आज सकाळी मुंबईहुन अरुण इंगळे यांचा मेसेज आला की संगीत दिग्दर्शक नदीम श्रवण यातील श्रवण राठोड यांचे दुःखद निधन झाले. मन एकदम सुन्न झाले . 2 ते 3 दिवसांपूर्वी माझे मित्र पं. भवानी शंकर यांनी श्रवण जास्त आजारी असल्याचे सांगितले होते. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. मला नक्की आठवत नाही पण पहिले रेकॉर्डिंग ताडदेवच्या फेमस स्टुडिओत केले होते. गीतकार समीर व गायक बहुतेक सुरेश वाडकर व अनुराधा पौडवाल यांनी गायले होते. नंतर त्यांच्या सोबतच अनेक गाणी केली, काही गाण्यात chours तर काही मध्ये साईड रिदम ला भाग घेत असे. तेव्हा नदीम श्रवण संगीतकार, गीतकार समीर व गायक कुमार सानू, अनुराधा पौडवाल असे त्रिकुट होते. त्यामध्ये बऱ्याच वेळा अलका याज्ञीक पण होत्या. T series साठी आम्ही खूप काम केले. स्व. गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर नदीम परदेशात गेले त्यामुळे त्यांच्या कामावर खूप परिणाम झाला.
श्रवण यांचे भाऊ रूपकुमार राठोड, विनोद राठोड याच क्षेत्रात कार्यरत होते. रूपकुमार राठोड काही दिवस अनुप जलोटा यांना तबला साथ करत असत. नंतर त्यांनी सोनालीसोबत लग्न केले व नंतर दोघे मिळून गझलचे प्रोग्राम करत असत. विनोद राठोड हे गायक होण्यासाठी स्ट्रुगल करत होते. अनेकदा मी त्यांच्या घरी जात असे. तश्या आठवणी खूपच आहेत. अश्या गुणी, एका पेक्षा एक श्रवणीय गाणी देणाऱ्या गुणी संगीतकार श्रवण यांना भावपूर्ण सुरमयी सुरेल श्रद्धांजली.
-सिने गायक उदय वाईकर.