आपल्या न्यूज स्टोरी टुडे च्या लेखिका, कवयित्री केरळ मधील पालकाड येथील मनिषा पाटील यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल नुकताच पंढरपूर येथे “हिरकणी पुरस्कार” मिळाला. त्यानिमित्ताने त्यांचे हे मनोगत…
नमस्कार, वाचक हो.
काही व्यक्ती आयुष्यात येण्यास भाग्य लागते म्हणतात आणि ते खरंही आहे..
अशाच आमच्या सर्व हिरकणींच्या जीवनात आलेल्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या – काशीकन्या आदरणीय वनमाला यादवराव पाटील, हिरकणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा या आमच्या वनश्री ताई. हिरकणी साहित्य गौरव समूहाच्या प्रशासिका.
प्रत्येक जिल्ह्यातून हिरकणी शोधून बनवलेला हा समूह. सर्व प्रकारच्या हिरकणी यात आहेत. कमी शिकलेल्या -उच्चशिक्षित, गृहिणी – नोकरदार, खेड्यात- शहरात राहणाऱ्या सर्व प्रकारच्या हिरकणी यात आहेत पण सर्वजणी सारख्याच आहेत.. ही गावची ती लांबची असा भेदभाव, दुजाभाव नाही. सारस्वत म्हणून प्रत्येकीला सारखाच मान इथे दिला जातो. काही चुकले तर चुकही सांगितली जाते आणि ती ही हसत खेळत स्वीकारली.
मनापासून दाद दिल्यामुळे लिखाणास प्रोत्साहन मिळते. याचेच कौतुक करण्यासाठी संस्थेकडून दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एका हिरकणीला, असे ३६ हिरकणीना पुरस्कार दिल्या जातात. पुस्तक प्रकाशन करायचे असेल तर प्रकाशन सोहळा केला जातो. हा पुरस्कार वितरण सोहळा वनश्री ताई स्वखर्चाने, कोणतेही अनुदान न घेता पार पाडतात. या प्रकारे विना अनुदान पार पाडलेली त्यांची कवयित्री संमेलन चार झाली आहेत. २०२० मध्ये कोरोना मुळे होऊ शकले नाही.
या वर्षीचे, २०२१ चे संमेलन पंढरपूरला घेतले ते मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती या दिवशी. ताईंनी भगवतगीतेचे अहिराणी भाषेत भाषांतर केलं आहे. गीता जयंतीचं औचित्य साधून या पुस्तकाचे प्रकाशन व ईतर काही हिरकणीच्या पुस्तकांचे प्रकाशनही याच सुवर्ण दिनी झाले.
संत सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी अध्यक्ष पद स्वीकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रमुख पाहूणे संत सद्गुरु चैतन्य मोरे महाराज, डॉ प्रा सदाशिव सूर्यवंशी सौ डॉ प्रणिता भागीरथ भालके, मा. रवी सोनार, मा. प्रवीण भाकरे आणि सौ. अनुराधा गुंडेवार या सर्वांचे स्वागत समारंभ छान पार पडला. राजश्री ताई, दहीभाते ताईंनी छानपैकी सूत्रसंचालन केले.
सर्व हिरकणींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र याशिवाय पुस्तके आणि छोटी भेट दिली गेली. कार्यक्रमाची सर्व तयारी कविता ताई पुदाले व प्रवीणजी यांनी केली होती.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील हिरकणीचा सत्कार, पुस्तके प्रकाशन मान्यवरांचे लक्षणीय भाषण अशा पद्धतीने अतिशय नियोजन बद्ध हा सोहळा पार पडला.
अजुनही लोकांची अशी मानसिकता आहे की स्त्री एकटी काही करू शकत नाही..
पण मी तर म्हणेन तुम्ही हिरकणी समूह पाहा. हा आमचा समूह म्हणजे one woman show आहे. जो प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800