं आहे. दिशा दाखवण्याचं काम. तेच तर शिक्षणाचं उद्दिष्ट आहे.”

भारतीय प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी नको म्हणत असतानाही कुलगुरूंच्या पाया पडले. तेव्हा प्र कुलगुरू देखील अभिमानाने हसले. विद्यार्थी जाताच शिपायाने कुलगुरू समोर कुणीतरी पाठवलेलं निवेदन ठेवलं. कुण्या तरी विद्यार्थी संघटने च्या कार्यकर्त्याने कसल्या तरी मागणी साठी आमरण उपोषणाची नोटीस दिली होती ! हसून त्यांनी तो कागद पुढील कार्यवाही साठी प्र कुलगुरू ना दिला !!

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
अजित महादेव गावडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on माझी जडणघडण : ६५