मुलांचं मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे होय. तसेच कुटुंबातील व इतर लोकांशी चांगले नाते असणे असा याचा अर्थ आहे.
मानसिक आरोग्य चांगल आहे असं आपण केव्हा म्हणतो ?
१. जेव्हा त्या माणसाचं मन शांत असते
२. इतरांबरोबर जुळवून घेता येते.
३. कोणी नावं ठेवली, उणीदुणी काढली किंवा मुलांच्या भाषेत चिडवल तरी दुखावले न जाणे.
४. आपल्या प्रश्नांची आपणच उत्तरे शोधणे.
५. मनावर ताबा असणे.
६. जीवनातले ताण- तणाव, काळजी सहन करण्याची क्षमता असणे.
मानसिक आरोग्य चांगले राहण्याकरिता पुढील गोष्टी आवश्यक असतात.
१. योग्य, पुरेसा, आणि वेळेवर समतोल आहार घेणे.
२. वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखणे.
३. चांगल्या सवयी लावून घेणे उदा. लवकर उठणे, जागच्या जागी वस्तू ठेवणे.
४. नियमित व्यायाम करणे.
५. ताण- तणाव व काळजी कमी करणे.
प्रसन्न मनात प्रसन्न विचार येतात. समर्थ रामदास म्हणतात, “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण” प्रसन्न मनात चांगले विचार येतात.
सन १९०८ मध्ये, कौ बियर्स या संशोधकाने अमेरिकेत मानसिक आरोग्याचा सिद्धांत मांडला. त्यानंतर १९४७ मध्ये आपल्या भारतात ए.बी. शाह यांनी मानसिक आरोग्यावर संशोधन केल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानसिक आरोग्य म्हणजे मनाची सुदृढता. म्हणजेच शारीरिक, मानसिक व सामाजिक संपूर्ण आरोग्यासाठी स्वत:चा विकास करून समाजासाठी योगदान देणे होय.
आता सध्याची कोरोना महामारीची नकारात्मक परिस्थिती आहे. त्यावर मात करण्यासाठी सकारात्मकता हि काळाची गरज आहे. मग त्यासाठी विद्यार्थी, मुलेच नाही सर्वांनाच या मानसिक आरोग्याची गरज आहे. पण विद्यार्थी हे कमी वयाचे, संवेदनशील असतात. त्यांच्या मनावर कोणत्याही चांगल्या वाईट गोष्टींचा लगेच परिणाम दिसून येतात आणि त्याचे पडसाद संपूर्ण कुटुंबांवर उमटतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यक्त झालं पाहिजे. आई, वडील, भावंडं यांच्याशी बोलल पाहिजे. संवाद साधला पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. टीव्ही, मोबाईलवरचे निवडक कार्यक्रम पाहता येतील. यू ट्यूब वर लहान मुलांसाठी स्पेशल कार्यक्रम असतात त्याचा वापर अर्धा एक तास करावा.
ऑनलाइन अभ्यासालाही मुलं कंटाळली आहेत
संगीत, कला, क्रीडा, साहित्य या माध्यमातून त्यांना आनंददायी शिक्षण देऊन संस्कारित करण्याचा प्रयत्न करता येईल. हे लगेच होणार नाही त्यासाठी पालकांना त्यात सहभागी व्हावं लागेल.
मुलांचं वय, क्षमता, कल लक्षात घेऊन पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वप्रथम या मुलांशी म्हणजे जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांची आवड लक्षात घेतली पाहिजे.
घरातच वर्षभर राहून टीव्ही पाहून व्हिडिओ गेम खेळून मुलांना कंटाळा आलेला आहे. शाळेत शिक्षकांचा धाक व आदरयुक्त भीती मुलांना वाटते. तेवढा आदर मुलं आईवडिलांचा करतीलच असं नाही. म्हणून सर्वप्रथम पालकांनी घरात खेळीमेळीचं आनंददायी वातावरण तयार करून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना गुंतवून ठेवलं पाहिजे. त्यांची आकलनशक्ती, भावनिक क्षमता हे तणाव विरहित झाले पाहिजे. घरच्या कौटुंबिक, मानसिक, भावनिक सर्व वातावरणाचा परिणाम या शाळकरी मुलांवर पडतो. आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत ते वय वर्ष ६ ते १८ पर्यंतचे आहेत.
समाजात निर्भयपणे वावरण्यासाठी मुलांना मानसिक स्वास्थच मदत करते. आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे भावी नागरिक आहेत. त्यांचं मानसिक आरोग्य जपलं तर ते भविष्यात आपल्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून मुलांच्या मानसिक आरोग्याला खूप महत्व दिलं जाते.
या विषयावर जास्त प्रमाणात संशोधन झालेलं नाही. अजून त्याचा अभ्यास व संशोधन सुरू आहे.
या कोरोनाच्या काळात घरात राहून पालकांच्याही कौटुंबिक समस्या वाढल्या आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींना पगार नाही. त्यामुळे काही ठिकाणी तळागाळातले पालक व्यसनी तणावात असतात. त्याचा परिणाम मुलांवर होतो. व कळतनकळत मानसिक आरोग्य बिघडण्याचा संभव असतो.
शाळेत असताना मुलांना खाजगी शाळेत व सरकारी शाळेत भारत सरकारच्या मिड डे मिल
‘अक्षयपात्र भोजन’ मिळते. गरम जेवण स्विट डिश, कधी लाडू, बिस्किट असं पौष्टिक आहार मिळत असे. त्यामुळे गरीब पालकांचा एक वेळचा प्रश्न सुटत होता. शाळेत असताना आनंददायी शिक्षण, स्वयंसेवी संस्थांचे मार्गदर्शन, मोबाईल टीचर, स्पेशल मुलांसाठी, टिचिंग एड शैक्षणिक साधन, खेळ, यामुळे मुलं शिक्षकांच्या सहवासात खूष होतील.
शारीरिक आरोग्य + मानसिक आरोग्य = संपूर्ण आरोग्य
‘विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य’ हा माझ्या अभ्यासाचा व संशोधनाचा विषय आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील हजारो विद्यर्थ्यांचं निरीक्षण मी केलेलं आहे. शिक्षिका म्हणून ३६ वर्ष व मुख्य म्हणून २ वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन मुलांच्या मानसिक आरोग्यकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे प्रकर्षानं जाणवलं. अनेक संदर्भ ग्रंथ हाताळून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची व शिक्षकांची निरीक्षण नोंदवून घेतली. तेव्हा अनेक गोष्टी पुढे आल्या.
– २००२ मध्ये पोष्टमन अँण्ड जेलिन या शास्त्रज्ञांने मानसिक विकृती जर लहान मुलांमध्ये असेल तर सामाजिक अप्रतिष्ठेचं मानल जाते.
– सगळ्यांसाठी उत्तम भविष्य आणि शिक्षणात मानसिक आरोग्याला प्रोत्साहन दिलं ते २००२ मध्ये डॉ. अलेक्झांडर यांनी.
– डॉ. खत्री यांनी मेंटल हेल्थ मानसिक आरोग्याची समस्या वाढत्या वयात वाढत जाते हे संशोधन खत्री यांनी २०१० मध्ये केलं.
– म्हणजेच प्रत्येक माणसाचं मानसिक आरोग्य हे महत्वाचे असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे पालक, शिक्षक, समाज, प्रसार माध्यम व शासन या सर्व घटकांनी लक्ष दिले पाहिजे.
प्रत्येक मूल समान असते. प्रत्येक बालक विशाल समाजाचाही एक घटक आहे. प्रत्येक पौढ व्यक्ती समाजातल्या प्रत्येक बालकाचा पालकच आहे. मुलांनी वेळेवर अभ्यास केला. एखादे चांगले काम केले तर त्याची दखल घेऊन शाबासकी दिली पाहिजे. मुलांना घरात व शाळेतही छोट्या मोठ्या कामात सहभागी करून घेतले पाहिजे. मुलं अनुकरण प्रिय असतात. त्यांना काम करायला आवडतात. त्यामुळे मुलांच्या सामर्थ्याची / सुप्त गुणांची आणि कमजोरीची नोंद घेतली तर त्यांच्या विकासात मदत करता येईल.
शाळेत परिपाठच्या वेळेला नेतृत्व करणे, रांगा लावणे, वर्गमंत्री, अभ्यासमंत्री, शिस्तमंत्री अशी कामे देऊन त्यांचे नेतृत्वगुण दिसून येतात. घरी असताना निरोप पोहचवणे, पाणी नेऊन देणे, बाबांना चहा देणे, केर काढणे, कपड्यांच्या घड्या करणे अशा कामापासून सुरुवात करून अत्यंत कुशल कामाचा टप्पा क्रमाक्रमाने गाठता येतो यामुळे बालकांचे समाजीकरण होते. आधी कुटुंब / शाळा आणि समाज या तीन स्तरावर संधी दिली तर मुलं मिळून मिसळून वागतात. ज्ञान कृती आणि भावना यांचा योग्य वेळी मेळ घालता येतो. त्यामुळे मुलांना ताण येत नाही. अर्थात त्यांच्या मानसिक विकासाला चालना मिळते व सुरक्षित वाटते.
मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्याच्याशी पालकांना सुसंवाद साधता आला पाहिजे. आजची मुलं स्वावलंबी व स्वतंत्र राहू इच्छितात. त्यासाठी पालकांचा जबाबदारी वाढली आहे.
आपल्या बोलण्यातून, वागण्यातून मुलांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार होत असतात. त्यांच्या विकासासाठी, भल्यासाठी जास्तीत जास्त चांगले करण्याची सगळ्याच पालकांची इच्छा असते. पण मुलं आणि पालक यांच्यात मन: संवाद घडत नाही, उलट कधी कधी सवांद युद्ध धुमसत असतात. म्हणून मुलांची मानसिकता हळुवार पणे जाणून घेणे गरजेचे आहे.
पालक हे अप्रशिक्षित शिक्षक असतात व शिक्षक प्रशिक्षित पालक असतात. दोघींनीही सुसंवाद व निरिक्षणातून त्यांचं गुण त्यांची बलस्थान व उणेपणा जाणून घेऊन मन;स्वास्थ्य जपलं पाहिजे. या कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात सर्वच मुलं पास होऊन पुढच्या इयत्तेत गेली आहेत. पुढच्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुट्टी मध्ये दररोज १ तास वाचन, लेखन, करावे. शिक्षकांनी जे व्हिडिओ तयार केलेत त्या आधारे रिव्हिजन करावी. आवडत्या छंदात मुलांनी स्वतःला गुंतवून ठेवल पाहिजे.
थोड्यावेळ टिव्ही पहावा. गेम खेळावेत घरातल्या घरात भावंडं व पालक यांच्याशी सामान्य प्रश्न मंजुषा गाण्याच्या भेंड्या खेळातून पाढे असे उपक्रम वजा खेळ खेळले तर अभ्यासाची उजळणी होईल. काहीच वाईट नसते. फक्त जे काही वापरणार त्यावर मर्यादा हवी.
मुलांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुसंवाद, मनमोकळी चर्चा महत्वाची.कुटुंबतील व्यक्तीमधील प्रेम असलं पाहिजे. प्रभावी पालकत्व ही आज काळाची गरज आहे. आज नात्यातले संबंध दुरावत चालले आहेत. पण मुले आणि पालक यांच्या संबंधात दुरावा कोणालाच परवडण्या सारखा नाही.
मुले आणि पालक यांचा होणारा संवाद सुखकारक होण्यासाठी डॉ. थॉमस यांनी सांगितलेले १२ अडथळे समजून घेतले तर वाढत्या वयाच्या मुलांचा मानसिक विकास चांगल्या प्रकारे होईल.
१. आज्ञा देणे
२. कानउघाडणी करणे
३. उपदेश देणे
४. सूचना देणे
५. भाषणबाजी करणे
६. टीका करणे
७. अतिस्तुती
८. नावे ठेवणे
९. निदान करणे
१०. खात्री करणे
११. छडा लावणे (उलटतपासणी)
१२. टाळाटाळ करणे
अशा प्रकारच्या कृती मुलांचा मानसिक ताण वाढवतात. म्हणून त्याच्या कलाने घेऊन प्रेमाने विश्वासाने सुसंवाद साधला पाहिजे.
मुलांवर संस्कार घडवण्यासाठी ती आदर्श कृती प्रथम पालक म्हणजे आई वडील यांनी करावी. समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, “सोसता सोसेना संसाराचा ताप, नेणे मायबाप होऊ नये”. संसार हा ताप वाटत असेल अशा पालकांनी मायबाप होऊ नये.
मुलांनी मनाचे श्लोक म्हणावे असे वाटत असेल तर घरातल्या मोठ्या माणसांनी ते आधी म्हणावे. दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अंखडित वाचित जावे. वाचन पालकांनी केलं तर मुलांनाही आवडल वाचन हा एक संस्कारच आहे.
त्यांना चित्रांची, रामायण, महाभारत, पचतंत्र, शौर्य कथा, रहस्यकथा अशी पुस्तकं आणून समोर ठेवावी. शांत राहून त्यांच्या कलाने घ्यावे. आईवडिलांनी मुलांना ऑनलाईन अभ्यासात मदत करावी. त्याच्या बरोबर जेवाव. या कोरोना काळात आपल्याला मुलांबरोबर घरात राहायला मिळते. सहवासाने प्रेम वाढते. विश्वास मुलांच्या मनात दृढ झाला पाहिजे.
पालकांचं वागणं मुलांसमोर आदर्श असल पाहिजे. वाचनाचे अनेक फायदे आहेत.
“करि मनोरंजन मुलांचे
जडेल नाते प्रभुशी तयांचे”
असे साने गुरूजी म्हणतात.
पालकांसाठीही अनेक प्रभावी पालकत्वावर पुस्तक आहेत कार्यशाळा, मानसशास्त्रज्ञ बालरोगतज्ज्ञ, शिक्षक, खूप साऱ्या वेबसाईटवर, नेटवर उपलब्ध आहेत त्याचा वापर पालकांनी केला तर त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल आणि मुलं आणि पालक यांचे स्नेहसंबध निकोप बनतील. अर्थातच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगलं राहील.

– लेखन : डाॕ. अंजुषा पाटील
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल डॉ अंजुषा पाटील यांनी सोप्या भाषेत आणि चांगला सल्ला दिला आहे.