कुंभेफळ, छत्रपती संभाजीनगर येथील सौ सुकन्या सावंत या गृहिणीने निर्मिती केलेल्या प्रेरणादायी, कौतुकास्पद अशा पहिल्या मराठी “ए आय शिवचरित्रपटा”ची ही यशोगाथा. महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा.
— संपादक
मराठवाडा मागासलेला अशी चुकीची समजूत असलेल्यांच्या तोंडात मारणारी बातमी नुकतीच बघण्यात आली.
महिला दिनाच्या निमित्ताने ए बी पी माझा ने कुंभेफळ, छत्रपती संभाजीनगर येथील सौ सुकन्या सावंत हिची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत यू ट्यूब वर उपलब्ध आहे.

सुकन्या हिच्यात खूप टॅलेंट आहे असे माझे व्यक्तिगत मत छत्रपती संभाजीनगर येथील अल्पकालीन वास्तव्यात प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध झाले आहे. कुंभेफळ या लहानशा गावातील ही तरुण गृहिणी एम सी ए झालेली असून दोन वर्षांच्या बाळाची आई आहे.
गरज ही शोधाची जननी आहे असे मानले जाते. आज सर्वच घरात मोबाईल चे प्रस्थ वाढले आहे. सुकन्या चे मूल जेवताना मोबाईल शिवाय घास घेत नसे. अशा वेळी तिच्या मनात असा विचार आला की बाळाला नाराज न करता जेऊ घालायचे तर फालतू गाणी, व्हिडिओ मोबाईलवर दाखविण्या ऐवजी त्याला चांगले संस्कार करणारे काहीतरी दाखवले पाहिजे,
जे आपल्या मातीशी जुळणारे, संस्कृतीशी नाते जोडणारे अन् सोबतीने मनोरंजन करणारे, उत्साह वाढविणारे देखील असेल. हा विचार करता करता तिच्या मनात साकारले ते शिवचरित्र. बालपणापासून मुलाला शिवरायाची गोष्ट रंजक स्वरूपात सांगायला हवी, तीही व्हिडिओच्या माध्यमातून. ही कल्पना सुचताच सुकन्या ने शिव चरित्राचे अभ्यास, वाचन सुरू केले. तिच्या लक्षात आले की हे शिव धनुष्य पेलणे सोपे नाही. कारण शिवाजीवर आपण स्वतः काही निर्मिती करायची तर ते सगळे सत्याला धरूनच हवे. तिचा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन चा अभ्यास असल्याने तिने त्या दिशेने विचार सुरू केला.

गेल्या काही काळात ए आय चा बोलबाला वाढलेला. मग ए आय चा वापर करून शिव चरित्रा वर आधारित बोलपट का निर्माण करू नये मुलांसाठी ? त्या दिशेने ध्यास सुरू झाला. सत्याला धरून सगळे दाखवायचे तर शिवाजीवर आधारित ऐतिहासिक बखरीचा अभ्यास केला पाहिजे. जुनी कागदपत्रे, चरित्रे, शिवाजी वर आधारित साहित्य वाचले पाहिजे. हे सगळे नेटाने पद्धतशीर पणे सुकन्याने केले. तेही घरकाम अन् छोट्या बाळाला सांभाळून! त्यावेळचे पोशाख, ती वातावरण निर्मिती, ती ऐतिहासिक पुराणी भाषा हे सांभाळत लेखन करायचे होते. वास्तवाला धक्का लागू न देता. अशा सूचना ए आय ला देणे, अन् हवे ते हवे तसे ए आय कडून करून घेणे हे फार मोठे आव्हान होते. ते शिव धनुष्य सुकन्याने लीलया पेलले असेच म्हणावे लागेल. कारण अथक एक हाती परिश्रमानंतर या जिद्दी तरुणीने शिव चरित्रावर आधारित पंचेचाळीस मिनिटाचा जगातील पहिला मराठी ए आय पट पूर्ण केला आहे. त्याचे टीझर देखील थक्क करणारे आहे.महिला दिनाच्या निमित्ताने या मुलीचे तिच्या जिद्दीचे, अथक परिश्रमाचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच !

आजच्या जेन झी ने यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे. आजकाल आपल्याकडील बहुतेक तरुण शाळा कॉलेजात जाण्याऐवजी हातात एखादा झेंडा, अन् गळ्यात कुणीतरी दिलेले उपरणे घालून कुणातरी फालतू नेत्याच्या मागे पुढे करण्यात धन्यता मानतात.आपला अमूल्य वेळ वाया घालवतात. त्यातून त्यांच्या हाती काहीच लागत नाही. त्यांचे काहीही भले होत नाही. यांना हाती धरून लोणी चाटणारे पुढारी काम झाले की यांना विचारीत देखील नाही. पण या मुलांना मृगजळामागे धावण्यात तेव्हढ्या पुरता आनंद मिळतो. पण आपले तारुण्य, आपले आयुष्य याच्या त्याच्या दावणीला लागून वाया चालले आहे हे मात्र कळत नाही. ही आजच्या पिढीची जेन झी ची शोकांतिका आहे.
खरे तर आज अवती भवती खूप संधी उपलब्ध आहेत. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आहेत. नवनवीन विषय आहेत. शिक्षणात लवचिकता आहे. हवे ते हवे तेव्हा हव्या त्या पद्धतीने शिकण्याची देखील सुविधा आहे.प्रवेश संख्या वाढली आहे. सरकारच्या सवलती आहेत. फक्त कष्ट करण्याची तयारी हवी.सुकन्या सारखी जिद्द हवी. एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्याचा पाठपुरावा करण्याचा ध्यास हवा. सृजनात्मक दृष्टीकोन हवा. मग तुम्हाला इंग्रजी येते की नाही, तुम्ही शहरातले की गावातले, तुम्ही गरीब की श्रीमंत हे काहीही आड येत नाही.इच्छाशक्ती असेल तर कुणीही काहीही साध्य करू शकतो हेच. कुंभेफळ संभाजी नगर या गावच्या सुकन्या ने हा महाराजांवरील ए आय निर्मित चित्रपट तयार करून सिद्ध केले आहे.
आपल्या दीड वर्षाच्या बाळासाठी म्हणून, घरकाम सांभाळून तिने केलेली ही अद्भुत चित्र निर्मिती म्हणूनच कौतुक पात्र ठरते. शाळा शाळातून हा चित्रपट पोहोचावा असा तिचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी, शिक्षण मंत्री, संस्थाचालक तिच्या या कार्याची दखल घेतील ही अपेक्षा आहे.मुख्य म्हणजे या कथेपासून प्रेरणा घेऊन एरवी रडगाणी गाणारी युवा पिढी काहीतरी सृजनात्मक निर्मिती करतील अशी आशा आहे.
सुकन्या निर्मित, हा “ए आय शिवचरित्रपट” आपण पुढील 👇लिंकवर क्लिक करून अवश्य पहा.
https://www.facebook.com/share/r/1AmLuvnYoN
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
