Thursday, March 13, 2025
Homeलेखसाहित्य संमेलन : लोटांगण घालून स्वाभिमान कसा जपणार ?

साहित्य संमेलन : लोटांगण घालून स्वाभिमान कसा जपणार ?

भारतातच नाही, तर जगातील इतर कुठल्याही भाषेचे साहित्य संमेलन गेली ९८ वर्षे भरत आलेले नसेल, असे मला वाटते. त्यामुळे २ वर्षांनी शंभरी गाठणारे मराठी साहित्य संमेलन हा एक जागतिक विक्रम ठरेल.

“नेमेचि येतो पावसाळा” या म्हणीप्रमाणे दरवर्षी संमेलन येऊ घातले की काही काही गोष्टींवर तीच तीच चर्चा, तीच तीच टीका टिप्पणी होत असते. संमेलन एकदा पार पडले की परत पुढील संमेलन येईस्तोवर सर्व कसे शांत शांत असते. या वर्ष भराच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ काय करीत असते, कोणास ठाऊक ?

या संमेलनावर, दरवर्षी जे काही आक्षेप घेतले जातात, त्यातील काही प्रमुख आक्षेप म्हणजे संमेलन सरकारी अनुदानाशिवाय होऊ शकत नाही, स्थानिक आयोजक संस्था आणि त्या संस्थांच्या सूत्रधार व्यक्ती यांच्या ताब्यात संमेलन जात असते आणि ते इतके जाते की, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ देखील काही करू न शकता बघ्याच्या भूमिकेत जाते. या संमेलनात कुठले परिसंवाद घ्यायचे,त्यासाठी कुणाला बोलवायचे ? का बोलवायचे ? हे नेमके कोण ठरवीत असते, ही तर जणू अतिशय गोपनीय बाब आहे, अशी परिस्थिती आहे. दुसरी बाब म्हणजे आर्थिक व्यवहार. एकीकडे शासन व्यवहारासाठी माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आहे तर तो अशा सार्वजनिक कार्यक्रम, उपक्रमांना लागू करण्याची वेळ येऊ न देता या साहित्य महामंडळाने, संमेलनासाठी किती, कसे पैसे जमा झाले, ते कसे खर्च झाले, याचा हिशेब स्वतःहून जाहीर केला पाहिजे. तसेच या संमेलनासाठी देण्यात येत असलेली लाखो रुपयांची कामे म्हणजे मंडप उभारणी, सजावट, भोजन व्यवस्था ही कंत्राटे कुणाला, कशाच्या आधारावर दिली गेली आहे, हे समाजाला कळायला हवे. एकीकडे शासनात असा नियम आहे की, कोणतीही खरेदी (वस्तू व सेवा) ही जर ५० हजार रुपयांच्या आतील असेल तर ३ दर पत्रके मागवून ती, त्या त्या कार्यालयाच्या खरेदी समिती समोर उघडून, त्यांची तुलना करून काम दिले जाते. तर रु.५० हजारच्या वरील खरेदी असेल तर वृत्तपत्रांत जाहिरात देऊन दर पत्रके मागवून, पुन्हा ती खरेदी समिती समोर ठेवून, त्यांची तुलना करून कामे/कंत्राटे दिली जातात. शासनात जर ही कार्यपद्धती आहे, तर शासनाच्या अनुदानावर भरत असलेल्या या संमेलनाच्या बाबतीत, महामंडळ ही कार्य पद्धती का अवलंबित नाही ?

काही वर्षांपूर्वी साहित्य महामंडळाने संमेलन स्वायत्तपणे भरविता यावे, यासाठी महानिधी गोळा करण्याचा उपक्रम राबविला होता. या उपक्रमामुळे किती निधी गोळा झाला, कुणी किती निधी दिला, आता या उपक्रमाची सद्यस्थिती काय आहे ? हे ही या महामंडळाने जाहीर केले नाही. खरं म्हणजे, ही एक अतिशय स्वागतार्ह कल्पना असून ती अतिशय जोरकसपणे राबविण्याची गरज आहे. त्या शिवाय महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वतंत्र होण्यासाठी काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, या विषयावर महामंडळाने लोकांची, तज्ञांची मते, विचार, कल्पना मागवाव्यात आणि त्या दृष्टीने एक निश्चित कृती आराखडा निश्चित करून त्याची सुनियोजितपणे अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे.

