Saturday, July 5, 2025
Homeबातम्यासामाजिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी लेखणी झिजवावी - डॉ सुधीर गव्हाणे

सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी लेखणी झिजवावी – डॉ सुधीर गव्हाणे

राजकीय स्वातंत्र्यासाठी बाळशास्त्री जांभेकर, बाबूराव पराडकर या दोन मराठी पत्रकारांचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्याबद्दलचे स्फुल्लींग भारतीयांच्या मनात चेतविणारी त्यांची पत्रकारिता प्रेरणादायी होती. स्वातंत्र्योत्तर भारतात सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी आता पत्रकारांनी लेखणी झिजवावी असे आवाहन माजी कुलगुरू तथा माध्यम तज्ञ डाॅ. सुधीर गव्हाणे यांनी केले.

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीने दर्पण दिनानिमित्ताने “स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांचे योगदान” या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. उद्धव भोसले होते तर प्रकुलगुरू डाॅ. जोगेंद्रसिंह याची यावेळी विशेष उपस्थिती होती.

डाॅ. गव्हाणे यांनी बाळशास्त्री जांभेकरांचे मराठी पत्रकारितेत असणाऱ्या योगदानाचे विश्लेषण करून
आ.कृ वाघमारे यांनी निजामशाहीच्या दडपशाहीला न जुमानता केलेली झुंझार पत्रकारिता मराठवाड्याच्या पत्रकारितेला उंचीवर घेऊन गेली असे सांगितले. साने गुरूजी, पंडीत जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, म. गांधीजी यांची पत्रकारिता स्वातंत्र्य संग्रामाला गतिमान करण्यासाठी केलेली तेजस्वी पत्रकारिता होती, ती आजही प्रेरणादायी आहे असे डॉ गव्हाणे म्हणाले.

डाॅ. गव्हाणे पुढे म्हणाले की, राजकीय स्वातंत्र्यासोबत म. ज्योतीराव फुले यांची सत्यशोधकांची पत्रकारिता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकपत्रकारिता ही सामाजिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कासाठी तितकीच मोलाची पत्रकारिता होती. स्वतंत्र पत्रकारिताच प्रगल्भ लोकशाहीला जन्म देते. प्रगल्भ लोकशाही सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करते, असेही ते म्हणाले.

कुलगुरु डॉ उध्वव भोसले यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगती सोबतच माध्यमांनी केलेल्या प्रगतीचा मागोवा घेतला. बदलत्या तंत्रा सोबत बदल घडवून आणणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. स्वातंत्र्याचा लढा तीव्र करण्यासाठी तत्कालीन पत्रकारिता खूप प्रभावी ठरल्याचे डॉ भोसले यांनी सोदाहरण सांगितले. आजच्या बदलत्या परिस्थितीत सकारात्मक पत्रकारितेची गरज असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना प्र कुलगुरु डॉ जोगेंदर सिंह बिसेन यांनी पत्रकारितेच्या उज्ज्वल इतिहासाची माहिती दिली. इतिहासातून आपण शिकलो पाहिजे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रा.डाॅ. दिपक शिंदे यांनी केले. तर संचालन व आभार डॉ राजेंद्र गोणारकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. सुहास पाठक, डाॅ. सचिन नरंगले, डाॅ.कैलास यादव व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .
– टीम एनएसटी. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments