Tuesday, June 17, 2025
Homeबातम्या"हटके" गीत रामायण

“हटके” गीत रामायण

कोरोना ने जगभर घरोघरी संकटं आणि दु:खं निर्माण केली. मात्र याच महामारीने पुणे येथील पन्नाशीतील काही स्त्री-पुरुषांना मात्र नवी दिशा, नवी उभारी आणि नवीन कला मिळाली. त्याची ही कथा आहे.

आपण कधी काळी गाऊ आणि सार्वजनिक व्यासपीठावर गीत रामायण यासारखे कठीण शिव धनुष्य उचलू शकू असे त्यांनी स्वप्नात देखील पाहिले नसेल. कोरोनाच्या काळात दुसरे काहीही करता येत नव्हते तेव्हा यांनी एकमेकांच्या नकळत गायन वादन शिकून घेतले. “हटके” नावाच्या संस्थेची स्थापना केली. ही कल्पना देखील “हटके”! हेल्थ एटीट्यूड टेक्नॉलॉजी नॉलेज एंगेजमेंट ही इंग्रजी आद्याक्षरे घेऊन एकत्र जुळवलेले नामकरण. त्यांनी अनेक कल्पक सांस्कृतिक आगळे वेगळे उपक्रम हाती घेतले.

गेल्या जानेवारी महिन्यात “आपण गीत रामायण गाऊ या का ?” असे एकमेकांना विचारणा करण्याइतपत धाडस त्यांच्यात आले. श्री शिरीष कुलकर्णी यांच्या रूपाने त्यांना नेता मिळाला. कुटुंबातील सगळ्यांनी साथ दिली आणि केवळ तीन महिन्यात पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या नव्या वातानुकूलित सभागृहामध्ये दोनशे_ सव्वा दोनशे च्या आसपास आपल्या माहितीतील, नात्यातल्या श्रोत्यांसमोर तीन तासाचा कार्यक्रम मोठ्या आत्मविश्वासाने सादर केला. पहिल्याच प्रयोगात तीन वेळा वन्स मोर मिळाले !

यश म्हणजे किती यश मिळाले असेल ? कुठेही जाहिरात न करता पाठोपाठ गीत रामायणाचे आणखी दोन कार्यक्रम करण्याचे आमंत्रण “हटके”ला मिळाले. एक मंदिरात तर दुसरा मठात. कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता केवळ आपल्या हौसेखातर आपली कला सादर करणे एवढेच मर्यादित उद्दिष्ट होतं. आधुनिक वाल्मिकी ग दि माडगूळकर आणि बाबूजी सुधीर फडके यांना आदरांजली वाहण्यासाठी अंगीकारलेले हे व्रत आहे असं गायक संयोजक निरंजन भिडे यांचं म्हणणं.

“हटके” मध्ये कोणीही औपचारिक शास्त्रोक्त अथवा सुबोध संगीत शिकलेला नाही. बहुतेक सगळे स्वतःशी गुणगुणण्या इतपत किंवा फार तर बाथरूम मध्ये गात असत. आपापल्या कॉलनीच्या गणेश उत्सवात एखादं सिनेमाचं गाणं म्हणणे एवढेच यांच गान कौशल्य. नशीब मात्र असं की त्यांना शिरीष कुलकर्णी यांच्या रूपाने एक अतिशय कल्पक उत्साही आणि धडपड्या माणूस मिळाला.

कोरोनाच्या काळात आपापल्या ऑफिसच्या कामासाठी आणि स्वतःचा वेळ सत्कारणी लागावा यासाठी गुगल ऑनलाइन, मोबाईल फोन, व्हिडिओ, स्काईप कॉन्फरन्स असे अनेकांना आधी शब्दही माहीत नसलेले टेक्निक त्यांना शिकायला मिळाले. त्यात वेगवेगळे प्रयोग करता आले. एकमेकांची ओळख झाल्यानंतर आणखी नवीन प्रयोग करायचे सुचत गेले. पंचवीसेक छोटे मोठे कार्यक्रम तयार झाले. सादर झाले. फेसबुक लाईव्ह देखील केलं.

या पुढचे पाऊल म्हणजे आपण शिकलेल्या गायनाच्या, संगीताच्या कौशल्याचा प्रयोग प्रोफेशनल रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये करण्याचे धाडस आले. काचेच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये हेडफोन लावून करतात हे टीव्हीवर आणि चित्रपटा मध्ये आतापर्यंत लांबूनच पाहिले होते. त्यात आपणच गायकाचा किंवा वादकाचा प्रमुख रोल करतो आहोत हे मोठे थ्रिल यातील प्रत्येकाने अनुभवले.

या सगळ्यासाठी प्रत्येकाला थोडे धन वेचावे लागले हे खरे. परंतु यातील कोणालाही तो काही मोठा प्रॉब्लेम नव्हता. शिवाय त्यातून मिळणारे सुख समाधान एवढे होते की या प्रत्येकाने किंवा त्यांच्या घरच्यांनी कुटुंबीयांनी कोणीही कुरकुर केली नाही.

