“होळी स्पेशल पुरणपोळी”
आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण, उत्सव यावेळी घरोघरी खास पदार्थ बनवले जातात. होळीच्या सणाला सुद्धा हॉलिका मातेला खास गोड पुरणपोळी अर्पण केली जाते आणि जुन्या वर्षातील वाईट दहन करून नवीन वर्षात सारे गोड, मंगल व्हावे अशी प्रार्थना केली जाते.
पण पुरणपोळी म्हटले की खूप आटापिटा करावा लागतो, ते सारे गृहिणींच्या डोळ्यासमोर येते. डाळ शिजवणे, वाटणे, मग पुरणपोळी बनवणे ही लांबलचक मोठ्ठी प्रक्रिया दिसायला लागते. पण आता हिच पोळी अगदी कमी कष्टात, सुंदर बनवू शकतो. पाहायचे आहे ?
साहित्य :
2 वाट्या कणिक, 2 चमचे मैदा, केशर, अर्धी वाटी दूध, मीठ, पोळी लाटताना लावण्यासाठी अर्धी वाटी तांदुळाची पीठी, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी गुळ, पाव वाटी साखर, 1 चमचा जायफळ आणि वेलची पूड, तेल, तूप.
कृती :
प्रथम डाळ स्वच्छ धुवून कुकर मध्ये दुप्पट पाणी घालून 5-6 शिट्ट्या काढून चांगली शिजवून घ्यावी. तो पर्यंत परातीत कणिक घेऊन त्यात मैदा व चिमूटभर चवीसाठी मीठ घालावे. अर्ध चमाचा केशर गरम करून बारीक करून दुधात विरघळून घेऊन ते पिठात घालून मस्त मळून घ्यावे. लागेल तसे पाणी घालून तेलाचा हात लावत सैलसर कणिक भिजवून वरून तेल लावून झाकून ठेवावी. आता डाळ शिजली असेल ती पातेल्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये काढावी म्हणजे सर्व कट म्हणजेच डाळीचे शिजलेले पाणी व्यवस्थित सर्व पातेल्यात जमेल. वर राहिलेली डाळ मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यावी. मग त्यामध्ये गुळ आणि साखर घालून मिक्सर मधून फिरवावे. छान एकत्र झाले की एका कढई मध्ये काढून शिजावावे. हे खूप लवकर शिजते. घट्ट होत आले की त्यात 1 चमचा ठेवावा. तो खाली नं पडता सरळ उभा राहिला की पुरण चांगले तयार झाले असे समाजावे. पूर्वी जास्त पुरण असायचे तेंव्हा उलाथणे उभे राहिले की पुरण तयार झाल्याचे समजायचे. खरे तर मायक्रोवेव्ह असेल तर हे कढईत शिजवण्याचे कष्ट सुद्धा वाचतात.त्यासाठी मिक्सर मध्ये डाळ, साखर, गुळ एकदम बारीक झाले की ओव्हनच्या भांड्यात काढून ते भांडे आधी 3 मिनिटे ठेवून बाहेर काढून पुन्हा 2 मिनिटे ठेवले की खूप सुरेख पुरण विनसायास तयार होते.शिवाय कढई उलथने लागत नाही आणिकष्ट कमी लागतात. हे पुरण तयार झाले की त्यात जायफळ व वेलची पूड घालून एकजीव करावे. थंड झाले की पोळी साठी पुरण तयार होईल.
कणिकसुद्धा आता मस्त भिजलेली असेल. त्यातील मोठ्ठया गोळी एवढी कणिक घेऊन पोळीला बनवताना लावण्यासाठी अर्धी वाटी तांदुळाची पीठी किंवा नसेल तर कणिक घ्यावी त्याच्या बरोबर कणकीची पारी तयार करून घ्यावी. साधारण तेवढाच पुराणाचा उंडा घ्यावा व अगदी अलगदपणे त्यामध्ये घालून हळुवारपणे पोळी लाटून गरम तव्यावर भाजावी. आवडत असेल तर करताना वरून तूप सोडून त्यावर भाजावी म्हणजे जास्त खरपुस व खुशखुशीत होते.
वैशिष्ट्य :
पुरणपोळी अनेकजण अनेक प्रकारे करतात. पण हि काळानुरुप झटपट बनणारी पोळीची रेसिपी आहे.ही पोळी दूध घालून भिजवल्यामुळे एकदम लुसलुशीत होते. केशराचा रंग आणि स्वाद दोन्ही पोळीची लज्जत खूपच वाढवतात. महत्वाचे म्हणजे पुरण सर्व शिजवल्यावर वाटण्यापेक्षा असे बनवल्यामुळे झटपट व कमी कष्टात होते. होळीसाठी अशी केशरी रंगीत पुरणपोळी नक्कीच सर्वाना नक्कीच आवडेल.
सर्वाना होळी शुभेच्छा !

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
