हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती साजरी होत आहे. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी तर मृत्यू २७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाला. त्यांच्या जीवन कार्याचा अतिशय सुरेख वेध, आपले मित्र, दैनिक प्रहार चे संपादक डॉ सुकृत खांडेकर यांनी त्यांच्या आजच्या प्रहार मधील प्रदीर्घ लेखात घेतला आहे. हा लेख पुढे सादर करीत आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खरोखरच अजब रसायन होते. केवळ महाराष्ट्रतच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांच्या नावाचा दबदबा होता. केवळ मराठी लोकांमधेच नव्हे, तर अमराठी लोकांमध्ये विशेषतः हिंदी भाषिकांमध्ये त्यांच्याविषयी निस्सीम आदर होता. मुंबईत राहून राष्ट्रीय नेता म्हणून प्रतिमा झालेले ते एकमेव नेते होते.
शिवसेनाप्रमुख काय म्हणतात, याकडे सर्व देशाचे लक्ष असे. सर्वसामान्य जनतेचे ते श्रद्धास्थान होतेच पण कोट्यवधी जनतेचे ते हिंदुहृदयसम्राट होते.
दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांनी केलेल्या आंदोलनात उद्ध्वस्त झाली. पाठोपाठ उत्तर प्रदेशातील कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त झाले. बाबरी मशीद कोणी पाडली याची जबाबदारी कोणी घेईना. ज्यांनी आंदोलन सुरू केले, तेच दुःख व्यक्त करू लागले. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले, जर बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान वाटतो… शिवसेनाप्रमुखांच्या या वक्तव्याने ते देशभर घराघरात पोहोचले व हिंदूंचे तारणहार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.
बाबरी कोसळल्यावर उत्तर प्रदेशात काहीच घडले नाही. पण मुंबईत डिसेंबर १९९२ व जानेवारी १९९३ अशा दोन वेळा भीषण दंगली झाल्या. त्या दंगलीने मुंबईत एक हजारांवर लोकांचे बळी घेतले. दंगल व जाळपोळीत मुंबईतील हिंदूंची घरे वाचवण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली. म्हणूनच हिंदूंच्या मनात शिवसेनाप्रमुखांनी कायमचे मानाचे स्थान मिळवले.
शिवसेनाप्रमुखांनी मुंबईतून कम्युनिस्टांना जवळजवळ संपवलेच. काँग्रेसला संकुचित केले. समाजवादी बाद केले. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांशी त्यांनी राजकीय शत्रुत्व ठेवले पण कोणाला त्यांनी दुष्मन म्हणून वागवले नाही. मराठी माणसाच्या हिताच्या आणि हिंदुत्वाच्या भूमिकेच्या जो कोणी आड येईल त्याला आडवा करण्याचे धोरण शिवसेनाप्रमुखांनी
सदैव रावबले.
शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशी व नारायण राणे असे राज्याला दोन मुख्यमंत्री दिले. दोन डझन जणांना तरी केंद्रात मंत्रीपद मिळवून दिले. चार-पाच डझन जणांना राज्यात मंत्रीपदे दिली. एक डझनापेक्षा जास्त जणांना मुंबई महानगराच्या महापौरपदाच्या खुर्चीवर बसवले.
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्याशी थेट संबंध राखलेल्या शिवसेनाप्रमुखांना राज्य व देश-पातळीवर स्वतःसाठी कोणतेही सत्तेचे उच्च पद मिळवता आले असते. पण त्यांनी आयुष्यात स्वतःसाठी काही घेतले नाही की, स्वतःला लाल दिव्याच्या मोटारीचा हव्यास कधी बाळगला नाही. आपला शिवसैनिक मोठा झाला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. मराठी माणसाला सन्मान मिळाला पाहिजे यावर त्यांचा भर होता. इंदिरा गांधी व सोनिया गांधींना थेट आव्हान देणारे ते देशातील एकच नेते होते. परिणामाची पर्वा न करता त्यांनी नेहमीच धाडसी निर्णय घेतले आणि मराठी माणलाला हिंमत देऊन मुंबईत ताठ मानेने उभे केले.
मराठी माणलाला दिलेला विश्वास, दिलेली संजीवनी कधीच विसरता येणार नाही, म्हणूनच मोडेन पण वाकणार नाही, अशी मानसिकता त्यांनी मराठी माणासांत निर्माण करून दाखवली. मराठी अस्मिता राज्यात आणि हिंदुत्व देश पातळीवर हा त्यांनी शिवसैनिकांना मंत्र दिला होता. या मंत्राचा जागर करणारे लक्षावधी शिवसैनिक त्यांनी निर्माण केले हीच त्यांची व पक्षाची मोठी पुंजी होती.
शिवसेनाप्रमुख म्हणत “अखंड शिवसैनिकांच्या घामातून आणि रक्तातून आलेल्या शिवसेनेचे आम्ही मालक नसून संरक्षक आहोत. हीच जाणीव सदैव आमच्या मनात असते. एखादा माळी जागृक राहून आपल्या उद्यानाचे संरक्षण करतो, तीच भूमिका सदैव आम्ही शिवसेनेच्या बाबतीत ठेवली आहे.”
शिवसेनाप्रमुखांनी लक्षावधी कडवट शिवसैनिकांची फौज निर्माण केली. शिवसेनाप्रमुखांचा फक्त आदेश येण्याची ही फौज नेहमी वाट पाहत असे. त्यांनी पाकिस्तानला नेहमीच विरोध केला. भारताच्या विरोधात सदैव दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानविषयी बाळासाहेबांच्या मनात नेहमीच संताप असायचा. पाकिस्तान व पाकिस्तान धार्जिणे मुस्लीम यांच्याबाबतीत त्यांनी कधीच गुळमुळीत भूमिका घेतली नाही. व्होट बँकेचा तर कधीच विचार केला नाही.
२१ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत भारत – पाकिस्तान क्रिकेटचा सामना होणार असल्याचे जाहीर झाले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही मॅच ठरली. या सामन्याला शिवसेनाप्रमुखांनी कडाडून विरोध केला. त्यांचा विरोध न जुमानता क्रिकेट असोसिएशनने मॅच होणार असे जाहीर केले. तत्कालीन काँग्रेस सरकारनेही पोलिसांच्या बळावर मॅच पार पडेल, असे गृहीत धरले. त्यावेळी मुलुंडचे विभाग प्रमुख शिशिर शिंदे यांनी शिवसेनाप्रमुखांचा आदेश अमलात आणण्याचा चंग बांधला. शिशिर शिंदे हे दोन वेळा आमदार व दोन वेळा नगरसेवकही होते. मुलुंडच्या शिवसैनिकांची टीम घेऊन शिशिर हे कुदळ, फावडी अशा सामानांसह मोटारीने थेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर पोहोचले. पीचवर तेलाचे डबे ओतून धावपट्टी खणायला सुरुवात केली. खरे तर स्टेडियमभोवती मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांना वाटले की, धावपट्टी तयार करण्याचे काम चालू आहे. नंतर लक्षात आले की वेगळेच काही घडते आहे, मग पोलिसांची धावपळ सुरू झाली.
शिवसैनिकांची वानखेडे स्टेडियमची धावपट्टी उखडली ही बातमी प्रथम बीबीसीने दिली. टाइम्स आॅफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेसपासून सर्व वृत्तपत्रांचे छायाचित्रकर तिथे धावले. ही तर आंतरराष्ट्रीय घटना ठरली. शिवसैनिकांचा पराक्रम जगभर पोहोचला. शिशिरसह सर्व टीमला पोलिसांनी अटक करून आझाद मैदान पोलीस ठाण्यावर आणले व रात्रभर कोठडीत डांबून ठेवले.
या घटनेनंतर भारत-पाकिस्तान सामान रद्द झाला.
जामिनावर सुटका होताच वानखेडेची धावपट्टी खणलेले शिवसैनिक थेट मातोश्रीवर शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी पोहोचले. ते आल्याचे कळताच, बाळासाहेबांनी आतून निरोप दिला, शिशिर, तुम्ही तिथेच थांबा. मी तुम्हाला घ्यायला येतो… बाळासाहेब बाहेर आले व टीममधील प्रत्येकाच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना शाबासकी दिली. ते म्हणाले- मला असा शिवसैनिक अभिप्रेत आहे आणि ते काम तुम्ही करून दाखवले आहे…
१९७०-८० च्या दशकात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बॅरिस्टर रजनी पटेल होते. शिवसेनेचा जोर वाढत होता. इंदिरा गांधींच्या विरोधात देशभर वातावरण तप्त होते. रजनी पटेल व बाळासाहेब ठाकरे यांचे कधीच पटले नाही. रजनी पटेल यांनी आपला निरोप देण्यासाठी त्यांचा एक विश्वासू माणूस मातोश्रीवर पाठवला. बाळासाहेब आता अति झालं, शिवसेना काँग्रेसमध्ये विलिन करून टाका, जर येत्या चोवीस तासांत तुम्ही शिवसेना काँग्रेसमध्ये विलिन करून टाकली नाहीत, तर शिवसेनेवर दिल्लीहून इंदिरा गांधी बंदी आणतील, हे लक्षात ठेवा…
रजनी पटेल यांचा हा निर्वाणीचा निरोप ऐकून शिवसेनाप्रमुख त्या माणसाला म्हणाले- अरे जा, त्या रजनी पटेलला सांग, तू कोणाला धमकी देतोस… आणि लक्षात ठेव, ज्या क्षणाला शिवसेनेवर बंदी येईल त्या क्षणाला रजनी पटेल याची मुंबईत अंत्ययात्रा सुरू होईल… बाळासाहेबांनी अशा शब्दांत ठणकवल्यावर रजनी पटेल पुन्हा कधी शिवसेनाप्रमुखांच्या वाटेला गेले नाहीत.
असे होते,शिवसेनाप्रमुख !

– लेखन : डॉ.सुकृत खांडेकर. संपादक
दैनिक प्रहार. मुंबई. ☎️ 9869484800