कुणास काय ठाउकें |
कसे, कुठे, उद्या असू ?
निळ्या नभात देखिली |
नकोस भावना पुसू |
तुझ्या मनीच राहिले |
तुला कळेल गीत हे |
असेन मी, नसेन मी |
तरी असेल गीत हे |
फुलाफुलांत येथल्या |
उद्या हसेल गीत हे |
हे गीत लिहिणाऱ्या शांता शेळके आज जरी आपल्या मध्ये नसल्यातरी त्यांच्या साहित्यरुपाने त्या अजरामर आहेत.
शांता जर्नादन शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ साली इंदापूर (पुणे) येथे झाला.त्यांच्या अनेक रचना, गीत, मुलांचे साहित्य, वर्तमानपत्रात लेख, कथा, कांदबरी, कविता, चरित्र लेखन इ.प्रसिदध आहे. साहित्य प्रकारात त्यांची जवळपास १०० पुस्तके प्रकाशित आहे. त्यांच्या मृत्यू ६ जून २००२ रोजी झाला.
अशा या थोर कवयित्री, साहित्यिक शांताबाई शेळके यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त बालरक्षक प्रतिष्ठान आणि चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “साहित्य जननी” हा काव्यात्मक कार्यक्रम नुकताच ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता .
या काव्य मैफिलीत ठाणे शहरातील आजच्या आघाडीच्या कवी, कवयित्रींनी, “साहित्य जननी” कवयित्री शांताबाई शेळके यांच्या सदाबहार कविता, गीतांना सादर करून त्यांच्या कविता, गाण्यांना उजाळा दिला.
काव्य मैफिलीची सुरुवात, कवयित्री प्रतिभा भिडे यांनी केली. त्या म्हणाल्या, आज आपण शांताबाई शेळके यांचे स्मरण करतो आहोत. त्या चतुरस्त्र साहित्यिका होत्या. त्या आजही लोकप्रिय आहेत आणि आम्हाला वंदनीय आहेत. असे सांगून प्रतिभाताईंनी “विश्व प्रेमिकांचे” ही कविता सादर केली.
कवयत्री मयुरी कदम यांनी, शांताबाईंच्या “पावसा आधीचा पाऊस” या कथा संग्रहावरचा परिचय लेख वाचला. त्या म्हणाल्या, शांता शेळके यांना गीतांबरोबर ललित लेखनाची उत्तम जाण होती. शांताबाई म्हणायच्या, शब्दांची भाषा अपुरी पडते. म्हणून कलावंतांनी इतर भाषा शोधून काढल्या. त्यात रूप, रंग, रेषा यातून साहित्यिकांनी आपली निर्मिती केली.
आरती कुलकर्णी यांनी शांताबाईंच्या कविता म्हणजे, वहीतील पिंपळपान असे वर्णन करून या कविता म्हणजे भावनांचे वादळ आणि माळरानावरील रानफुलेच होती. भावना, संवेदनांच्या झालरीमधून शांता शेळके कविता लिहायच्या. हे मनोभाव व्यक्त करून आरती ताईंनी “हे एक झाड” कविता सादर केली.
प्रज्ञा पंडित यांनी सांगितले, शांताबाईंच्या सर्वच कविता मला जवळच्या वाटतात. पण त्यात पैठणी ही कविता फार आवडते. कारण स्त्री मन पैठणीच्या पदरात गुंतलेलं असतं. तो एक आठवणींचा प्रवास असतो. या भावना व्यक्त करून प्रज्ञा ताईंनी पैठणी ही कविता सादर केली.
माधुरी बागडे यांनी, “शरद चांदणं” हा व्यक्ती परिचय लेख सुंदरपणे वाचून दाखवला. शांताबाईंबद्दल त्या म्हणाल्या, शब्दांच्या श्रावण सरीतून मनामनात शांताबाईंनी काव्य बीज पेरलं. अशी संवेदना व्यक्त करून, माधुरी ताईंनी शब्द सुगंधाने भरलेला ललित लेख यथार्थ शब्दात मांडला.
ऍड रुपेश पवार यांनी, यावेळी सांगितले की शांताबाई शेळके यांच्या गीत संग्रहातील कोणते गीत सादर करायचे तेव्हा मला “शूर आम्ही सरदार” हे गीत घ्यावेसे वाटले. या कवितेत मावळ्यांची भावना आलेली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात मावळे कसे जीवावर उदार व्हायचे याचं सार्थ वर्णन या गीतात आहे. असं म्हणून रुपेश दादांनी नाट्यमय संवादात ही कविता पेश केली.
कार्यक्रमच्या अखेरीस कवी विनोद पितळे म्हणाले, या कार्यक्रमातील कविता, लेखातून शांताबाईंचे साहित्य उलगडण्याचा प्रयत्न झाला. शांता शेळके यांच्या साहित्यावर अशाप्रकारे एक ग्रंथ होऊ शकतो. इतके त्यांचे सदाबहार लेखन आहे. यावेळी विनोद दादांनी “नवीन वर्षा तुझ्या स्वागता” ही कविता अतिशय सुंदरतेने श्रोत्यांसमोर सादर केली.
