आपल्या अभंगांद्वारे सर्वसामान्यांना जीवनाचे सार, तत्त्वज्ञान, मर्म व वर्म सांगून त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरणाऱ्या व गुरू माऊली संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीप्रमाणे अभंगरुपी गाथेच्या रूपात भक्ती, वैराग्य, सकारात्मकता, वैज्ञानिक दृष्टीकोन, समता, भूतदया तसेच दुःखी, कष्टी, रंजल्या-गांजल्यांची सेवा, ममता व माणुसकी व समदॄष्टी देणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना आज त्यांच्या स्मॗतीदिनानिमित्त, तुकाराम बीजे निमित्त विनम्र अभिवादन !!!!
– संपादक
१. तुकाराम
तुकाराम माझा । आहे जगद्गुरू।।
प्रेमाचा सागरू । संतश्रेष्ठ ।।
निष्काम ती काया । निष्काम ती भक्ती ।।
तीच माझी शक्ती । परिपूर्ण ।।
क्रांतीचे आगर । ज्ञानाचा सागर ।।
मायेची घागर । तुकाराम ।।
अंधश्रद्धेवरी । जोराचा प्रहार ।।
मनाचे ते तार । छेडलिया ।।
सांगितले तुम्ही । गुण अवगुण ।।
ओळखीची खूण । मानवाची ।।
अभंग विपुल । मानवाचा धर्म ।।
जीवनाचे मर्म । कथिलीया ।।
त्याग आणि भक्ती । मानवा भुषणे ।।
नसावी दुषणे । काळजात ।।
अंगिकारा तुम्ही । वैज्ञानिक दृष्टी ।।
वेगळी ती सॄष्टी । दिसे तुम्हां ।।
उपकार खूप । केले आम्हांवर ।।
गाथेचे भांडार । खुले केले ।।
समता ममता । माणुसकी न्यारी ।।
हीच सर्व प्यारी । विठ्ठलाला ।।
— रचना : प्रा. मोहन काळे. अकोला
२. वंदु तुकोबा
तुकाराम गुरु झाले
झाले शिवराय शिष्य
स्वराज्याचा पाया झाले तुकाराम
स्वराज्यात शिवराय झाले शिष्य ॥१॥
अज्ञान, अंधश्रध्दा, आळस
दुर केले अभंगातुन
आम्हा कळले का तुकाराम
प्रबोधन केले अंभागातुन ॥२॥
भक्तीचा खरा अर्थ सांगितला
अंधश्रध्देवर प्रहार केला
पर्यावरण प्रेमी झाले तुकाराम
अज्ञानावर वार केला ॥३॥
जगदगुरु तुकोबाराय झाले वैकुंठवासी
जगण्याचा पाया सांगितला त्यांनी
केले प्रबोधन जनमाणसांचे
खरा भक्ती मार्ग दाखविला त्यांनी ॥४॥
— रचना : पंकज काटकर. काटी, जि.धाराशिव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800