“साहित्य संमेलन: लोटांगण घालून स्वाभिमान कसा जपणार ?” या माझ्या लेखावर आलेल्या असंख्य मान्यवरांच्या, साहित्य प्रेमी, रसिकांच्या मिळालेल्या प्रतिसादावर, माझ्या विचारांवर आणि आंतरजाल वर उपलब्ध असलेली माहिती याच्या आधारावर मी पुढील लेख लिहिला आहे.
९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नुकतेच नवी दिल्ली येथे होऊन गेले. हा ९८ आकडा वाचून कदाचित असे वाटू शकते की, हे संमेलन गेली ९८ वर्षे भरत आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही.
पहिले संमेलन –
ग्रंथ प्रसाराला चालना मिळावी, त्यासाठी एकत्र येऊन विचार विनिमय व्हावा या हेतूने न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी असे संमेलन आयोजित करण्याबाबतचे आवाहन पुण्यातूनच प्रकाशित होणाऱ्या ज्ञानप्रकाश वृत्तपत्राच्या ७ फेब्रुवारी १८७८ रोजी च्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानुसार पहिले मराठी साहित्य संमेलन (त्या काळात साहित्यिक या ऐवजी ग्रंथकार म्हणत, पण आता साहित्यिक शब्द रूढ झाल्याने मी साहित्यिक हाच शब्द योजत आहे) ११ मे १८७८ रोजी पुणे येथे न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याच अध्यक्षतेखाली भरले होते.
तर दुसरे संमेलन तब्बल ७ वर्षांनी, म्हणजे १८८५ साली पुन्हा पुण्यातच बुधवार पेठेतील दाणे आळीतील (आज ही दाणे आळी, बुधवार पेठ कशासाठी कुख्यात झाली आहे, हे पाहिले की, हा इतिहास वाचून आश्चर्य वाटते!) पुणे सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहात झाले होते.
तर तिसरे संमेलन २० वर्षांनी १ मे १९०५ रोजी सातारा येथे वकील र पा उर्फ दादासाहेब करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. थोडक्यात संमेलने जरी ९८ झाली असली तरी मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास हा १४५ वर्षांचा आहे.
साहित्य महामंडळ –
मुंबई प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ,मराठवाडा हे भाग एकत्र येऊन १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यामुळे साहित्य व्यवहारात सुसूत्रता येण्यासाठी त्याच वर्षी महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती नुसार स्थापन झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूर या संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना केली.
या महामंडळाचा चांगला विस्तार झाला असून आज मितीला महामंडळाच्या ३५० शाखा असून १२ हजारच्या वर सदस्य आहेत. महामंडळाच्या महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यातील काही शहरात शाखा आहेत.
हे महामंडळ संमेलनासाठी निमंत्रण देणाऱ्या संस्थांच्या निमंत्रणावरून निवड करून संमेलनाचे स्थळ निश्चित करून स्थानिक आयोजक संस्थेच्या सहाय्याने दर वर्षी साहित्य संमेलन भरवित असते.
पूर्वी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड ही या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची निवडणूक होऊन होत असे. मात्र गेली काही वर्षे अशी निवडणूक न होता, महामंडळ ठरवेल त्या साहित्यिकाची संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येते.
भरलेली संमेलने –
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही प्रामुख्याने महाराष्ट्रात होत असली तरी महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातच नव्हे तर विश्व साहित्य संमेलन म्हणून अमेरिका (२००९), दुबई (२०१०), सिंगापूर (२०११), कॅनडा (२०१२) या देशात तसेच पोर्टल ब्लेअर (२०१५) अशी भरली होती. तर गेली ३ वर्षे महाराष्ट्र शासनाच विश्व मराठी संमेलन आयोजित करीत आहे. या शिवाय अनेक छोट्या मोठ्या, नोंदणीकृत, अनोंदणीकृत संस्था, व्यक्ती विश्व अथवा जागतिक नावाने विविध देशात संमेलने आणि त्याला जोडून पर्यटन असे उपक्रम सशुल्क आयोजित करीत असतात. या शिवाय विविध देशातील मराठी मंडळे त्या त्या देशात, खंडात संमेलने आयोजित करीत असतात.
३८३ संमेलने –
आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ३ दिवस चालणाऱ्या प्रमुख संमेलना व्यतिरिक्त मराठी मातृभाषा असलेल्या विविध राजकीय, साहित्यिक, सामाजिक विचारधारा असलेल्यांची, धर्मियांची, जातींची, घटकांची, विभागांची, जिल्ह्यांची मिळून जवळपास ३८३ संमेलने महाराष्ट्रात होत असतात. अशी संमेलने आयोजित करणाऱ्या, निकषांची पूर्तता करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र शासन अनुदान देखील देत असते.
एकंदरीत उपरोक्त सर्व साहित्य व्यवहार (इथे व्यवहार हा शब्द, साहित्यिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, भौगोलिक अशा व्यापक अर्थाने वापरला आहे) पाहता, हा सर्व व्यवहार अधिक चांगला, सुसूत्रपणे व्हावा या साठी काही सूचना कराव्याशा वाटतात.
१) आज जगात जवळपास १२ कोटी लोक मराठी भाषिक आहेत. त्यामुळे मराठी सर्वाधिक भाषा बोलणाऱ्यांच्या यादीत जगात दहाव्या स्थानावर आहे, ही आपली फार मोठी शक्ती आहे, याचा सर्व मराठी भाषिकांनी अभिमान बाळगून दैनंदिन जीवनात मराठीचाच वापर केला पाहिजे.
२) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांच्या घटनेची मोठ्या प्रमाणात जाहिरात करून विविध संस्था, व्यक्ती यांच्याकडून नवीन कल्पना, हरकती, सूचना मागवाव्यात. जेणे करुन या महामंडळाची कालानुरूप तसेच मराठी भाषेपुढील, साहित्यापुढील आव्हाने विचारात घेऊन घटना तयार करता येऊ शकेल.
३) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यक्षेत्र हे रीतसर विश्वव्यापी व्हावे यासाठी अखिल भारतीय ऐवजी जागतिक मराठी साहित्य महामंडळ असे नाम करण करावे.
४) देशात आणि परदेशात होत असलेली संमेलने यांना कशा प्रकारे घटक संस्था म्हणून दर्जा देता येईल,मार्गदर्शन करता येईल याचा विचार करून त्या प्रमाणे नियमावली, कार्य पद्धती निश्चित करण्यात यावी. महामंडळाने अशा छोट्या मोठ्या संमेलनांशी फटकून न वागता, स्वतःला त्यांचा मोठा भाऊ समजून “दादा”गिरी न करता, आपण या संमेलनाची मातृ संस्था आहोत, अशी विशाल, व्यापक भूमिका घेऊन आई च्या ममतेने या सर्व संमेलनांकडे पाहिले पाहिजे, त्यांची जोपासना, संगोपन केले पाहिजे.
५) आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या बरोबरच महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, मराठी विश्वकोश मंडळ, साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी भाषा विकास संस्था, महाराष्ट्र शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, विविध विद्यापीठांचे मराठी भाषा विभाग, नव्याने स्थापन करण्यात आलेले मराठी भाषा विद्यापीठ, विविध मराठी प्रसार माध्यमे, मराठी पत्रकारांच्या संघटना, देश, परदेशातील अन्य ज्या काही संस्था, व्यक्ती आहेत, अशा जरी प्रत्येक संस्थेचे उद्देश, स्वरूप, कार्य हे भिन्न असले तरी सर्वांचे मूळ मराठी भाषा आणि त्या अनुषंगाने मराठी माणूस सक्षम, समृद्ध कसा होईल हाच असल्याने, या सर्व संस्थानी एकत्र येऊन त्या परस्पर पुरक कशा ठरतील, याचा विचार विनिमय करून एक निश्चित दीर्घकालीन कृती आराखडा तयार करावा .यामुळे समाजाला दिशा देण्याची अपेक्षा असलेल्या साहित्याला, साहित्य व्यवहारालाच नवी दिशा मिळेल, असे वाटते.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००.
नमस्कार छान.हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह शुभ रात्री 🌹
खूप अभ्यासपूर्ण लेख.सूचनाही चांगल्या.