अशा रितीने कवयित्री शांता शेळके यांच्या गीत काव्य साहित्यकृतीवर अप्रतिम मैफिल सजवली गेली. यात शांताबाईंच्या सर्वांग सुंदर कविता, काव्य कलाकारांनी सादर केल्या आणि कवयित्री, साहित्य जननी, साहित्य शारदा अशा शांता शेळके यांच्या साहित्य आठवणी जागवल्या. असा हा अभूतपूर्व, उत्तम, उत्साही काव्य सोहळा संपन्न झाला
या कार्यक्रमात बालरक्षकच्या अध्यक्षा डॉ राणीताई स्वागतपर प्रास्ताविकात म्हणाल्या की, “साहित्य जननी” हा साहित्यिक कार्यक्रम मराठीत असला तरी, आपल्या हिंदी भाषिकांना काव्यातील संवेदना, भावना कळतील. कारण बालरक्षकचे पालक, शिक्षक, सदस्य संपूर्ण देशभरातून जोडलेले आहेत. बालरक्षक प्रतिष्ठानचे सचिव श्री नरेश वाघ यांच्या प्रयत्नांनी मोठ्या संख्येने भारतातील शिक्षक वृंद प्रतिष्ठानला जोडला जातोय.
ऍड रुपेश पवार प्रास्ताविकात म्हणाले, कवयित्री शांताबाई शेळके यांनी साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात आपल्या गीत, काव्याने रसिकांची मने जिंकली. अशा या शांताबाईंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही हा छोटेखानी काव्यमय कार्यक्रम आपल्यासमोर आणला आहे. आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद पितळे यांनी सांगितले, शांताबाई शेळके ह्या साहित्य बागेतील फुलांमधील सोनचाफ्याचे फुल आहेत. विविधांगी लेखन प्रकारात शांताबाईंनी साहित्य निर्मिती केली आहे. विनोद पितळे यांनी दूरदर्शनवरील, रानजाई या कार्यक्रमाचा उल्लेख केला. त्यामध्ये शांताबाई अनेक लोक गीताबद्दल बोलत असायच्या. त्यामुळे तो कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. यानंतर त्यांनी “साहित्य जननी” कार्यक्रमातील सर्व मंडळींचे आभार मानत असे साहित्यिक कार्यक्रम झाले पाहिजेत. अशी भावना व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे सुंदर, भावमधुर, काव्यमय सूत्रसंचालन, कवयित्री नीता माळी यांनी केले. त्यांच्या वाणीतून शांताबाईंच्या काव्यधारा जणू बरसात होत्या. संगीता पेठे यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.
“बालरक्षक प्रतिष्ठान”
बालरक्षक प्रतिष्ठान ही संस्था देशातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बहुमूल्य असे कार्य करत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी निरनिराळे ऑनलाइन सेमिनार आयोजित केले जातात. या संस्थेच्या सेमिनारमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचे कार्यक्रम झाले आहेत.
संस्थेच्या अध्यक्षा आणि बालमानस तज्ञ डॉक्टर राणी खेडीकर या वेगवेगळ्या तज्ञांना आपल्या संस्थेशी जोडत असतात. सध्या त्या कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधी पुरवठा उभा करत आहेत. या कामी त्यांना अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड सहकार्य करीत आहेत.
हे एक विधायक अनमोल कार्य आहे. या कार्यात आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलावा याकरता राणी खेडीकर प्रयत्न करत असत.
या सामाजिक कार्यातूनही वेळात वेळ काढून असे साहित्यिक कार्यक्रम त्या संस्थेच्या फेसबुक पेज वरून भारतातील साहित्य रसिकांपर्यंत पोचवत असतात. देशाचा अनेक राज्यात बालरक्षक प्रतिष्ठानचे शिक्षक सदस्य आणि पालक विद्यार्थी अनेक आहेत. त्यांच्या या साहित्यिक कार्यकर्ते ऍड रुपेश पवार यांनी आपल्या चैतन्य चॉरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साहित्यिक कार्यक्रम देण्याचा विडा उचलला आहे. त्यातील हे दुसरे पुष्प होते.
यावेळी बालरक्षक प्रतिष्ठानचे सचिव श्री नरेश वाघ कोषाध्यक्ष श्री प्रसन्नजीत गायकवाड कार्याध्यक्ष मनोज चींचीर, तसेच वैशाली काकडे, श्री जयसिंग पडवळ, कल्पना शेंड, माधुरी सलोकर ही संपूर्ण टीम उपस्थित होती. अगदी सुंदररित्या हा कार्यक्रम बालरक्षक प्रतिष्ठान पेजवर प्रसारित झाला.
अन्य काही सामाजिक, साहित्यिक कार्यक्रम, उपक्रम याविषयी आपल्या सूचना, कल्पना स्वागतार्ह आहेत.
– लेखन : अमिता कदम
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
