दधीचीला
मागितली होती तेव्हा
त्यांनी लढायला,
शस्त्रांसाठी त्यांची हाडं
आज मागताहेत
भूखंड करण्यासाठी
रानावनातील झाडं
नागवून त्यांना,
शस्त्र करून त्यांची
लढत असतात ते
सतत,समृद्धीच्या आड
त्यांच्या येणाऱ्या प्रत्येकाशी
निर्दालन करून त्यांचे,
पृथ्वी करायची आहे त्यांना
रानं, वनं मुक्त,
ती कशी पूर्ण सपाट असली
पाहिजे,
कुठुनही कुठपर्यंतही जाणाऱ्या
अनेक पदरी रस्त्यांसाठी
गगनचुंबी इमारतींसाठी
त्यासाठी चालणाऱ्या वेगवेगळ्या उद्योगांसाठी
ती कशी सज्ज असली पाहिजे
त्यांच्या या समृद्धीवताराच्या
काळातील अवतार पूजनासाठी
ताब्यात त्यासाठी हवी ती त्यांना
त्यांच्या आणि त्यांच्याच तेवढ्या
कल्याणासाठी
जगातल्या झाडांनो,
झाडांच्या हाडांनो,
पानांनो, फुलांनो,
पाला पाचोळ्यांनो,
आतातरी एक व्हा
माणसांच्या रक्षणासाठी…
— रचना : श्रीपाद भालचंद्र जोशी. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. 9869484800
