महिन्याला फी घेऊन चालणारी अनेक वृद्धाश्रमे राज्यात आहे मात्र नेवासाफाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमाची वृद्धांसाठी निशुल्क सेवा कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी वृद्धाश्रम भेटी प्रसंगी बोलतांना नुकतेच काढले. वृद्धाश्रमाच्या नवीन जागा खरेदीसाठी आर्थिक योगदान उभे करू व शरणपूर वृद्धाश्रमाला पाठबळ देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.
मुंबई स्थित असलेल्या व शासनाचे माहिती संचालक म्हणून काम केलेले व शरणपूर वृद्धाश्रमासाठी ऑनलाइन निधी उपलब्ध करून देणारे श्री देवेंद्र भुजबळ यांनी नुकतीच नेवासाफाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमाला भेट दिली यावेळी त्यांचा शाल श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलतांना श्री देवेंद्र भुजबळ म्हणाले की दीड वर्षांपूर्वी पत्रकारितेतील विद्यार्थी घेऊन या वृद्धाश्रमात आलो होतो तेव्हापासून आजपर्यंत या वृद्धाश्रमाचे चालक रावसाहेब मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी निष्काम वृत्तीने येथे सेवा दिली व देत आहे हे पाहून कौतुक वाटले येथील कार्याने मी भारावून गेलो म्हणून माझ्या सहकाऱ्यांच्या खंबीर साथीने मी येथे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे व करीत राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री देवेंद्र भुजबळ बोलतांना पुढे म्हणाले की आज राज्यात विविध ठिकाणी पाच, दहा, पंधरा हजारापासून, पासष्ट हजार रुपये मासिक फी घेणारे वृद्धाश्रम आहेत. आजच्या काळात निष्काम वृत्तीने वृद्धाश्रम चालवणे अवघड बाब आहे मात्र शरणपूर वृद्धाश्रम येथे ते कार्य होत आहे म्हणूनच सेवाभावी वृत्ती पाहून या वृद्धाश्रमाला जोडलो गेलो आहे पुढे ही निश्चितच या वृद्धाश्रमाला कर्तव्य समजून साथ देण्याचा प्रयत्न करेन असे देवेंद्र भुजबळ यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती दीपाली मुळे यांच्या वतीने वृद्ध महिलांसाठी आणलेल्या साड्यांचे वाटप श्री देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. वृद्धाश्रमाच्या सदस्य शिक्षिका सौ.सुप्रिया झिंजुर्डे यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,
गोरक्षनाथ आरगडे, वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर, भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई अवचरे, वृद्धाश्रम कमिटी अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघ, अभय मोहिते, राजेश कडू, शिक्षिका मिनाक्षी अवचरे, सौ.सुप्रिया झिंजुर्डे, सानिका गवळी, सौ.दीपमाला झिंजुर्डे, शिक्षिका श्रीमती दीपाली मुळे, सौ ज्योती मगर यांच्या वृद्धाश्रमातील सदस्य उपस्थित होते. संतोष मगर यांनी आभार मानले.

– लेखन : सुधीर चव्हाण, नेवासा