महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार ह्यांचे २८ तारखेला बारामती येथे विमान उतरत असताना झालेल्या अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. दादांच्या पार्थिवावर बारामती येथेच दुसर्या दिवशी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन दिवस शासकीय दुखवता पाळण्यात आला.
त्यानंतर कै.अजितदादा ह्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्यांनी उपमुख्यमंत्री व्हावे ह्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची विधिमंडळाच्या नेतेपदी एकमताने निवड केली. त्यानंतर मुंबईतील राजभवनात झालेल्या धीर गंभीर वातावरणात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेकडे एकल विधवा महिलांची संस्था आणि संघटना चालवत असणारा कार्यकर्ता म्हणुन मी या सर्व बाबींकडे कशा पद्धतीने बघतो याचा उहापोह या लेखात करीत आहे.
एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यावर त्या कुटुंबावर आणि महिलेवर मोठा आघात होतो. झालेल्या घटनेतून तिला बाहेर येण्यासाठी काही काळ जावा लागतो. तो कदाचित महिनाभराचा असतो किंवा कधी कधी तो काही वर्षांचा असतो. जर एखाद्या तरुण महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असेल तर तो काही वर्षांचा सुद्धा असू शकतो. यातून त्या एकल विधवा महिलेला बाहेर काढताना कुटुंबांची झालेली परिस्थिती आपण दररोज डोळ्यांनी पाहत असतो.
मागील काही दिवसांपासून आपण सुनेत्राताईंची अवस्था पहात आहोत. दादांच्या निधनानंतर इतक्या मोठमोठ्या व्यक्ती येत राहिल्या की साधं त्या मोकळेपणाने रडू सुद्धा शकत नव्हत्या. सर्व काही धीराने घेत होत्या, ही खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आणि त्यांच्याबद्दल अपार आदर वाढविणारी बाब आहे.

गेल्या सहासात वर्षापासून एकल विधवा महिलांसाठी काम करत असताना मी असे पाहतो की, कोरोनामुळे अनेक महिलांनी त्यांच्या पतीला अकाली गमावले आहे. काही महिला ह्या २२/ २३ व्या वर्षात विधवा झाल्या आहेत, काही बालकांनी त्यांचे वडील सुद्धा पाहिले नाही, तर अनेक महिला ह्या ४५ वर्षाच्या आत विधवा झाल्या आहेत. सामाजिक संस्था म्हणून काम करत असताना संस्थेच्या सोबत जवळपास ९० टक्के महिला ह्या ४५ वर्षाच्या आतील आहेत. त्यांना धीर देताना, त्यांना मदत करताना आणि त्यांना पुन्हा स्थिर स्थावर करताना मोठी कसरत होते.
त्यांच्यासाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरताना तलाठी, रहिवासी दाखला देत असताना ग्राम पंचायत अधिकारी ह्यांनी केलेली अडवणूक किंवा त्यांच्या मुलांसाठी मिळत असलेल्या बालसंगोपन योजनेचे अर्ज भरताना किंवा अर्ज भरल्यानंतर सुद्धा एकेक वर्ष मिळत नसलेले अनुदान किंवा त्या ह्या बद्दल चौकशी करण्यासाठी कार्यालयात गेल्यावर मिळालेली वाईट वागणूक पाहिली आहे. विधवा महिलांना अंतोदय योजनेचे रेशनकार्ड मिळावे असे शासन आदेश आहे, परंतु अंतोदय योजनेचे सोडून द्या, त्यांना साधे केशरी रंगाचे प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी रेशनकार्ड सुद्धा मिळालेले नाही.
हे सर्व सांगण्याच्या मागे हा हेतू हाच आहे कि, सुनेत्राताईनी दोनच दिवसांत घेतलेला निर्णय ! त्यांचे चुलत सासरे मान. शरद पवार हे राजकारणातील प्रमुख व्यक्ती. जसं आपले कुटुंब असते तसे ते वडीलधारी व्यक्ती. सुनेत्राताई ह्या तशा बारामती सोडून मागील वर्षभरापासूनच खासदार झाल्याने लोकांच्या संपर्कात आलेल्या. तसं पाहता इतर भागातील लोकांशी त्यांचा संपर्क कमीच ! आपण जसे आपले कुटुंबातील महिलांना पाहतो तसेच. तरीसुद्धा त्या सर्व बंधने झुगारून, कुटुंबातील सदस्य काय बोलतील ? समाज काय म्हणेल?ह्याचा विचार न करता घरातून बाहेर पडल्या आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली. त्यांनी केलेल्या या कृतीचे अनेक अर्थ निघू शकतात. कदाचित त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय असू शकतो, परंतु त्यांनी केलेली ही कृती राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक एकल विधवा महिलेला ताकद देणारी आहे. त्यांची ही धाडसी कृती समोर आलेल्या संकटांना गोंजारण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग दाखवत आहे. राख सावरली, आता कामाला लागा हा जणू संदेशच त्यांनी सर्वाना दिला.

आता महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करत असताना त्या कोणत्या पद्धतीने काम करणार आहेत, ह्या कडे साहजिकच सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु विधवा एकल महिलांना त्या मार्गदर्शक म्हणून कायम असतील. त्यांनी कोणते काम केले पाहिजे किंवा कसे काम केले पाहिजे हे आम्ही सांगत नाही, पण फक्त विधवा महिलांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील जनतेला त्यांनी एक दिशा देताना एक योजना जरूर तयार करावी किंवा तसा एक निर्णय घेतला तर विधवा एकल महिलांना त्याचा फायदा होऊ शकेल.
संजय गांधी निराधार योजना :
ज्या विधवा महिलांचे वय १८ ते ५० दरम्यान आहे त्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा पहिल्या वर्षाचा लाभ सरसकट सुरु करून ज्या दिवशी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मृत्यू दाखला घेण्यासाठी येतील त्या दिवशी एकत्रित वर्षभराचा अनुदानाचा चेक स्थानिक स्वराज्य संस्था / राज्य शासनाने द्यावा.
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रुपये १५००/- वरून किमान रुपये ३०००/- करावे तसेच उत्पन्नाची असलेली २१ हजाराची अट काढून ती अट इतर योजनेच्या प्रमाणे २.५ लाख इतकी करावी. संजय गांधी निराधार योजना ही एकल महिलांसाठी प्रमुख योजना आहे, तिचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे.
सामाजिक सुरक्षा जबाबदारी :
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना जी वय वर्षे १८ ते ५० वयोगटातील व्यक्तींसाठी असलेली एक सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी विमा योजनेचे वार्षिक हप्ता रुपये ४३६/- ही योजना प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे यासाठी लक्ष दिले पाहिजे. या योजनेमधून १८ ते ५५ वयोगटातील व्यक्तीचा कशाही पद्धतीने मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला २ लाख रुपये मिळतात, त्यामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीला धार मिळण्यास मदत होईल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये १८ ते ७० वयोगटातील व्यक्तीसाठी वार्षिक रुपये २०/- इतका हप्ता असून १८ ते ७१ वर्षाच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये व अपघातामध्ये दिव्यांगत्व आल्यास १ लाख रुपये इतकी मदत मिळू शकेल.
राज्यातील प्रत्येक व्यक्तीने प्रधानमंत्री जनधन खाते उघडण्यास प्रोत्साहन देण्यात यावे. यामध्ये वय वर्षे १८ ते ५९ ह्या वयोगटातील व्यक्तीचा कशाही पद्धतीने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील वारसास रुपये ३०,००० इतके विमा रक्कम व रूपे कार्ड अपघाती विम्याच्या माध्यमातून किमान १ लाख रुपये ते जास्तीत जास्त २ लाख रुपये अपघाती निधनाच्या माध्यमातून मिळू शकतील ह्यातून त्या कुटुंबाला सावरण्यास मदत होईल.
नवनिर्माण सावित्री फुले फौंडेशन (ग्रामस्नेहालय) संस्थेने एखाद्या कुटुंबात अशी घटना घडल्यास त्या कुटुंबांचे सांत्वन करत असताना नुसते भेटणे किंवा शाब्दिक सांत्वन करत नाही तर, कृतीशील सहवेदना सांत्वन पत्राची संकल्पना समोर आणली आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर संस्थेचे कार्यकर्ते कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करताना हे पत्र देतात, या पत्रात व्यक्तीचे निधन झाल्यावर जवळपास ३५ शासकीय, खाजगी योजनांची माहिती दिली आहे. त्याच सोबत त्या कुटुंबाला कोणते कागदपत्रे मिळाले पाहिजे ह्याची माहिती देण्यात आलेली आहे. यातून त्या कुटुंबाला सावरण्याच्या कृतीशील कार्यक्रम देण्यात आला आहे.
सुनेत्राताई तुम्ही दोनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे राज्यातील एकल विधवा महिलांच्या आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यामुळे आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : चेतन वाघ. सहसंस्थापक, ग्रामस्नेहालय
(लेखक हे सामाजिक सुरक्षा योजना तज्ञ असून एकल विधवा महिलांच्या अधिकार व हक्कांसाठी काम करीत असतात.)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