यासाठी काही उपाय मला सुचतात ते म्हणजे, संमेलनात सहभागी होण्यासाठी सर्वांकडून रास्त मूल्य आकारण्यात यावे. संमेलन मोफत असू नये. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी लिलाव करून जी दूरचित्रवाणी वाहिनी अधिक ची बोली बोलेल, त्या वाहिनीला असे थेट प्रक्षेपणाचे अधिकार द्यावेत. या अशा दोन्ही उपायांमुळे भारतीय क्रिकेट मंडळ हजारो कोटी रुपयांचे धनी झाले आहे, तर साहित्य महामंडळ का होऊ शकणार नाही ?

इथे आणखी एक वस्तुस्थिती विचारात घेतली पाहिजे. मुळातच भारतीय मानसिकता ही परावलंबी आहे. आपले भले “एक तर ईश्वर करेल नाही तर सरकार करेल”, अशा या मानसिकतेमुळे ईश्वर तर काही प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून आपण आपल्या भल्याची अपेक्षा आधी राजेशाही असताना राजा कडून करायचो तर ब्रिटिश आल्यापासून जी सरकार ची नवी व्यवस्था उदयास आली, तेव्हापासून सरकार कडून करीत आलो आहोत. त्यातूनच “मायबाप सरकार” ही संकल्पना पुढे येत गेली आणि सर्वांच्या रक्तात ती चांगलीच भिनत गेली. त्यामुळे आपण नेहमीच “प्रजाहित दक्ष राजा” आणि आता लोकशाहीत “प्रजा हित सरकार” ची अपेक्षा करतो आणि ती करावीही. पण मुळात प्रजा जो पर्यंत “स्वहित दक्ष प्रजा” होत नाही, तो पर्यंत लोकशाही पूर्णपणे रुजली ,असे म्हणता येणार नाही. अर्थात लोकशाही ही पूर्णपणे निर्दोष शासन व्यवस्था आहे, असेही नाही. पण जगात ज्या काही नऊ दहा शासन व्यवस्था आहेत, त्यांच्याशी तुलना करताना ती एक नंबरची आहे, असे मात्र निश्चितपणे म्हणता येईल.

इथे आपण असे म्हणू शकतो की, लोकशाही शासन व्यवस्थेत सरकारने अशा संमेलनाला मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारची ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सरकारमधील व्यक्ती महत्वाच्या ठरतात. त्यामुळे मनधरणी करणे, त्यांचे ऐकणे हे ओघाने येतेच. ते कसे टाळता येईल ? उद्या मी किंवा तुम्ही जरी सत्तेवर आलो, तरी आपणही तेच करू. आपण पूर्णपणे निस्पृह राहू शकू, याची आपण तरी हमी देऊ शकतो का ? त्यामुळे आपण व्यवस्थाच अशी निर्माण केली पाहिजे की, ती व्यवस्थेच्या आधारेच सक्षमपणे चालली पाहिजे, कुठल्या व्यक्तीच्या आधारे नव्हे !

या निमित्ताने आपण आताच जर असा संकल्प केला की, शंभरावे आणि त्या पुढील सर्व साहित्य संमेलने, साहित्य व्यवहार असे सर्व काही, साहित्य महामंडळ स्वतःच्या ताकदीने करेल आणि त्या साठी या महामंडळाला आपण ताकद दिली पाहिजे,तरच साहित्य संमेलन कुणाच्या हातात गेले, ते कुणी कसे वापरून घेतले अशा या काही बाबींना कायमचा आळा बसेल, असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते ?

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. साहित्य संमेलन यशस्वी होण्याकरता लागणारी व्यवहार कुशलता साहित्यिकांकडे असेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे त्यांना स्वतःचीच एको सिस्टीमची गरज लागते. ती नसेल तर राजकारणी मंडळी या संधीचा फायदा घेणारच.

    आपण सुचवलेले मार्ग योग्यच आहे. पण त्याकरता लागणारे धाडस आणि संघटन कौशल्य साहित्यिकांनी आत्मसात केलंच पाहिजे.

  2. देवेंद्र यांना, आपण अतिशय रास्त सूचना केली आहे. काही वर्षांपूर्वी स्वखर्चाने रसिक जात असत. त्याचे नियोजन एक दोन महिने आधी चाले. त्यांच्या खोल्या शाळांमध्ये निश्चित होत असत. म्हणजे नाताळच्या सुट्टीच्या काळात ते भरे. उन्हाळी सुट्टीत ते अवघड असे. माझे आई वडील संमेलनास जात, मी पत्रकारितेत असल्यापासून काही संमेलनांना हजर राहिलो. खरच ऑफिस करीत असे. म्हणजे संमेलनकर्त्यांची मर्जी सांभाळावी लागत नसे. दुसरी सुचना तितकीच महत्वाची. सरकारी मदत म्हणजे साहित्यिकांना विकत घेणे नव्हे. रायपुर च्या संमेलनास जयंतराव टिळक मंत्री म्हणून शासनाचा चेक घेऊन गेले. साहित्यिक ते होते, पण आग्रह करूनही ते व्यासपीठावर चेक देण्यापुरतेच गेले आणि समोर श्रोत्यांमध्ये बसले. त्यानंतर असे घडल्याचे दिसले नाही. दिलीप गडकरी यांची सूचना हास्यास्पद आहे. हे संमेलन सर्वाचे असते, ते जातीय असत नाही. जातीवर साहित्यिक निवडला जात नसावा, अन्यथा अनवस्था ओढवेल.

  3. स्वाभिमान आणि लोटांगण असे टोकाचे म्हणण्यातील विखार बाजूला ठेवून काय करता येईल यावर विचार करायला हवा. भपकेबाज मांडणी, प्रवासखर्च, जमलेल्यांना रुचकर मेनूचे त्रिकाळ उदरभरण वगैरे अनिवार्य बजेट सरकारने भरीव तरतूद केल्याशिवाय पार पाडता येत नाहीत. शिवाय काहीही न करता घर बसल्यांंसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करताना मिळणाऱ्या लागणारा आजन्म र्थिक बुर्दंड पाहता ही म्हणजे सुंठवड्याची खिरापत आहे.

  4. आपल्या नावामुळे कै राम गणेश गडकरी यांची आठवण झाली.
    कै दिलीप चित्रे आठवले. हयात लेखकांपैकी आपण कोणाचे नाव सुचवू शकाल?

  5. भुजबळ साहेब

    आपण साहित्य संमेलना संदर्भात जी प्रतिक्रिया दिली आहे ती योग्य आहे. खर्चा संदर्भात सरकारवर अवलंबून राहणे योग्य नाही.तसेच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडताना कोणत्याही एका जातीचे वर्चस्व असणे योग्य नाही १४७ वर्षात ९८ साहित्य संमेलनं झाली त्यात जवळ जवळ सत्तर एकाच जातीचे अध्यक्ष झाले आहेत. अपवादात्मक इतर काही जातीचे अध्यक्ष झाले परंतु ” सीकेपी समाजाचा ” एकही अध्यक्ष झाला नाही.मराठी साहित्यात अनेक सीकेपी साहित्यिकांचे योगदान असताना एकालाही संधी कां मिळाली नाही? याचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे. कमीत कमी दोन वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या शंभराव्या साहित्य संमेलनात तरी त्यांना संधी मिळावी ही अपेक्षा.

  6. अतिशय प्रबोधन करणारा लेख
    खरच या संमेलनाबाबत होणारा खर्च ही अनाकलनीय बाब आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित