Saturday, October 18, 2025
Homeलेखसुख म्हणजे नक्की काय असतं ?

सुख म्हणजे नक्की काय असतं ?

सुखाची एक सर्वव्यापी व्याख्या करणे खरेच कठीण आहे, कारण सुख हे व्यक्तीची मनोवृत्ती आणि परिस्थिती यावर अवलंबून असते. ………..

लहान असताना प्रत्येक जण पुढील आयष्याचे स्वप्न पाहतात. बहुतेकांना काही तरी भव्य दिव्य हवे असते, उच्च शिक्षण, संपत्ती, परदेश प्रवास किंवा श्रीमंत नवरा देखील. त्या आयुष्य घडवण्याच्या जिद्दीत, ध्येय आणि महत्वाकांक्षा यांच्या ओढीत, यातून सुख किंवा आनंद मिळेल का असा विचारही मनात येत नाही. किंबहुना आपलं ध्येय साध्य झालं तर त्यामुळे सुख प्राप्त होईल याची तेव्हा खात्रीच असते.

वर्षचक्र फिरतात आणि तारुण्यातून प्रौढत्व येते तेव्हा बाकी काही नाही मिळाले तरी जगण्याची धडपड खूप काही अनुभव देऊन जाते आणि त्यातून मिळते एक प्रगल्भ शहाणपण. म्हणूनच कदाचित बालपणाच्या सुखाची खरी किंमत आपल्याला मोठे झाल्यावरच समजते.

सौख्याची ही मोठीच गंमत आहे की ते आहे हे कित्येकदा कळतच नाही. मला एक खूप पूर्वी वाचलेली गोष्ट आठवते. एका तरुण मुलीचे लग्न वन अधिकाऱ्याशी होऊन ती जंगलातील त्याच्या घरात राहायला जाते. नवरा हुशार, प्रेमळ, कमावता असतो पण गावापासून दूर या मुलीला त्या मोठ्या बंगल्यात चैन पडत नाही. एक दिवस संध्याकाळी दिवेलागणीला ती देवाला म्हणते, अरे परमेश्वरा माझ्याइतके दुःखी कुणी नसेल. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी दुपारी काम करताना तिचा नवरा साप चावून मरण पावतो. तेव्हा संध्याकाळी तीच मुलगी आकांत करत म्हणते की देवा, कालपर्यंत मी किती सुखी होते आणि आज हा दुःखाचा डोंगर माझ्यावर कसा
कोसळला ?

सुख आणि आनंद हे शब्द बहुतेकदा समानार्थी वापरले जातात. पण सुख म्हणजे फक्त आनंद नव्हे कारण हर्ष अनेक कारणांनी होतो आणि तेव्हढ्यापुरतं आपले मन उजळून टाकतो. परीक्षेत उत्तम यश मिळाले, काहीतरी बरे नाही अशी धाकधूक असतांना तपासणीत काही निघाले नाही, एखाद्या दुर्घटनेतून आपली माणसे सुखरूप घरी आली अशा अगदी महत्त्वाच्या घटनांपासून ते गाडी लावायला मॉलच्या दाराजवळ जागा सापडली किंवा कुणी आज छान दिसतेस म्हटले अशा साध्या गोष्टींनी आपण आनंदित होतो. सौख्य मिळायला व जाणवायला काही अवसर जावा लागतो. प्रासंगिक आनंदाशी तुलना करता सुखाची भावना ही स्थिरस्वरूपी असते. जीवनात अनेक प्रकारचे आनंद असलेली माणसे नेहेमीच सुखी असतात असे नाही.

याउलट अगदी साधेपणाने जगताना सुख अनुभवता येते. तीनचार वर्षांपूर्वी यूरोपमधील एका संस्थेने जगात कुठल्या देशात बायका किती सुखी आहेत याचा आढावा घ्यायचा ठरवले आणि त्याकरता कित्येक देशातील वेगवेगळ्या समाजात जाऊन तेथील स्त्रियांना प्रश्न विचारले. त्यांना एक ते दहाच्या मोजपट्टीवर आपण दहा म्हणजे संपूर्ण सुखी आहोत असे उत्तर देणारी बाई भारतातील कामगार वस्तीत सापडली. या परदेशी समितीला प्रथम वाटले की तिला प्रश्न कळला नसेल. पण त्या बाईचे स्पष्टीकरण ऐकून सगळे चकित झाले. ती म्हणाली माझा नवरा इमानी आणि कष्टाळू आहे, मुलगा आज्ञाधारक व अभ्यासू आहे. आमच्या गरजेपुरते आम्हाला मेहेनतीने खाता येतेय, याहून जास्त सुख काय असते ?

मॅनहॅटन किंवा लंडनच्या कितीतरी पट श्रीमंत अथवा उच्च पदावर काम करणाऱ्या बायका खात्रीने अशी पूर्ण सुखाची ग्वाही देऊ शकल्या नाहीत. हा कुणाला कदाचित त्या गरीब बाईचा भोळेपणा वाटेल किंवा ती अल्पसंतुष्ट आहे असे म्हणतील पण यातून एक गोष्ट मान्य करावी लागते की प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असू शकते.

सुखाची एक सर्वव्यापी व्याख्या करणे खरेच कठीण आहे कारण सुख हे व्यक्तीची मनोवृत्ती आणि परिस्थिती यावर अवलंबून असते. इतकेच नाही तर जसे आपले वय आणि स्वभाव बदलत जातात त्यानुसार आपली सुखाची परिमाणे देखील बदलतात. फक्त थाट, मौजमजा, पार्ट्या यात थ्रिल व तात्पुरता आनंद वाटतो पण दोन घास तरी खा असे प्रेमाने सांगणारे कोणी नसेल तर बाकी कितीही मुबलकता असली तरी सुख मिळत नाही.

सुख मोजता येत नाही किंवा विकत घेता येत नाही पण जवळच्या माणसांना आपल्या कृतीतून आपण सुख नक्की देऊ शकतो. मी शाळेत असताना पुण्याला माझ्या मावस बहिणीच्या घरी जायचे. तिची पेठेतील जुनी छोटी जागा होती आणि त्यातली रस्त्याला लागून असलेली खोली पाहुण्यांची उठबस करायला वापरली जायची. माझ्या ताईच्या सासूबाई पक्षघात झाल्यामुळे चालू शकत नव्हत्या. भल्या सकाळी ताई त्यांना अंघोळ घालून वेणीफणी करून त्या खोलीतील पलंगावर बसवायची. मग आल्यागेल्याशी गप्पा मारत, नातवंडांवर नजर ठेवत त्यांचा दिवस छान जायचा. मला निघताना ताई नेहेमी सासूबाईंना नमस्कार कर अशी आठवण द्यायची आणि तेव्हा तिने सरकवलेले पाच रुपये मला देताना त्यांचा मोठं कुंकू लावलेला गोरा चेहेरा प्रसन्न हास्याने फुलून यायचा. नंतरच्या चाळीस वर्षात मी कितीतरी कर्तबगार, धनवान आणि यशस्वी स्त्रिया पाहिल्यात पण असे निर्भेळ सुख त्यांच्या मुखावर कधीच दिसले नाही. आपल्या पांगळ्या सासूचा मान राखून त्या दोन खोल्यात माझ्या ताईने तिला जे सुख दिले ते महालात राहणाऱ्यांना देखील मिळणे कठीण असते.

अखेरीस सुख ही एक अत्यंत आल्हादकारक भावना आहे आणि ती अन्न, वस्त्र, निवारा अशा भौतिक विषयांशी काही प्रमाणात निगडित असली तरी तिचा खरा उगम आपल्या मनातच असतो. एका संशोधकाच्या वृत्तीप्रमाणे मी सुखाचे समीकरण मांडले तर असे म्हणेन की आयुष्यातील आनंदादायक गोष्टींमध्ये समाधानाची भर घालून त्यातून अनावश्यक ईर्षा आणि अस्थायी अपेक्षा वजा केल्यावर जी गोळाबेरीज होईल ती म्हणजे सुख. याचा अर्थ सुखी होण्यासाठी आहे त्यात कायम संतुष्ट राहा किंवा महत्वाकांक्षा ठेऊ नका असा अजिबात नाही. अशी मनाला मोड घालून सुखी होणे शक्यही नाही कारण आपण काही साध्य न केल्याची उणीव सतत मनाला सलत राहील.

स्वतःच्या स्वभावाशी सुसंगत वागता येणे, लायकीप्रमाणे शिक्षण घेऊन उत्तम काम करता येणे आणि त्यातून इतरांना मदत करणे यातून आपल्या गुणांचे चीज केल्याची तृप्तता लाभणे ही जीवनात आवश्यक आहे. परंतु आपल्या क्षमतेच्या मर्यादा ओळखणे आणि आलेल्या बऱ्या-वाईट प्रसंगांचा निराश किंवा कडवट न होता स्वीकार करणे हे मात्र पुष्कळ लोकांना खूप काही शिकून आणि मिळून देखील जमत नाही. त्यामुळे सगळ्या गरजा भरपूर पूर्ण झाल्या किंवा देवाने दिलेली सगळी ऐहिक सुखे असली तरी त्यांच्या जीवनात खरे सुख नसते. तेव्हा जुनी माणसे म्हणतात ते पटते की सुख हे मानण्यावर असते पण काही जण स्वतः सुखी होत नाहीत आणि दुसऱ्याला सुख लाभू देत नाहीत.

सगळ्यांच्या आयुष्यात कितीतरी छोट्या-मोठ्या आनंददायक गोष्टी असतात. हा हर्षाचा झरा मनात पुढे वाहताना त्याला तृप्ती, कृतज्ञता, सार्थकता असे प्रवाह येऊन मिळाले, तर तो ओलावा नकळत आपल्या रोजच्या जीवनात पाझरतो आणि ओठावर हसू, जिभेवर गाणे आणि हृदयात जगण्याची प्रेरणा फुलवतो. मग तक्रार, कटकट, निराशा अशा भावना मागे पडून प्रत्येक नवीन दिवसाचे उल्हासाने स्वागत करायला अंतःकरणात उमटते एक प्रसन्न अनुभूती. मला वाटते तेच खरे सुख असावे.

डॉ सुलोचना गवांदे

– लेखिका : डॉ सुलोचना गवांदे, न्यू जर्सी, अमेरिका
– संपादक : देवेंद्र भुजबळ, +91 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. अप्रतिम लेख आहे. सुख आणि आनंद यातला नेमका फरक, त्याचं क्षणिक/चिरंतन असणं ह्याचं विश्लेषण अतिशय सुंदर आहे. खरंच, किमान अपेक्षा असलेली माणसे आतून समाधानी असतात आणि इतकेच नव्हे तर त्या कामगार वस्तीतील स्त्री चे उत्तर डोळ्यांत अंजन घालणारे आहे. प्रतिष्ठेच्या, सुखाच्या आपल्या व्याख्या पुन्हा तपासायला लावणारे आहे.
    इतक्या सुंदर लेखाबद्दल मनापासून आभार 🙏🏻

  2. लेख वाचून खूप प्रसन्न वाटलं. सुख हे प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. खुप खुप धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप