भारतीय संस्कृतीनुसार गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु शिष्यांचा भेटीचा दिवस. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ; ७ जुलै १९३५ रोजी गोरबंजारा समाजाचे महान तपस्वी राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज यांचा जन्म झाला आणि गोरमाटी गणात एका महान संताची अनमोल भर पडली. बापूच्या जयंती निमित्ताने कोटी कोटी अभिवादन करतो !
दरवर्षी जन्म तिथीला जन्मोत्सव साजरा न करता दरवर्षी येणाऱ्या गुरुपौर्णिमेला बापुचा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा पोहरागड येथे रूढ झालेली आहे. यावर्षीच्या जन्मोत्सवाकरिता महान तपस्वी संत डॉ. रामराव बापू महाराज यांचे पुजारी महंत शेखर महाराज यांनी यावर्षी हजारो झाडे वाटप करण्याचा संकल्प केला आहे. तसेच समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या काही समाजसेवकांना प्रमाणपत्र वाटप करण्याचे फार सुंदर आयोजन केलेले आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा मी मनःपूर्वक अभिनंदन करतो !
पोहरागड म्हणजे बंजारा समाजाची काशी संत सेवालाल महाराज यांची समाधी माॅ. जगदंबा देवीचे मंदिर, संत बाबनलाल महाराज यांची समाधी आणि आता परमपूज्य संत डॉ. रामराव बापू महाराज यांची समाधी या ठिकाणी आहे. या जन्मोत्सवाकरीता महाराष्ट्रातूनच नव्हे तर आंध्र, कर्नाटक तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड,गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहार आणि इतर राज्यातूनही बरीच मंडळी गुरुपौर्णिमेला संत डॉ. रामरावबापू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरागड येथे येतात. नतमस्तक होतात आणि कुशल मंगलाची कामना करतात. या सर्वांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था धर्मगुरू महंत बाबू सिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज आणि महंत शेखर महाराज हे दरवर्षी करत असतात. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जवळपास ५० ते ६० हजार भावीक भक्तांची उपस्थिती राहते. ते मनोभावे बापूंच्या समाधीचे दर्शन घेतात आणि प्रेरणा घेऊन ते आपल्या गावाकडे समाधानाने परततात. यामध्येच पोहरगडाचे महत्त्व सामावलेले आहे.
गुरु पौर्णिमेला पोहरागड येथे महाराष्ट्रातून ६० ते ६५ दिंड्या येत असून यामध्ये टिटवी, लोणार, आंबोडा, गुळखंड, काठोडा, औंढा, बिफखेड, कणकवाडी अशा अनेक गावातून दिंड्या येत असतात. आणि हया सर्व दिंडया गुरूपौर्णीमेच्या आदल्यादिवशी पोहरागड येथे मुक्कामी पोहचतात .यामध्ये मंठा तालुक्यातील गुळखंड गावाचे नंदलाल महाराज यांची सुद्धा दिंडी दरवर्षी येत असते.
नंदलाल महाराज हे महान तपस्वी संत डॉ. रामराव बापू महाराज यांचे विश्वासू परमभक्त आहेत. बापूच्या जयंती निमित्ताने येणाऱ्या लोकांची सेवा करण्यासाठी सेवेधारी म्हणून खामलवाडी, वडदी, वरंदळी, चिचपाड, वनोली, तुळसीनगर, काळी दौलत खान, धुंदी, सिंगद, गहुली या व अशा अनेक गावातून सेवेधारी लोक त्या ठिकाणी येतात आणि मनोभावे सेवा करतात.
