Wednesday, February 18, 2026
Homeलेखस्पर्श बोलतात !

स्पर्श बोलतात !

आपल्यावर कधी कधी अशी विचित्र वेळ येते तेव्हा खरेच काय बोलावे, कसे बोलावे हे सुचत नाही. माझ्यासारखा लेखक देखील शब्दांचा भिकारी होतो. अबोल होतो. नव्वदी पार केलेल्या आई वडिलांवर जेव्हा स्वतःच्या तरुण मुलाचे निधन डोळ्यासमोर बघावे लागते, सहन करावे लागते, तेव्हा कोणत्या शब्दात सांत्वन करायचे हे खरेच समजत नाही. आपण शब्द प्रभु वगैरे म्हणून प्रसिद्ध असलो तरी आपली मर्यादा आपल्याला कळते. आपले दुबळेपण आपल्याला जाणवते. ही परिस्थिती सहन करणे, त्यातून जाणे खरेच फार अवघड असते. हे मी अनुभवले आहे.

मृत्यू अटळ आहे, प्रत्येकालाच या जगातून जायचे आहे हे सत्य असले तरी असे कुणाचे चटका लावून मध्येच निघून जाणे आपल्याला अंतर्मुख करते. जीवन क्षणभंगुर तर आहेच, पण ते किती अनिश्चित आहे, असंभवनीय आहे, अन् प्रेडिक्टबल आहे ही जाणीव आपले डोळे उघडते. आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरून चालतो. आखीव रेखीव नियमात बांधलेले आयुष्य आपल्याला अपेक्षित असते. पण प्रत्यक्षात घडते ते वेगळेच.जे आपण कधी कल्पिले नाही, ज्याची संभावना देखील कधी आपल्या डोक्यात आली नाही असे धक्कादायक वास्तव आगंतुक पाहुण्यासारखे आपल्या समोर अचानक उभे ठाकते तेव्हा आपण निशब्द होतो. हतबल होतो. सुन्न झाल्यासारखे फ्रिज होतो जागच्या जागी.

अशा वेळी स्पर्श बोलतात. हातात हात घेऊन बघायचे एकमेकांच्या डोळ्यात. सांगायचे नजरेनेच आपल्या मनातले सारे काही.खांद्यावर डोके ठेवायचे. घट्ट मिठी मारायची. आसवे गळू द्यायची. हुंदके आले तर येऊ द्यायचे. त्यातूनच सारे काही व्यक्त होत जाते. आपल्या भावना पोहोचतात दुसऱ्याच्या अंतरंगापर्यंत. काही न बोलताच. समोरच्याला ही कळते आपली अडचण न बोलण्यामागची. कारण त्यांचीही तीच अवस्था असते त्यावेळी. आपण नव्वदी पार केली. सगळे भोगून झाले. जगून झाले. जायची वेळ आपली. या समोरच्या निश्चल तरुण पोराची नाही. त्याचा अर्धवट संसार, त्याच्या लहान मुलांना छत्र नाहीसे झाल्यावर होणारा भावनिक त्रास, संसाराचा सारीपाट अर्ध्यातच उधळल्यावर होणारी त्याच्या पत्नीची होणारी तारांबळ..
हे सगळे आपण बघत बसायचे..? आतापर्यंत खूप काही केले आपण आपल्या मुलासाठी..जमेल तसे..जमेल त्या परिस्थितीत वाढवले सगळ्यांना.. घ्यायची ती काळजी घेतली. करायची ती सगळी मदत केली. आता डाव खेळायची वेळ त्यांची. आयुष्याची मजा भोगायची त्यांनी.स्वप्न बघायची त्यांनी. आपण अर्धवट सोडलेली कहाणी पूर्ण करायची त्यांनी. अन् हे काय ? तेच मध्येच सोडून जातात आपल्याला.. जायची वेळ तर आपली..

हे सगळे समोरच्याचे दुःख, द्वंद्व बघणे फार कठीण असते. अशा वेळी खरेच शब्द मुके होतात. कंठ दाटून येतो. समोरच्या वृद्ध व्यक्ती इतकेच आपणही आतल्याआत कोसळतो. त्याचे दुःख तेव्हढ्या पुरते आपले होते.ते, आपण समदुःखी होतो. आपण फक्त हातात हात घेतो. खांद्यावर डोके ठेवतो. गळ्यात घट्ट मिठी मारतो. हे सगळे पोहोचते ये हृदयी चे ते हृदयी.. आपण गाळलेले अश्रूही बोलतात. आपले डबडबलेले डोळेही सांगतात सर्व काही कळते समोरच्याला आपली संवेदना, आपले सांत्वन, आपली भावना.. त्यांचे एकटेपण तेवढ्यापुरते आपल्या स्पर्शाने विसरल्या जाते. आहे, आपल्या बरोबर या परिस्थितीतही आपले जवळचे कुणी आहे.. हे आश्वासन त्या घट्ट ओल्या, घामेजल्या स्पर्शातून मिळते. जे हजारो शब्दांच्या कथा कादंबरीतूनही सांगता येणार नाही ते अशा मुक्या स्पर्शातून भरपूर व्यक्त होते.

मी अनुभवले नुकतेच. अशा वेळी स्पर्शच खूप काही बोलून जातात. शब्दांची गरज नसते सांत्वनाला. एक लेखक हतबल, निष्प्रभ, पराजित होतो, जेव्हा अशा प्रसंगी तो शब्दांचा भिकारी होतो !!

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments