सर्व घरादाराकडे बघणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची मात्र नेहमीच हेळसांड करीत असतात. अंथरुणाला खिळण्याची वेळ आल्यावरच त्यांना डॉक्टर आठवतो. अशाने कधी कधी खूप उशीर होऊ शकतो. असं होऊ नये म्हणून स्त्रियांच्या आरोग्याचं महत्त्व पटवून देत आहेत, डॉ प्रशंसा राउत दळवी.
डॉ प्रशंसा यांनी प्रवरा मेडिकल कॉलेज मधून एम बी बी एस पदवी प्राप्त केली असून त्याच कॉलेजमधून त्यांनी प्रथम क्रमांकाने प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र (डी जि ओ) हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. केरळ मधील लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून डि एन बी, तर जर्मनीतील किल येथून वंध्यत्व निवारणाची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांना मुंबईतील नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कामाचा अनुभव असून त्या सध्या कुपर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
“जिवासवे जन्मे मृत्यू” हे तर खरेच ! पण एकदा एक स्ञी रुग्ण मला म्हणाली, “डॉ., मला नेहमी असे वाटायचं की, ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला नाही तर इतर बायकांनाच होईल. “कॅन्सर आपल्याला होणारच नाही” ही त्या स्ञीची समजूत माझ्या मनाला खूपच लागली. अर्थात असा विचार कित्येक स्ञीयांच्या मनात येतो.
आज ही, सन 2021 चालू असताना बायका डॉक्टरकडे लेट स्टेज मध्ये येतात. का ? कारण आपल्याकडील स्ञीयांना मुलांची, नवऱ्याची, घरची, ऑफीसची काळजी करता करता स्वतःकडे लक्ष द्यायचं ध्यानातच राहत नाही. आज क्लिनिक मध्ये येणाऱ्या ९०% स्ञीया म्हणतात- “आम्हाला वेळच मिळत नाही स्वतःकडे लक्ष द्यायला ”. शुद्ध मुर्खपणा आहे हा ! ही मानसिकता आधी स्ञीयांनी स्वतःच बदलायला हवी. आज आपला विषय आहे स्तनाचा कर्करोग !
भारतात सर्वात जास्त प्रमाणात स्तनाचा कर्करोग आढळतो. एक खूपच धक्कादायक खुलासा मी इथे करणार आहे.तो म्हणजे एके काळी स्तन कर्करोग पन्नाशी वरच्या महिलांमध्ये सहसा बघायला मिळायचा. पण आज 48% महिला पन्नाशीच्या आत आहेत ज्यांना स्तनाचा कर्करोग आढळला आहे, म्हणजे 25 ते 40 वयोगटाच्या महिलांमध्ये हा आजार दिसू लागला आहे. नाही मला कोणत्याही प्रकारे भीती निर्माण करायची नाही, पण आपल्याला जागरूकतेचे महत्त्व समजायला हवेच ना ?
भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आजार का आहे ? सर्वात पहिले कारण म्हणजे महिला खूप उशिरा उपचारासाठी येतात , हिला “लेट स्टेज” म्हणता येईल. दुसरं कारण तर आपले खास भारतीय कारण- लाज वाटणे. तिसरे कारण म्हणजे जाणीव. प्रत्येक घरा- घरात बायका, पुरुष, लहान मूल सर्वांना ही जागरूकता असली पाहिजे. आणि तीही खूपच पायाभूत अणि तीच मी आज इकडे मांडणार आहे.
सर्वात त महात्वाचं म्हणजे स्वयं स्तन परीक्षा करणे. (Self breast Examination)
आरशा समोर चाचणी – स्तनाचा आकार, कलर चेक करायला हवा.
अंघोळ करताना (उभ्याने) एक हात डोक्यामागे ठेवा आणि दुसऱ्या हाताने हळू- हळू स्तनाच्या बाहेरील बाजूने, आतल्या दिशेने बोटे फिरवा.
“झोपून” : खांद्याखाली उशी ठेवा, एक हात वर करा आणि दुसऱ्या हाताने चाचणी करा- या स्वयंचाचणीमध्ये काही गाठ, जाडसर पणा किंवा काही बदल जाणवतो का ? (फोटो 1, 2) हे स्वतःच लक्षात घ्यायला हवे.
ही चाचणी केव्हा करावी ?
पाळी आल्यावर 3 ते 5 दिवसांनंतर. रजोनिवृत्ती असल्यास- महीन्यातील एक दिवस निवडा आणि प्रत्येक महिन्यात चाचणी करा.
कर्क रोगाची लक्षणे :
1. स्तनाचा आकर बदलणे
2. स्तनात गाठ / जाडसरपणा आढळणे
3. काखेत गाठ लागणे
4. स्तनाग्र (निप्पल) मध्ये बदल जाणवणे
5. निप्पल मधून पाणी / स्त्राव निघणे
6. चट्टे किंवा लालसर त्वचा होणे
7. स्तनावरच्या त्वचेचे texture बदलणे
8. स्तन सतत दुखणे
स्तनामध्ये गाठ आढळली म्हणजे मला कर्करोगच आहे असेही मुळीच नाही. पण अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे आहे.
बरं Take Home Message: मग प्रश्न पडतो, स्तनाच्या कर्करोगाचा धोका मी कमी करु शकते का ?
निश्चितच !
1. निरोगी वजन आणि नियमित व्यायाम
2. आहार
3. मद्यपान बंद/ कमी करणे
4. कोणत्याही हार्मोनल टॅब्लेट्स घेताना डॉक्टरांच्या सल्लाने घ्या.
5. आपल्य नवजात बालकाला कमीत कमी 1 वर्ष स्तनपान द्या.
6. नियमित चाचणी करा.
7. काही आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आज मेडिकल सायन्समध्ये या सर्व गोष्टींवर उपचार आहेत, रूग्ण पूर्णपणे यातून बाहेरही पडू शकतो पण म्हणूनच प्राथमिकता महत्त्वाची ! उशीर झाल्यानंतर ट्रीटमेंट तर उपलब्ध असते पण ञास होण्याचा संभव असतो. इथे फक्त मग आरोग्याचा प्रश्न राहत नाही तर जिविताचा तो प्रश्न बनतो. म्हणून प्रत्येक स्ञीने स्वयंचाचणी करत राहायला हवी, आणि या दुर्धर आजारापासून दूर राहायला हवे ! तरच आपण भारतातील हे कर्करोगाचे प्रमाण निश्चितच कमी करू शकू आणि त्यावर मातही !!

– लेखन : डाॕ. प्रशंसा राऊत- दळवी, स्ञीरोगतज्ञ
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
अत्यावश्यक माहीती खासकरून स्त्रियां साठी, तुमच्या लेखातून वाचायला मिळाली. कदाचित स्त्रियां वरील दडपण दूर होईल, रोग तीव्रता वाढण्याअगोदर तुम्हा सारख्या डॉक्टरांना भेटतील. धन्यवाद!