श्री मोटे काका यांचे या सगळ्या उपक्रमात सगळ्यात मोठे योगदान. ते आकाशवाणी चे मान्यता प्राप्त आर्टिस्ट. स्वतः उत्तम गातात, कार्यक्रम सादर करतात. होतकरू कलाकारांना शिकवतात. हात धरून शिस्तीत तालीम करून घेतात. गीत रामायण त्यांचा देखील वीक पॉईंट. लहान विद्यार्थी असताना पासून आई गीत रामायण चे जेवढे कार्यक्रम गावात होतील ते सर्व स्वतः ऐकायची, आपल्याबरोबर या आपल्या मुलाला घेऊन जायची. तेव्हापासून गीतरामायण त्यांच्या रोमारोमात भिनलेले.

हटकेची ही सगळी मंडळी तयार झाली. मोठे काकांनी थोड्या चाचण्या घेतल्या. कलाकारांची आणि गाण्यांची निवड झाली. मूळच्या गीत रामायण मधील छप्पन पैकी सोळा गाणी निवडली. रोज तालमी संध्याकाळी तीन तीन तास सुरू झाल्या. बघता बघता कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आत्मविश्वास असला तरी या कार्यक्रमाला फक्त नात्यातले, ओळखीतले असेच आमंत्रित केले गेले. पुण्यातल्या टिळक रोडवरच्या न्यू इंग्लिश स्कूल मधल्या गणेश हॉल येथे शुभारंभाचा पहिला कार्यक्रम २६ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी झाला.
टाळ्यांचा गडगडात वन्स मोर्सचे आवाज. हे सगळे यातल्या कोणीही कधीही अनुभवलेले नव्हते. यशस्वी कार्यक्रमाचा वृत्तांत ऐकून पाठोपाठ दोन कार्यक्रम सादर करण्याचे आमंत्रण “हटके” ला मिळाले.

दुसरा पुण्याच्याच सदावर्ते मंदिरात दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी झाला. हा प्रयोग पेशवेक़ालीन इतिहास असलेल्या १८०० वर्षाची परंपरा असलेल्या श्रीराम मंदिरात होता. श्रीराम आणि हनुमान यांचे एकमेकांसमोर देव्हारे असलेले हे आगळे वेगळे देऊळ. यंदा त्यांचे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. गेल्या 75 वर्षात गीत रामायणाचा कार्यक्रम येथे अद्याप झालाच नव्हता. मंदिराचे विश्वस्त आणि नेहमीचे भक्तगण खूप उत्साहित होते. खूप गर्दी झाली. बसायला आणि उभे राहायलाही जागा नव्हती.

तिसरा कार्यक्रम ९-एप्रिल-२०२३ रोजी रामकृष्ण मठ येथे झाला. अवेळी पाऊस पडून, वाहतूक विस्कळीत होऊन देखील ३५० प्रेक्षकांचा हा हॉल तुडुंब भरला होता.

आता आणखी दोन कार्यक्रमांची आमंत्रण आली आहेत. एक वडगाव शेरी येथील आणि दुसरे आयडील कॉलनीत.

“हटके” कलाकार :
सादरकर्ते: अश्विनी आगाशे, अनुराधा गोगटे, राजश्री तेलकर, सुशांत कुलकर्णी, अवनी कणेकल, निरंजन भिडे, अमित खरे – हे सर्व आपापल्या व्यासायिक क्षेत्रात दिग्गज आणिक यशस्वी आहेत ..
अश्विनी आगाशे– यंत्र अभियांत्रिकी शिकून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम
अनुराधा गोगटे : ख्यातनाम ऍलोपॅथिक डॉक्टर
राजश्री तेलकर– आयटी कंपनी मध्ये डोमेन एक्सपर्ट
सुशांत कुलकर्णी- मोठ्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट कंपनीमध्ये कार्यरत.
अवनी कणेकल- सॉफ्टवेअर क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांना संगणक प्रशिक्षण देते.
निरंजन भिडे– दुसऱ्या पिढीतील अभियांत्रिकी उद्योगातील व्यावसायिक.
अमित खरे – एका मोठ्या कंपनीत कार्यरत ..
दोन शिष्य साहिल कुलकर्णी आणि वेदांत वैद्य – ह आयुर्वेदिक डॉक्टर आहेत .. (छोटा अर्णव अमित खरे) साथ सांगत : संवादिनी : अनिल मोटे, तबला : मोहन पारस इतर ताल वाद्ये : रोहन करंदीकर, की-बोर्ड : इरा उतेकर, हर्मोनिका : शिरीष कुलकर्णी, बासरी : अमित

प्रा. डॉ. किरण ठाकूर

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. हटके चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
    कोरोनाच्या काळात सकारात्मक विचारसरणी!

  2. वा वा ,उत्कृष्ठ वाखाणण्यासारखे 👌👍👍👏👏🙏🙏🙏🎉🎉🎉

  3. नेहमीप्रमाणे आनंददायी लेखन वाण्याची
    संधी दिल्याबद्दल धन्यवाद.साधी व सोपी भाषा वापरून वाचकांना बांधून ठेवण्याचा गुण अलिकडे लुप्त होत असतानाे हे लेखन नवपत्रकारांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?