जेव्हा लवकर जायचं असत
तेव्हां हमखास उशीर होतो
आणि उशीरा जाऊन चालणार असतं
तिथ खात्रीनं लवकर पोहोचतो
हे असं कां होतं ?
कधी जवळचीच वाट खूप दूरची होते
तर कधी दूरवरची पटकन् संपून जाते
हे असं कां होतं ?
कधी नको असणारी माणसे
नेमकीच समोर येतात
पण हवीशी वाटणारी माणसे
वाट पाहूनही भेटत नसतात
हे असं कां होतं ?
जिथे मान मिळेल असं वाटत असतं
तिथेच घोर अपमान होतो
तर जिथे अवहेलनाच अपेक्षितो
तेथेच कौतुक वाट्यास येतं
हे असं कां होतं ?
कधी गुलाब खुडावयास जावे
तर काटेच हातात येतात
तर काटे बोचण्याच्या अपेक्षेपुढे
मऊ गालिचा अंथरलेला असतो
हे असं कां होत ?
खूप अपेक्षा केली की,
उपेक्षा पदरी येते पण,
निरपेक्षतेला नको एवढे लाभते
मला वाटते हा सारा आशा निराशेचा खेळ
माणसाच्या चित्तवृत्तीला नसतो ताळमेळ
अपेक्षाच केली नाही की,
अपेक्षाभंगाच दुःखच नाही
मग हे असं कां म्हणून
पुसण्याची गरजच नाही
— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800