आपण या जगात आपले अस्तित्व घेऊन येतो तो आपला प्रगटदिन.
कोणत्यातरी दिवशी, कधीतरी आपण आपल्या जन्मदात्रीच्या कुशीतून बाहेर पडून एक स्वतंत्र ओळख निर्माण करतो आणि मग तो दिवस दरवर्षी आपण वाढदिवसाच्या नावाने साजरा करतो. हा दिवस प्रत्येक वर्षी आपणा सर्वांना, आपल्या कुटुंबाला, मित्र परिवाराला, शेजारी पाजारी, सहकाऱ्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो.
मनुष्य स्वभावाचा एक पैलू आहे तो म्हणजे त्याला नेहमी आपण सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु व्हावे, असे वाटत असते. अगदी बालवयापासून म्हणजे ज्या वयात त्याला काहीही कळत नसते तेव्हादेखील आपल्या मातेने आपल्याकडे सतत पाहत राहावे असेच त्या बालकाला वाटत असते. तेव्हा त्याला सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे त्याची आईच असते.
आपल्या बाललीला दाखवून तो सतत आईला आपल्याकडे लक्ष दे असेच सुचवत असतो. थोडासा मोठा झाल्यावर मग इतर भावा बहिणींपेक्षा आपणच कसे हुशार आहोत हे ज्याला त्याला दाखवण्यात त्याला खूप आनंद वाटत असतो.
एकूणच प्रत्येकाने आपले कौतुक करावे, गुणगान गावे या गोष्टींतून बालक अगदी सुखावत असतो आणि त्यामुळेच वर्षातून येणारा त्याचा हक्काचा, फक्त त्याचाच असणारा दिवस जेव्हा येतो तेव्हा तो अगदी सुखसागरात लोळत असतो, कारण या दिवशी प्रत्येकजण त्याची जातीने विचारपूस करत असतो, त्याला जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतो, पुढील वाटचालीसाठी यशाची कामना करत असतो. अगदी सर्वांच्या मनोपटलावर त्यादिवशी त्याचेच राज्य असते.
प्रत्येक वाढदिवस हा त्याच्या आयुष्याच्या तिजोरीत एकेका वर्षाची भरच घालत असतो. दरवर्षी तो अनुभवाने, कर्तृत्वाने संपन्न होत असतो. वाढदिवशी त्याचे चित्त अगदी कौतुकाने फुलत असते आणि सर्वांच्या मनातील आपले स्थान, त्यांच्या आपल्याबद्दलच्या भावना यांनी त्याच्या आनंदात भरच घातली जात असते.
मनुष्य मग तो लहान असो वा मोठा, वृद्ध असो वा तरुण, हा दिवस म्हणजे त्यांच्या रोजच्या, त्याच त्याच दिनचर्येत असणारा कंटाळा दूर करणारा आणि आपण ही कोणाला तरी हवेसे वाटतो आहोत या भावनेचे सुख देणारा विलोभनीय दिवस. त्यामुळेच की काय प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात दरवर्षी तो मोठ्या दिमाखाने अवतरत असतो.
– लेखन : मानसी लाड.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.