संत मीराबाई
मराठी साहित्य विश्वातील संत कवयित्री संत मीराबाई यांची आज ओळख करून घेऊ या..
संत मीराबाई..! भारतीय संत-कवी परंपरेतील एक अद्भुत दुवा.. भगवान कृष्णाच्या भक्तीत दंग होऊन ज्यांचे जीवन केवळ कृष्णमय झाले अशा संत मीराबाई… !!
सोळाव्या शतकात राजस्थानमध्ये संत मीराबाई या थोर श्रीकृष्ण भक्त होऊन गेल्या… वैष्णव भक्ति परंपरेतील संतां पैकी एक संत मीराबाई या आहेत.
अनेक अभ्यासकांच्या मते संत रैदास हे त्यांचे गुरू ..
श्रीकृष्णाची परमभक्त मीराबाईने सोळाव्या शतकात बाराशे ते तेराशे
अभंग लिहून ठेवले आहेत. ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये संत मीराबाई यांनी ईश्वराप्रती त्यांचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.

संत मीराबाई भगवान कृष्णाच्या स्तुतीसाठी गायलेल्या अनेक सुंदर भजनांसाठी प्रसिद्ध आहेत. काही प्रसिद्ध भजन गीते..”ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन.. “पायो जी मै श्याम रतन धन पायो”…
आपल्या रचनांच्या अखेरीस त्या “मीरा के प्रभू गिरिधर नागर” असे म्हणत. त्यांनी कृष्णालाच आपले प्रभू मानले होते व आपले सर्वस्व त्याच्या चरणीच अर्पण केले होते हेच यातून सिद्ध होत राहते.
संत कबीर, तुलसीदास अशा उत्तर हिंदुस्थानी संत-कवी परंपरेत त्यांचे स्थान मानाचे आहे.
त्यांच्या एका लोकप्रिय रचनेत त्यांनी आपल्या जीवनाचे जणू गमकच उलगडले आहे. त्या म्हणतात…
पायो जी म्हे तो
राम रतन धन पायो
वस्तु अमोलक दी मेरे
सतगुरु किरपा कर अपनायो
जनम जनम की पूंजी पाई
जग में सभी खोवायो
खायो न खरच चोर न लेवे
दिन-दिन बढ़त सवायो
सत की नाव खेवटिया सतगुरु
भवसागर तर आयो
मीरा के प्रभू गिरधर नागर
हरस हरस जश गायो
मीराबाईच्या ह्या भजनांना राजस्थानी बोली भाषेत पाडा किंवा पाडली म्हणत असत. ही सगळी भजन मीराबाईने ब्रीज (वृंदावनात बोलली जाणारी) आणि राजस्थानी भाषेत लिहीलेली आहेत.
कृष्ण प्रेमापोटी वेड्या झालेल्या संत मीराबाई ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे मानू लागल्या.. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. संत मीराबाई यांनी त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही असा प्रतिसाद त्यांना मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर संत मीराबाई यांनी दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात त्या फिरल्या.

संत मीरबाई यांची पदे अत्यंत भावोत्कट व गेय असून ती विविध रागांत बद्ध आहेत.. त्यांत विविध अलंकारांचाही वापर केला आहे. त्यातील स्त्रीसुलभ आर्तता, आत्मार्पण भावना, भावोत्कटता व सखोल अनुभूतीच काव्यदृष्ट्या अधिक श्रेष्ठ ठरते. ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर’ ही त्यांच्या अनेक पदांत येणारी नाममुद्रा होय… कृष्णविरहाची पदे त्यांत संख्येने अधिक असून ती उत्कट व हृदयस्पर्शी आहेत.
संतचरित्रकारांनी व संतांनी मीरेबद्दल अत्यंत आदराने गौरवोद्गार काढले आहेत. मध्ययुगीन राजस्थानी, गुजराती व हिंदी साहित्यात संत कवियित्री म्हणून संत मीराबाई यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. भाषिक प्रदेशांच्या मर्यादा उल्लंघून भारताच्या कानाकोपऱ्यांत संत मीराबाईंची भक्तिभावाने ओथंबलेली उत्कट पदे पोहोचलेली आहेत…
त्या कधीच वैवाहीक आणि पारंपारिक आयुष्यात कधीच रमल्याच नाहीत. कृष्णाच्या निस्सीम भक्तीमुळे त्या राजघराणे सोडून सामान्य लोकांमध्ये मिसळत असत. त्यापायी त्यांना अनेक अत्याचार सहन करावे लागले. दोन वेळा तर त्यांच्यावर विषप्रयोगही करण्यात आला. वयाच्या तिसाव्या वर्षी मीराबाई मथुरा, वृंदावन मध्ये जाऊन शेवटी द्वारिकेत त्यांना मुक्ती मिळाली…

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
कृष्णभक्तीत रंगून गेलेल्या मिराबाई या श्रेष्ठ संतकवियित्री होत्या.