भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मळा पाहायचा असेल तर खरच नागपुरात धम्मचक्र परिवर्तनानिमीत्त हजेरी लावली पाहिजे.
या मळ्यात भारतभरातून लोक येतात. उच्च शिक्षित, शिक्षित, कमी शिकलेला, न शिकलेला, यासह उच्च शासकीय पदस्थ, सर्वच वर्गातील अधिकारी-कर्मचारी, सर्व स्तरातील आंबेडकरी अनुयायी, सर्वच वयोगटातील स्त्री -पुरुष शक्य तो पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन तथागत बुद्धांच्या मार्गाने जाण्याच्या वचनपूर्ती साठी दरवर्षी येतात.
यावर्षी धम्मचक्र परीवर्तनाला 67 वर्ष पुर्ण झाली आहेत. या काळात बुधिस्ट आंबेडकरी समाजाच्या वागण्यात खुप मोठा बदल घडलेला दिसतो. ज्यांना कधीही माणुसकीने वागविले जात नव्हते ते समानतेने वागायचा प्रयत्न करतात. आपल्यापेक्षा कोणाला कमी अथवा मोठे मानीत नाही तर समतेने वागण्याचा प्रयत्न करताना दिसतात. असमानतेचे चटके सोसलेले हे लोक इतरांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतात, असे बहुसंख्य लोकांच्या व्यवहारावरून दिसते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लढा हा समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुतेचा, न्यायाचा होता. तोच लढा पुढे नेण्याचा प्रयत्न आंबेडकरी अनुयायी करताना दिसतो. काही लोक संपूर्ण आयुष्यभर बाबासाहेबांनी केलेले धम्मचक्र परिवर्तनातून स्वीकारलेला धर्म स्वतः आचरणातून इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही लोक बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश घेऊन स्वतः शिकून इतरांना शिक्षणासाठी मदत करताना दिसत आहेत. संघटित होऊन न्यायासाठी संघर्ष करताना दिसत आहेत.
१५ ऑक्टोंबर १९५६ ला दिलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, “जशी काही मडके कच्ची असतात आणि काही मडके पक्की असतात” तसेच या आपल्या समाजातील सर्वच माणसे परिपक्व झालीत का ? तर नाही. तसे कधीही आणि कुठेही होत नाही आणि भूतकाळचे अस्पृश्य आजचे भारतीय संविधानानुसार अनुसूचित जातीत मोडणारे ही सर्वच लोक शिक्षित, परिपक्व झालेली नाहीत. मात्र त्या मार्गावर चालण्याची धडपड जरुर करत असल्याचे जाणवते.
आपला आदर्श हा प्रज्ञेचा सागर उच्च शिक्षित डॉ.बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा या जनसमुदायात आंतरिक हृदयापर्यंत कोरला गेला आहे.
आयुष्य जगत असताना थोडे भान जपण्याचा प्रयत्न होत असताना दिसतो. हा जनसमुदाय जेव्हा दिक्षाभूमीवर एकत्रित येतो तेव्हा कानोसा घेतो कुठे काय सुरू आहे याचा. येथे फुललेल्या पुस्तकांच्या दुकानातून नवीन प्रकाशित झालेली पुस्तके घेतो. अनेक संस्था सकारात्मक काम करीत आहे, त्या बघतो. त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो. धम्माची वाटचालाची गती अनुभवतो आणि “अत्त दिप भव”चा मार्ग स्वीकारतो.

एकीकडे जलशाच्या माध्यमातून समाज जागृती करणाऱ्या अनेक नावाजलेल्या शाहिराचे गाजलेले गाणे येथे नव्या दमाचे शाहीर गाताना दिसतात. त्या दर्दी शाहिरांना दाद देताना दिसतो. भुकेल्याला जेवण आणि तहानलेल्या पाणी देताना अनेक हात पुढे सरसावलेले दिसतात. यात सर्वच वयोगटातील स्त्री- पुरुष दिसतात. लहान मुलांवर अपेक्षितपणे संस्कार होताना दिसतात. अनेक वर्षांनी भेटलेले मित्र-मैत्रिणी, गुरुजनांच्या भेटी येथे होताना दिसतात. आपण अधिक लोकोपयोगी आणि अर्थातच देशोपयोगी कामे केली पाहिजेत असे भान जोपासून पुढचे वर्षभर काम करतात.
याच दीक्षाभूमीवरून प्रेरणा घेऊन समाजपयोगी कार्य करणारे काही वरिष्ठ आंबेडकरी विचारवंत कोरोनाच्या काळात आणि त्यानंतरही वयोमानानुसार दगावलेत त्यांच्या कामांना गती देण्याचा संकल्पही या ठिकाणी घेतला जातो, हे विशेष.
बाबासाहेबाच्या या मळयामध्ये नवीन कोवळी पालवीही आहे. पूर्ण फुललेली तरुण-तरुणीची फौजही आहे आणि वयोमानानुसार जीर्ण झालेली सुखी फुलेही आहेत. पण सर्वांमध्ये प्रेरणा, उत्साह, उमंग प्रचंड आहे. तो केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळेच म्हणूनच आंबेडकरी शाहीर हरिश्चंद्र जाधव म्हणतात म्हणतात तसे
“पहा पहा मंजुळा
हा माझ्या भिमरायाचा मळा,
रानमाळ असता भिमाने
देह इथे झिजवीला !
शिंपडून रक्ताचे पाणी
शिवार हा फुलविला !!
बहरली कणस इमानी माणसं,
नाचतो जोंधळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या
भिमरायाचा मळा…..!!
अगदी शुन्यातून सुरु झालेला हा प्रवास एका शिखरापर्यत्न पोहोचला आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला सकारात्मक आणि विज्ञानवादी विचाराची कास इतर कोणापेक्षाही आंबेडकरी समाजाने अधिक धरलेली आहे. त्यामुळेच हा आंबेडकरी विचाराचा मळा दिवसेंदिवस अधिकच फुलत जाणार आहे.

— लेखन : अंजू निमसरकार
(माहिती अधिकारी, महाराष्ट्र शासन)
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800