ऊंच ऊंच त्या डोंगररांगा
अडवीत राही ढग काळे
ऊंचावरुनी झेप घेतसी
धबधब धबधब पोरेबाळे
धुके सारखे झरझर पळते
सवंगडी तो खट्याळ वारा
ऊधळीत आला स्रुष्टीवरती
लावण्याचा अंगारा
जाईजुई निशिगंध मोगरा
व्रुक्षलतिका वयात आल्या
झोंबाझोंबी करीता वारा
सूर छेडीले तारा जुळल्या
मखमल गवताच्या गादीवर
दरी टेकडी निजते सुंदर
वाकवाकुनी पहात राही
ईंद्रधनूची कमान सुंदर
दिशादिशामधी कुठुन दरवळे
सुगंधमय ही जणु कस्तुरी
घेऊनी का कुणी गुलाबदाणी
सिंचन करीते दरीशिखरावरी
– रचना : पांडुरंग कुलकर्णी