संत परसरामबापू महाराज आणि पुतळायाडी यांच्या पोटी जन्मलेले महान तपस्वी संत डॉ. रामरावबापू महाराज हे बाराव्या वर्षापासूनच भक्तिमार्गामध्ये लीन झाले होते आणि त्यांनी शेवटपर्यंत अन्नत्याग केला होता. लहानपणापासूनच त्यांचा प्रसन्न चेहरा, तलक बुद्धी आणि लोकांना मदत करण्याची त्यांची प्रेमळ वृत्ती त्यामुळे ते लोकप्रिय होत गेले. निर्मळ मन, संत सेवालाल बापूवर असलेली प्रचंड निष्ठा, मानवतावादी दृष्टिकोन, सत्याकडे असलेली वाटचाल आणि चिंतन- मनन करून ते गुरु पदापर्यंत पोहोचले. संत सेवालाल महाराजांचे विचार संपूर्ण भारतात पोहोचण्यासाठी त्यांनी हा भक्तिमार्ग स्वीकारला होता. बारा वर्षानंतर त्यांनी अन्न- त्याग करून बारा वर्षे मौनव्रत आणि अग्नी अनुष्ठान केलेले आहे.
संत डॉ. रामरावबापु महाराजांसारखा संत अजूनही पाचशे काय हजार वर्षही गोरबंजारा समाजातच नाही तर भारतातही होऊ शकत नाही. एवढे ते महान संत होते.
सामाजिक कार्य –
संत डॉ. रामरावबापू महाराज यांची भक्ती कठोर होती. त्याग, समर्पण आणि मानवतावादी दृष्टिकोन ह्या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. संत सेवालाल महाराज अनमोल यांचे विचार तमाम तांड्यापर्यंत पोहोचण्यासाठी संत डॉ. रामरावबापू महाराज यांनी दळणवळणाची साधने नसताना डमणी, छकडाद्वारे भारत भ्रमण केले. त्यांच्यासोबत नेहमी महंत बाबूसिंग महाराज असायचे. कधीकधी संजय महाराज यांनाही सोबत घेऊन त्यांनी अनेक राज्याचा दौरा केल्याचे सांगितले जाते. शेवटी शेवटी महंत शेखर महाराज यांना सेवा करण्याची संधी मिळाली. कुठे कुठे चिखलातून सुद्धा प्रवास करून त्यांनी तांड्यामध्ये जाऊन संत सेवालाल महाराजांच्या अनमोल विचारांची पेरणी केली आणि त्यांनी तांडया – तांडयात जाऊन गोरबंजारा समाजाच्या लोकांना चोरी करू नका, खोटं बोलू नका, व्यसनाच्या नादी लागू नका, भांडण तंटे करू नका असा संदेश देऊन गोरबंजारा समाज एक संघ राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले आहे.
अनुसूचित जमातीचे आरक्षण –
आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री ब्रह्मानंद रेडडी यांना भेटून गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे. त्यामुळेच आंध्र प्रदेश राज्यात गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले आहे.
मा. देवगौडा पंतप्रधान असताना त्यांना भेटून गोरबंजारा समाजाला न्याय देण्याकरिता त्यांनी वारंवार मागणी केली. त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही. मला काहीही नको पण गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये टाका, याकरिता त्यांनी मुंबई, दिल्ली येथे अनेक वाऱ्या केल्या असून अनेक वेळा उपोषण सुद्धा केलेले आहे.
पंतप्रधानांची भेट –
शेवटी १५ फेब्रुवारी २०२० रोजी ते संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने तब्येत खराब असतानाही दिल्ली येथे गेले. त्यांच्यासोबत शेखर महाराज होते. माजी खासदार उमेश जाधव, शंकर पवार यांच्यासह त्यांनी ५ मार्च २०२० रोजी नाकात ऑक्सिजनची नळकांडी असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांनी गोर बंजारा समाजाला एका सूचीमध्ये (एसटी) टाकण्यासाठी मागणी करून रामनवमी यात्रेला पोहरागड येथे येण्याचे निमंत्रण दिले. त्याचीच फलश्रुती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ ऑक्टोबर २०२४ रोजी यांनी पोहरागडाला भेट दिली. पण बापुच्यां मागणीवर भाष्य केले नाही.

गोरबंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता त्यांनी भारत देशाचे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अनेक मुख्यमंत्र्यांना भेटून असंख्य निवेदने दिलेली आहे. स्वतः साठी मागणारे अनेक लोक आज आपल्याला दिसतात पण मला काहीही नको, गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये टाकण्यात यावे यासाठी बापुंनी खुप प्रयत्न केले. राजकारण विरहित असलेले महान तपस्वी संत डॉ. रामराव बापू महाराज यांचा काँग्रेस, भाजपा आणि इतर सर्व पक्षांमध्ये एक वेगळा दरारा होता. त्यांचा मानसन्मान सर्वच पक्षीय नेता, मंत्री, आमदार, खासदार करत असत. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय सेवक संघ सुद्धा त्यांचा सन्मान करत असत. या सर्व लोकांवर बापूंची वेगळी छाप होती. त्यांना अनेक पक्षाकडून अनेक ऑफर आल्या पण त्यांनी धुडकावून लावल्या. त्यांचे साधे राहणीमान हे उच्च कोटीचे होते. प्रमाणशीर आणि सत्य बोलणे व मानवतावादी दृष्टिकोन हा त्यांचा जीवनाचा मूलमंत्र होता. माणूस लहान असो की मोठा असो त्यांना ते समान वागणूक देत असत. गोरबंजारा समाज पुढे गेला पाहिजे. त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी ते नेहमी धडपडत असत. गोर बंजारा समाज एका सुचीमध्ये गेला पाहिजे यासाठी त्यांची कायम धडपड सुरू होती. पोहरागड येथील जगदंबादेवी व संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचे कळस सुद्धा संत डॉ. रामरावबापू महाराज यांनी बसवलेले आहेत.
भारत भ्रमण –
संत सेवालाल महाराज यांचे अनमोल बोल तांड्यातांड्यात पोहोचण्यासाठी त्यांनी त्या कठीण परिस्थितीत दळणवळणाची कुठलीही साधने नसताना सुद्धा भारतभ्रमण केलेले आहे. कधी बैलगाडी तर कधी पायी अंतर चिखलातुन चालुन गोर बंजारा समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. म्हणूनच गोर बंजारा समाज आज भारत देशामध्ये सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर आहे.
संत डॉ. रामरावबापू महाराज यांची गोरबंजारा समाजामध्ये सर्वदूर ख्याती असून आज अनेक धर्माचे धर्मगुरू जेलमध्ये असताना सुद्धा संत डॉ. रामरावबापू महाराज यांच्या हयातीमध्ये त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप झालेले नाही. ही सर्वात मोठी उपलब्धी मानावी लागेल!
संत डॉ. रामरावबापू महाराज हे निरमळ मनाचे, प्रामाणिक, संयमी आणि परमदयाळू होते. त्यांचे जीवन कार्य हे आदर्शवत असल्यामुळे गोरबंजारा समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला सुद्धा ते हवेहवेसे वाटायचे ! भारतातील अनेक राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बडे अधिकारी, राजकीय नेते हे त्यांच्या भेटीला नेहमी येत असत. संत डॉक्टर रामराव बापू असताना पोरागडांमध्ये नेहमी बड्या लोकांची वर्दळ असायची ती कायमचीच!
बंदीकाळात पोहरागड मंदिर खुले !
पोहरागड येथे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला मांग गारोडी लोकांची यात्रा भरत असते. त्यांचा एक वेगळाच इतिहास आहे. त्यामध्ये हजारोच्या संख्येने मांग गारोडी आणि बहुजन सामाजातील लोक भाग घेतात आणि मनोभावे संत सेवालाल महाराजांचे दर्शन घेतात. पुजा करतात, नवस फेडतात. ही परंपरा इतिहासामध्ये नोंद करण्यासारखी आहे. जेव्हा बहुजन समाजाला मंदिर बंदी होती आणि परमपूज्य साने गुरुजी यांनी पंढरपूरचे मंदिर बहुजनांना खुले करण्यासाठी उपोषण केले होते. त्याकाळी सगळी मंदिरे बहुजन समाजाच्या लोकांना बंदी असताना पोहरागड येथील एकमेव मंदिर हे बहुजनासाठी खुले होते. त्यामुळे बहुजन समाजातील अनेक जाती-जमातीची मंडळी कोजागिरी पौर्णिमेला पोहरागडामध्ये येऊन संत सेवालाल बापू आणि जगदंबा देवीची मनोभावे पूजा करतात. हा इतिहास विसरून चालता येणार नाही. पोहरागड आणि रामावत घराणे यांनी गोर बंजारा आणि बहुजन समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक धरोवर टिकवण्यासाठी कायम प्रयत्न केलेले आहेत. तो इतिहास मी केव्हातरी लिहीन….
पोहरागड : सत्ता केंद्र
आज बंजारा समाजामध्येच नाही तर बहुजन समाजामध्ये पोहरादेवीगडाचे फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच सरकारचे लक्ष आज पोहरागडावर केंद्रित झालेले आहे. भाजपा सरकारने पोहरागडाच्या विकासाला गती देऊन पोहरागड हे सत्ता केंद्र बनवण्याच्या तयारीत आहेत. आज राजकीय क्षेत्रामध्ये पोहरागडाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. बंजारा समाजातील काशी म्हणून संपूर्ण भारतातच नाही तर विदेशामध्ये सुद्धा पोहरागडाचे नाव घेतल्या जाते. याचे सर्व श्रेय महान तपस्वी संत परमपूज्य डॉ रामराव बापू यांना जाते.
श्रीमती सोनिया गांधीची निवडणूक –
गुत्तीबेल्लारी लोकसभा मतदारसंघांमध्ये जेव्हा काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती सोनिया गांधी ह्या उभ्या होत्या, त्यावेळेस काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बापूची भेट घेऊन श्रीमती सोनिया गांधी यांचा प्रचार करण्याची विनंती केली. त्यावेळी सुद्धा बापुनी काँग्रेस समोर बंजारा समाजाला एका सूचीमध्ये आणण्याची मागणी रेटली. ती त्यांनी मान्य केली त्यामुळे संत डॉ.रामराव बापू महाराज यांनी त्या लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि श्रीमती सोनिया गांधी प्रचंड बहुमताने बापूच्या आशीर्वादामुळे निवडून आल्या होत्या. हा इतिहास विसरून चालता येणार नाही. पण पुढे काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्या पुढील इतिहास आपण सर्वांना माहीत आहे.
एका सुचीची मागणी –
अनेक गणमान्य व्यक्तींची बापुच्या आशीर्वादामुळे त्यांची राजकीय नया पार झालेली आहे. जसे माजी खासदार हरिभाऊ राठोड, कॅबिनेट मंत्री संजयभाऊ राठोड आणि इतर बरेच आमदार, खासदार, मंत्री !
संत डॉ. रामरावबापू महाराज यांचे गोरबंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये फार मोठे योगदान आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासोबत महान तपस्वी संत डॉ. रामरावबापू महाराज यांनी अनेकदा दिल्लीवारी करून बंजारा समाजाला एका सूचीमध्ये टाकण्यासाठी वारंवार मागणी केली होती. मा. डॉ. मनमोहनसिंग ते मा. नरेंद्रजी मोदी पंतप्रधान पर्यंत त्यांनी अनेक गणमान्य लोकांना दिल्लीमध्ये भेटून भारतातील तमाम बंजारांना एका सूचीमध्ये आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते.
व्यसनमुक्ती कार्य –
गोरबंजारा समाजामध्ये दारूचे व्यसन खूप वाढल्यामुळे दारू पिणाऱ्यांच्या हातात लिंबाच्या झाडाची डाळ देऊन त्याला दारू सोडण्यासाठी शपथ घेण्यासाठी ते भाग पाडत असत. त्यामुळे हजारो लोकांनी महान तपस्वी संत डॉ. रामराव बापू महाराजांच्या या उपक्रमात सहभागी होऊन दारू सोडली होती. प्रवचन करणारे, कथा सांगणारे महाराज आज समाजामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात दिसतील. परंतु केवळ आपले हात उंचावून आशीर्वाद देणारे एकमेव संत म्हणजे डॉ. रामरावबापू महाराज होय !
अशोकराव चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद –
एकदा नांदेडवरून शंकराव चव्हाण यांचे पुत्र अशोकराव चव्हाण यांनी पोहरागड येथे येऊन बापूचे मनोभावे आशीर्वाद घेतले. जेव्हा अशोकराव बापूचे चरण स्पर्श करत होते. तेव्हा बापूंनी हात उंचावून असा आशीर्वाद दिला… जो.. अशोकराव तू एकदन मुख्यमंत्री हिस! आजूबाजूची मंडळी हसायला लागली. दस्तूरखुद अशोकराव चव्हाण सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि तेथे उपस्थित असलेले माझे मित्र बलदेव महाराज यांना अशोकराव चव्हाण बोलले की बापूंनी मला आशीर्वाद दिला, परंतु आज राजकीय परिस्थिती तशी नाही आणि मी कसे मुख्यमंत्री होणार ? त्यावर बलदेव महाराज यांनी सांगितले होते, अशोकराव आता ते बापूचे शब्द आहे खरे होणार म्हणजे खरे होणारच ! कारण त्यावेळी त्यांची राजकीय परिस्थिती तेवढी मजबूत नव्हती. पण संत डॉ. रामरावबापूच्या वाणीमध्ये महान संत सेवाभायाची ताकद होती. बापू तर बोलून गेले आणि अशोकराव यांनाही विसर पडला. परंतु काही दिवसांमध्ये अचानक महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये उलथापालथ झाली आणि अशोकराव चव्हाण अचानक मुख्यमंत्री झाले आणि बापूचे बोल खरे ठरले. पण अशोकरावांच्या हे ध्यानी आले नाही. काही दिवसानंतर संत डॉ. रामरावबापू महाराज मुंबईच्या आझाद मैदानावर गोरबंजारा समाजाला एसटीमध्ये टाकण्यासाठी हजारो माणसे घेऊन उपोषणाला बसले होते. अशोकराव चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते. अशोकराव चव्हाण आझाद मैदानावर येऊन बापूंची भेट घेईल अशी आशा बापूला लागली होती. परंतु मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बापूच्या भेटीला मंत्रालयातून आझाद मैदानावर आले नाही. केवळ मोबाईलवर बापुशी संवाद साधला आणि बापूचे अंतकरण दुखले. बापूंनी मोबाईल खाली ठेवला आणि जड अंतकरणाने बापूच्या तोंडून शब्द निघून गेले… जो अशोकराव तारो मुख्यमंत्री पद आयवाळे काही दनेम चलो जाय ! आणि झाले तसेच अशोकराव चव्हाणचे मुख्यमंत्री पद अवघ्या सहा महिन्यात गेले. (आजही अशोकराव चव्हाण हयात आहे. या घटनेची आपण खात्री करू शकता.) नंतर अशोकराव चव्हाण बापूच्या भेटीला आले पण त्याचा काही फायदा झाला नाही. वेळ निघून गेली होती. अशा अनेक घटना बापूच्या बाबतीत सांगता येतील.
बापूच्या वाणीतील ताकद !
बापू म्हणजे चालते बोलते ईश्वरीरूप होते. आता तुम्हाला वाटेल यामध्ये अंधश्रद्धा, चमत्कार आहे. असे काहीही नाही. संत डॉ. रामरावबापू महाराज यांच्या वाणीमध्ये फार मोठी ताकद होती. काही लोक म्हणायचे की माणूस चंद्रावर गेला.तरीही बापू आजही लिंबू- धागादोरी देतात. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. जेंव्हा जेंव्हा माणसाच्या संपूर्ण वैद्यकीय वाटा संपतात आणि कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. जसे मंत्र, तंत्र, आयुर्वेद, होमिओपॅथी, मेडिकल फेल ठरते. आणि माणूस मरणासन्न अवस्थेत येतो. तेव्हाच लोक पोहरागडामध्ये येऊन बापूच्या चरणी हात जोडून सांगायचे की, बापू आता तूच आमचा वाली आहे ? तेव्हा बापूच्या पवित्र मुखातून शब्द निघायचे जो बेटा तार सेवा बापू भलो करिय ! या आशीर्वादरुपी शब्द शक्तीने येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनातील भीती निघून जात असून प्रचंड ऊर्जा त्यांना मिळायची. (मॉरल सपोर्ट) त्याचा आत्मविश्वास वाढायचा आणि मरणासन्न अवस्थेत असलेला तो माणूस सहज चार-पाच वर्ष तरी जगायचा. (अशी जगलेली अनेक मंडळी आजही समाजात जिवंत आहे.) यामध्ये कशाची आली अंधश्रद्धा.!
संत डॉ. रामरावबापू महाराज यांनी कधीही कोणाला उपास-तपास, पूजाअर्चा करण्यासाठी कधीही सांगितले नाही. शुद्ध आणि निर्मळ मनाने ते लोकांशी संवाद करायचे आणि सांगायचे. छिछाबरेन शाळा शिकावो, चोरी मत करो, लबाडी मत करो, दांडन मत खाओ, वेसन मत करो, हुंडा मत लो, गोर संस्कृती जतन करो, डीजेप बाई पोरीन रोडेती नचाव मत या व अशा अनेक सुधारणावादी गोष्टीकडे नेण्याचा त्यांचा कल होता.
आज रोजी भारतामध्ये १५ कोटी गोरबंजारा समाजाची लोकसंख्या असून त्यापैकी जवळपास पाच ते साडेपाच कोटी लोक संत डॉ. रामरावबापू महाराज यांचे शिष्य असल्याचे सांगतात.
पोहरागड विकास कार्यक्रम –
पोहरागडं मंदिर आणि परिसराचा विकास करण्याचा संत डॉ रामराव बापू महाराज यांचा विचार होता. त्यांनी आपल्या जवळील तीन कोटी रुपये एका ठेकेदारास देऊन नक्षीकाम असलेल्या गोट्याची व्यवस्था केली होती. पण त्या ठेकेदाराकडून काम झाले नाही. अशा मध्येच बापूंचे भक्त असलेले मा. संजयभाऊ राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री झालेआय आणि थोड्याच दिवसात राजकीय घडामोडी मध्ये यवतमाळच्या पालकमंत्री पदावरून संजय भाऊ राठोड यांना काढण्यात आले आणि त्यांना वाशिमचे पालकमंत्री देण्याची घोषणा झाली, त्यामुळे संजयभाऊ प्रचंड नाराज होऊन वाशिमचे पालकमंत्री पद स्वीकारण्यासाठी तयार नव्हते. (त्यावेळी मी दिग्रस पंचायत समितीमध्ये काम करत होतो) ही परिस्थिती जेव्हा बापूंना माहीत झाली तेव्हा त्यांनी संजय भाऊला निरोप पाठवून पोहरागडाला बोलावून घेतले आणि त्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या अनमोल वाणीची आठवण करून दिली. “मार पालेर खिला मच ठोकलीयुं”
संजू तुला चांगली संधी आलेली आहे, ही संधी गमावून बसू नको हे बापूचे शब्द ऐकून संजयभाऊला प्रेरणा मिळाली आणि त्यांनी वाशिमचे पालकमंत्री पद मनात नसतानाही स्वीकारले. थोड्या दिवसांमध्ये नंगाराभवनाचा १७० करोडचा आराखडा संजयभाऊंनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाला पाठवला आणि तो शासनाने मंजूर केला आणि बापूच्या हस्ते त्या कामाचे भूमिपूजन झाले. या ऐतिहासिक सोहळ्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत.
पुढे भाजपा पक्षाने संत डॉ. रामराव बापू यांच्या मागणीचा विचार करून सरकारने पोहरागड विकासाचा ७०० कोटीचा आराखडा मंजूर केलेला आहे आणि त्यांचे प्रचंड वेगाने काम सुरू आहे. या सर्व गोष्टीचे श्रेय परमपूज्य डॉ. रामराव बापू महाराज यांना जाते.
शेवटचे दिवस –
शेवटी शेवटी परमपूज्य संत डॉ. रामराव बापू महाराज यांची सेवा करण्याची संधी महंत शेखर महाराज यांना मिळाली. मुंबईमध्ये बापूच्या अंतिम प्रसंगी दवाखान्यामध्ये शेखर महाराजांसह, सुभाष महाराज व गुलबर्गाचे नारायण चव्हाण, राम राठोड आणि शंकर जाधव मंडळी उपस्थित होती. बापूंनी साखर आणि तूप याची मागणी केली, साखर आणि तूप शेखर महाराज यांनी दिल्याबरोबर बापूंनी सेवन करुन शेखर महाराज त्यांचे हात घट्ट धरले आणि आता माझ्या जाण्याची वेळ झालेली आहे. पोहरागडाची समृद्ध परंपरा, आपण सर्वांनी पुढे न्यावी असे सांगून ते आपल्यातून निघून गेले. कधीही न भरून निघणारी समाजाची हानी झालेली आहे. एका महान संतांमुळे समाज पोरका झाला. आज पोहरागडाच्या पवित्र गादीवर बापुसोबत सदैव असणारे उत्तराधिकारी महंत बाबुसिंग महाराज विराजमान असून त्यांना राज्यपालाने विधान परिषदेचे दिलेले आमदार पद हे सुद्धा परमपूज्य संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या अनमोल कार्याची पावती म्हणावी लागेल. आज पोहरागडाचे जे महत्त्व देशांमध्ये वाढलेले आहे. याचे सुद्धा सर्व श्रेय परमपूज्य संत डॉ. रामराव बापू महाराज यांना जाते. संत डॉ. रामराव बापू महाराज यांचा अनमोल विचाराचा रथ, पोहरागडाची समृद्ध परंपरा आणि मानवतावादी दृष्टिकोन पोहरागडातील सर्वच महाराजांनी पुढे न्यावा अशीच आजच्या प्रसंगी लोक माणसाची अपेक्षा आहे !
गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांचा भेटीचा दिवस असल्यामुळे मोठ्या भक्ती भावाने संत डॉ. रामरावबापू महाराज यांचे शिष्य प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला पोहरागड येथे येऊन आपली श्रद्धा सुमने अर्पित करतात. मनोकामना करतात आणि नतमस्तक होतात. त्यामुळे दरवर्षी महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्याकडून भाविक भक्तांना गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मोफत जेवणाची व्यवस्था केल्या जात असून गुरुपौर्णिमेला सुद्धा भव्य भोग भंडारा करण्यात येतो. त्यामुळे दिवसेंदिवस येणाऱ्या भाविक भक्तांची प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत आहे.
सध्या शासनाच्या वतीने पोहरागड विकासाचे काम फार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे पोहरागडाचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत आहे. यावर्षी गुरुपौर्णिमेला प्रचंड प्रमाणात मोठी गर्दी होत असल्यामुळे सर्वच गोरबंजारा समाजाची गुरुपौर्णिमेला हजर राहण्यासाठी उत्सुकता वाढलेली आहे. चला आपणही गुरु पौर्णिमेला जाऊया आणि संत डॉ. रामरावबापू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊया ! महान तपस्वी संत डॉ.रामराव बापू महाराज की जय हो !
“झमरका/लडी भजन”
आज मारो ब्रह्मचारी,
नवोनवो दिवायडो,
नवोनवो दिवायडो,
आईरो पालणों !!
गुरु बिना कुणं साईरे जगेम,
भाया बिना कुणं साईरे जगेम !!
— रामराव बापूर लुक्कड.
बापुला विनम्र अभिवादन करतो.
— लेखन : पंजाबराव चव्हाण. पुसद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800