“भेंडी सिंड्रोम”
सहकारी गृहनिर्माण संस्थेची बैठक क्वचितच हसत खेळत पार पडते. बहुदा आवाज उत्तरोत्तर चढत जातो. काम करणारे, काम न करणारे असे मुख्य भाग असतात. काम न करणाऱ्यांमध्ये तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार कामात चुका काढणारे, दुसरा विषयाला फाटे फोडणारे आणि तिसरा ‘बुळे‘!
सगळे प्रकार वर्णनावरून कळतात.
बुळयांमध्ये मात्र अनंत प्रकार आहेत. हा प्रकार फक्त ह्या बैठकीपुरता नाही, बुळे असणे ही एक जीवनशैली आहे ! हे वैशिष्ट्य समजावं म्हणून केवळ गृहनिर्माण संस्थेची बैठक म्हटलं. ह्या व्यक्ती कधीच स्वतःचं मत
ठासून सांगत नाहीत. अदृश्य कवच बाळगत असतात.
म्हणजे बघा,
टॅक्सीने जाऊया ?
कसंही चालेल.
चहात आलं घालू ?
कसंही चालेल.
मेदू वडा की सँडविच मागवायचं ?
काहीही चालेल.
पंखा हवा?
भेंडीची भाजी करू ?…
यांचे ठोस उत्तर मिळणार नाही.
मला वाटायचं ही मंडळी ऍडजस्ट करणारी असतात ! गैरसमज होता तो. कुठेच ठाम न बोलणारा माणूस डोक्यात जायला लागतो. हळूहळू हे मला कळत गेलं.
आमच्या ब्रँचमध्ये ॲक्वागार्डचा पाईप गळायला लागला एकदा. लहानशी ब्रँच होती ती.कॅन्टीन म्हणजे काय ? एका टेबलवर गॅसची शेगडी. समोर एक फळकुट ठोकलेले. त्याला डायनिंग टेबल म्हणायचे. दोन्हीच्यामध्ये ॲक्वागार्डचा फिल्टर. एकेकजण करून डबा घाईने संपवून यायचो आम्ही. पाईप गळायला लागल्यावर थाड् थाड् पाणी उडायला लागले, त्या टेबल म्हणवणाऱ्या फळकुटावर.
कँटिनबाहेर येताना जवळच पुष्पाचे डेस्क होते. तिच्यापाशी थांबले. तिला म्हटले,
“नळ गळतो आहे ना,
ड्रिंकिंग वॉटर चा.. “
“तो गांगुर्डे म्हणतच होता…”
“तू जेवलीस तेव्हा नव्हता का गळत ?”
“नामजोशी सकाळीच म्हणत होती…”
“तुझं काय मत आहे ? फिल्टरचा नळ गळतोय की नाही ?”
“जी.ए.डी.चे इन चार्ज दिघे आलेच नाहीयेत पण आज.”
नळ गळतो आहे ह्या वाक्याला दुजोरा द्यायला काही ती बाई तयार नाही !
नामजोशी माझ्याशी बोलायला आली.
“ही तशीच आहे. आम्ही परळ ब्रँचमध्ये एकत्र काम केलंय. नळ गळतो हे ती सांगण्याचीसुद्धा स्वतःवर जबाबदारी घेणार नाही. कुठला वाईटपणा घेणार नाही. जाऊ दे. केलाय मी दिघेसरांशी कॉन्टॅक्ट. येतोय टेक्निशियन.”
फार विचारवंत असतात बरं हे लोक किंवा विचारजंतू म्हणूया ? हलक्यात घेऊ नका त्यांना. चहात आलं घातलं तर आलं उष्ण असतं हे ऐकवतील. नाही घातलं तर आल्याशिवाय चहाची ‘मझा’ नाही सांगतील. टॅक्सीने गेलात तर महाग पडलं म्हणणार .बसने गेलात तर वेळ मोडला म्हणून कुरकुरतील. आम्ही नरीमन पॉइंट ब्रँचला असताना बदलापूर फास्ट लोकल पकडायला धावायचो. बस इतकी थांबत यायची. मग तिघे चौघे मिळून टॅक्सी करायचो.टॅक्सी करून देखील कधी कधी चुकायची ट्रेन. मग रत्नाकर शिव्या घालायला सुरुवात करायचा. ”ट्रेन भी गया और पैसा भी”
मग आम्ही त्याला टाळायला लागलो.
“तू बता यार, टॅक्सी करेंगे या नही. ट्रेन मिलेगी की नही.”
“ऐसे कैसे बोल सकता है रे ….”
“फिर तू मत आ,हमारे साथ.“
बुळे,बुळबुळीत हे आणि घसरून पडणार आपण !
मत सांगणे नको. कोणतीच जबाबदारी नको. कोणतीही भूमिका नको. वाईटपणा नको. गुळगुळीत म्हणवून घ्यायला हवं असतं त्यांना. पण असतात ही माणसे बुळबुळीत.
भेंडी बघा, मूळ स्वभाव बुळबुळीत ! मसाला भेंडी केलीत तर तिखट झाल्याचं खापर मात्र मसाल्यावर. ताकातली भाजी केलीत तर आंबट चव ताकाची. ती मूळची पथ्याची भाजी आहे. ती वातूळ नाही, पित्तकर नाहीच . डाळीचं पीठ पेरून भेंड्याची भाजी केली तर वातूळ होते. भरलेली भेंडी केलीत तर पित्तकर. ताकातली भेंडी केली तर कफाचा त्रास होऊ शकतो. पण भेंडी ह्या दोषांची जबाबदारी घेऊ शकत नाही.
ह्या ‘भेंडे‘ व्यक्ती निवाडा देत नाहीत. तुझं पटतं, तुझंही पटतं. दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत हे त्यांचे आवडते विधान. दोघेही बरोबर ही परिस्थिती नेहमीच कशी असेल हो ?

नात्यात एक आजोबा आहेत त्यांना हा जुनाट ‘भेंडी सिंड्रोम‘ आहे. कधी एकत्र जमलो की, दीपकच्या फॅमिलीचा विषय निघतो. दीपक त्यांचा भाचा. त्याच्या व्यसनापायी कुटुंबाची दुर्दशा झालेली आहे. जमेल तशी मदत करत असतो आम्ही. त्याच्या बायकोसाठी आमचे सहानुभूतीचे उद्गार असतात. आजोबा एकच पालुपद घेऊन आळवत असतात. कोणाला दोष द्यावा काही कळत नाही ! कातडीबचाऊ धोरण राबवताना ते जे असं एक कवच पांघरून घेतात, की त्यांच्या संवेदना बधीर होतात.
आमच्या गृहनिर्माण संस्थेच्या सभेत वॉचमॅनचा पगार वाढवावा की नाही ह्यासाठी आवाजी मतदान झाले. म्हणजे, हात वर करायचा. एक भेंडा होता. त्याने दोन्ही वेळा हात वर केला नाही. मत दिले नाही ! कसंही चालेल म्हणाला. पुन्हा सभासद हजर होते, एकोणीस, नऊ इकडे नऊ तिकडे. हा एक अढळ, अविचल होता. ‘तुला सेक्रेटरी व्हावं लागेल.’ अशी धमकी दिल्यावर मात्र तो नमला ! सेक्रेटरी म्हणजे जबाबदारी. भेंडा जबाबदारी कशी घेईल?
‘भेंडी सिंड्रोम‘ असणारे एकूण एक बाद असतात, प्रामाणिक जगण्यातून !
तुम्हाला काय वाटतं ?

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ..
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
