“पाडवा विशेष – फ्रुटखंड”
आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शक्यतो सर्वजण पाडव्याला श्रीखंड किंवा देवाला नैवेद्यासाठी पुरणपोळी असा मेनू करत असतात. श्रीखंड हा तसा सोप्पा पदार्थ आहे आणि बहुतेक सर्वांना आवडते त्यामुळे नेहमी केले जाते, नाहीतर आता बाजारात तर्हेतर्हेची श्रीखंड,आम्रखंड सहज उपलब्ध असतात.
नोकरी करणाऱ्या स्त्रियांना तर हे पदार्थ म्हणजे हुकुमाचा एक्काच असतो म्हणाना! कोणीही कधीही पाहुणे येवोत किंवा सणवार असो, हल्ली बाराही महिने बहुतेकांच्या घरात हे डबे फ्रीझमध्ये असताताच. पण त्यामुळे याचे अप्रूप वाटत नाही किंवा नावीन्य राहिले नाही. पूर्वी सायीचे लावलेले दही खुंटीला टांगून चक्का बनवून जे घरात श्रीखंड बनवले जात होते, त्याची सर कधीच येणार नाही याला, फक्त वेळेला गोड विनासायास खायला मिळते हे मात्र खरे!
पण स्वतः बनवलेल्या कष्टाच्या पदार्थाची चव काही आगळीच असते, हो ना ? सध्या फळे सुद्धा छान मिळतात. त्यामुळे पारम्पारीक श्रीखन्ड न बनवता विविध फळे, ड्रायफ्रुट्स आणि आंबट गोड मधुर चव असलेली थोडीशी वेगळी हेल्दी स्वीट डिश बनवली तर सर्वांना नक्कीच आवडेल. चला मग बनवायला. ..
साहित्य :
अर्धा किलो घट्ट चक्का,1 चमचा लोणी, पाव किलो पिठीसाखर,पावकिलो साखर, वेलदोडे पुड व जायफळ पुड अर्धा चमचा, पाव कप दूध, केशर, सफरचंद, द्राक्षे, चेरी, मोसंबी, पपई, छान पिकलेला गोड अननस, डाळिम्ब सर्व फळे मिळून आपापल्या आवडीनुसार 2 बाऊल , बदाम,काजू,मनुका, पिस्ते सर्व मिळून ड्राय फ्रूट्स पाव बाऊल, बाऊल मध्ये सर्व्ह करताना वगळेपणा किंवा सुंदरता,आकर्षकता वाढवण्यासाठी एक लेअर घातल्यावर थोडेसे लाल रंगीत रोज सिरप घालावे व पुन्हा दुसरा लेअर द्यावा त्यासाठी पाव कप रोज सिरप.
कृती :
प्रथम एका कढई मध्ये साखर घालून ती बुडेल एवढे पाणी घालून गॅस वर पाक करण्यास ठेवावा. साखर पूर्ण विरघळली की आणि बुडबुडे आले की गॅस बंद करावा. मग त्यामध्ये वेलची..जायफळ पुड घालावी. दूध थोडे कोमट करून त्यात केशर काड्या घालव्यात. नंतर चक्का लोणी मिसळुन तारेच्या चाळणी मधून छान फेटून गाळून घ्यावा म्हणजे छान टेक्चर येईल. विकतचा चक्का कधी कधी कमी ओशट असतो, त्यामुळे लोणी घातले की ओशटपणा येतो आणि चवही वाढते. आता पाक थंड झाला असेल. त्यात आधी सफरचन्द, चेरी, अननस या सारख्या घट्ट फळांच्या बारीक फोडी घालून हलवाव्यात नंतर पपई, मोसंबी, आवडत असेल तर किनू, चिक्कू, केळी यांसारखी गोड चवीची फळे घालावीत. पाकात फळे घातल्यामुळे चमक छान येते. नंतर ड्रायफ्रुट्स घालून केशर घातलेले दुध घालुन सर्व व्यवस्थित एकत्र करावे. पाकामुळे श्रीखन्ड थोडे पातळ होण्याची शक्यता असते म्हणुन शेवटी पिठीसाखर घालून पुन्हा सर्व छान एकत्र करावे व सर्व्हिंग बाऊल मध्ये काढून फ्रिज मध्ये थंडगार करून वरुन सजवुन सर्व करावे.
वैशिष्टय :
उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूपच गरज असते .फळे शरीराला थंडावा देतात, गोड रसांमुळे पित्ताचा त्रास होत नाही आणि त्यात विविध प्रकारची व्हिटॅमिन्स असतात जी अत्यंत गुणाकारी लाभदायक असतात. शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फायबर्समुळे पचन क्रिया व्यवस्थित होते. केसांपासून ते त्वचा आणि नखांपर्यंत संपूर्ण आंतरबाह्य शरीरासाठी फळे, दह्यातील व लोण्यातील स्निग्धता,साखरेतील गोडी, ताकद वाढवून एनर्जी मिळण्यासाठी ड्रायफ्रुट्स खूप उपयुक्त आहेत चव सुद्धा एकदम भन्नाट असून नावीन्यपूर्ण डिश बनवल्याचे समाधान आपल्याला तर मिळतेच वर खाणारे सुद्धा समाधानाने वाहवा करतील तो आनंद वेगळाच.रोज सिरप एक वेगळीच गम्मत आणते. शिवाय हे शरीरात थंडावाही आणते. आकर्षक डिश पाहूनच आधी डोळे आणि मग मन सुद्धा तृप्त होते. शिवाय सर्व पौष्टिक असल्यामुळे शरीरासाठी, आरोग्यासाठीही उत्तमच आहे..

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
