महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माची पताका घेऊन जाणारे अनेक संत इसवी सन बाराशे ते सोळाशे या दरम्यान आपल्या महाराष्ट्रातील विविध भागात होऊन गेले.
या सर्व संतांच्या आयुष्याची, जीवनकार्याची, तत्वज्ञानाची तसेच त्यांच्या साहित्य निर्मितीची सांगोपांग माहिती देणारे उत्कृष्ट पुस्तक म्हणजे “संत चैतन्याचा मेळा” हे होय.
भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक श्रीमती लता गुठे यांनी लिहिले आहे.
या पुस्तकात महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत रामदास स्वामी, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत गोरोबा कुंभार, संत निळोबा या पुरुष संतांसह संत जनाबाई, संत मुक्ताबाई तसेच राजस्थान येथील संत मीराबाई या स्त्री आणि उत्तर भारतातील संत तुलसीदास आणि संत कबीर या महाराष्ट्राबाहेरील संतांची जीवनचरीत्रे रेखाटलेली आहेत.
या विविध संतांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे.
संन्याशाचे पोर म्हणून हिणवले गेलेल्या संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा भावार्थ सांगितला. त्यांचे योगसामर्थ्य ही अलौकीक होते.
संत तुकाराम अगदी वेगळे, व्यवसायाने वाणी. आर्थिक परिस्थिती उत्तम, नंतर आलेली विपन्नावस्था, लाभलेले दीर्घायुष्य, संत एकनाथांचे जीवन आणखी वेगळे, त्यांनी ईश्वर भक्तीसह मराठी साहित्यात, भारुड या एका आगळ्याच प्रकाराची मोलाची भर घातली आहे.
वाहतूक आणि दळणवळण साधने मर्यादित असताना संत नामदेवांनी संतपरंपरा पार पंजाब पर्यंत नेलेली आहे.
संत चोखामेळा महार कुटुंबातील, त्यांना त्या काळानुसार समाजातून अतिशय त्रास भोगावा लागला होता.
संत चोखोबा आणि संत नामदेव मैत्री यांच्यातील मैत्र, संत सावता माळी यांची ईश्वर भक्ती, संत गोरोबा कुंभार पराकोटीचा एकेश्वरवाद, भान हरपून केलेली भक्ती. संत निळोबा, जे संत तुकारामांचे पट्टशिष्य होते. या सर्व संतांचे वर्णन त्यांच्यावरील अभ्यासपूर्ण लेखांतून या पुस्तकात केले आहे.
संत मीराबाई यांनी समाजाच्या रुढी परंपरांविरुध्द उभे ठाकण्याचे धारिष्ट्य दाखवले. संत कबीर यांनी धर्माच्या नावाखाली विलग झालेल्या समाजाला एकत्र बांधण्याचे कार्य केले. त्यांची माहिती या पुस्तकात आहे.
बहुतेक संतांच्या वाट्याला या ना त्या कारणाने उपेक्षित जीवन आलं, परंतु प्रत्येकाने त्यावर हरीभक्तीची कास धरत मात केली आणि भागवत धर्माची पताका उंच नेली. बहुतेक संतांचा कालावधी हा बहामनी सुलतानांच्या राज्य कारभाराचा. त्यामुळे राज्यावर मुसलमानी अंमल होता. धर्माची मूलतत्त्वे बाजूला पडून कर्मकांडे, अंधश्रद्धा यांचे प्राबल्य वाढले होते. अशावेळी धर्माचे खरे स्वरूप लोकांसमोर आणून त्यांना या खाईतून बाहेर काढण्याचे मौलिक कार्य या सर्व संतांनी केले. लोकांना भक्तिमार्गावर आणले.
या सर्व संतांची परमेश्वरावर विशेष करून विठ्ठलावर नितांत, निस्सीम श्रध्दा होती परंतु त्यांनी आपल्या भक्तीत अंधश्रद्धेला जराही थारा दिला नाही, कधीच खतपाणी घातले नाही, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या विविध संतांच्या जीवनावर आपण द्रुष्टिक्षेप टाकल्यास आपल्याला असे जाणवते की, ऐहिक जीवनात सर्वच प्रकारची आर्थिक, कौटुंबिक, मानसिक संंकटे त्यांच्यावर आली परंतु त्यांची ईश्र्वर निष्ठा आणि भक्ती सर्व विपरीत परिस्थितीत देखील अचल आणि अढळ राहीली, ज्यामुळे या संकंटांवर मात करीत त्यांना त्यातून बाहेर पडत आले.
या सर्व संतांच्या जीवनाचे वर्णन, त्यांनी विठ्ठल चरणांचा घेतलेला ध्यास याचे उत्कट वर्णन करत असतानाच लेखिका श्रीमती लता गुठे या संत साहित्याचे अंतरंग आपल्याला उत्तम रीतीने उलगडून दाखवतात.आपल्या या पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी आपल्याला लहानपणापासून संत साहित्याची गोडी कशी लागली, ते ही नमूद केले आहे.
संत साहित्याच्या गाढ अभ्यासक आणि सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीमती रेखाताई नार्वेकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे, त्यामुळे हे पुस्तक अमूल्य आहे.
प्रत्येक मराठी माणसाच्या घरात शोभून दिसणारा हा अभिमानाचा ठेवा आहे असेच या पुस्तकाबाबत मी म्हणेन.

– लेखन : डॉ. संपदा पाटगावकर
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
