Saturday, November 2, 2024
Homeलेखसाने गुरुजी : परिचित अपरिचित

साने गुरुजी : परिचित अपरिचित

भाग – ६ : “आंतर भारती

स्वातंत्र्य लढ्यादरम्यान १९३० च्या आसपास ब्रिटीश सरकारने साने गुरुजींना अटक करून धुळ्याच्या तुरुंगात डांबले. तेथून लवकरच त्यांना दक्षिणेत त्रिचनापल्लीच्या तुरुंगात हलवण्यात आले. तेथे वेगवेगळ्या प्रकृतीचे – प्रांताचे – भाषांचे सत्याग्रही एकत्र होते. याच तुरुंगात साने गुरुजींना आंतर भारतीची कल्पना सुचली.
“अविभक्तं विभक्तेषु “ हा तर गुरुजींचा स्थायीभाव. जेथे जेथे त्यांना भेद दिसे, तेथे तेथे तो मिटावा – पुसला जावा म्हणून त्यांचा प्रयत्न असे. “मी” आणि “माझे” या भावनेच्या कात्रीने जीवनाचे सुंदर महावस्त्र कापण्याचा अविवेक माणसाने करू नये, ही गुरुजींची तळमळ !

जातीयतेप्रमाणेच प्रांतीयताही गुरुजीना खपायची नाही. परंतु भाषा भिन्नतेमुळे लोकांचा आपापसात परिचय होत नाही आणि या अपरिचयामुळे एकमेकांविषयी भीती आणि अप्रीती फोफावत जाते. द्वेष मत्सर निर्माण होतो. प्रांतीयतेचे हे विष नवजात स्वातंत्र्याला तसेच लोकशाहीला शाप तर ठरणार नाही नां ? असे भय त्यांना वाटे. सानेगुरुजी म्हणत, “परस्पर प्रांतात सदभाव आणि विश्वास असला तरच भारत सामर्थ्यसंपन्न व समृद्ध होईल. जर एकमेकांच्या भाषा, रीतीरिवाज समजले, परस्पर परिचय वाढला तरच ह्या विविधतेमधील ऐक्य अनुभवण्याची शक्ती जनसामान्यात येईल.”

आंतर भारतीसाठी व्यापक आवाहन करावे, म्हणून साने गुरुजींनी पुण्याच्या साहित्य संमेलनाला जायचे ठरवले, तेंव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. आंतर भारती संस्था स्थापण्याचे साने गुरुजींचे स्वप्न होते. एक सुंदरशी जागा असावी, तेथे भारतातील सर्व प्रांतांमधून आलेले साहित्यिक, प्राध्यापक प्रांतीय भाषेतील असतील. त्या सर्वांना राष्ट्रभाषा हिंदी ज्ञात असावी. सर्व प्रादेशिक भाषांतील साहित्य तेथे राहील. संस्थेला जोडून महाविद्यालय असेल. शेती, हस्तोद्योग, व्यवसाय प्रशिक्षण असेल. भारतातील सर्व प्रादेशिक भाषा शिकवण्याची सोय तेथे असावी. विद्यार्थ्यांच्या कानावर सर्व भाषा पडतील. इतर भाषांमधून मासिके, पुस्तके प्रकाशित करून सर्वांना सकल भारताची ओळख करून देता येईल. केवळ भाषांचा अभ्यास हेच काही आंतर भारती संस्थेचे ध्येय नसेल. तेथे दुसऱ्याही चळवळी जोडल्या जातील. गुरुजी म्हणत “राष्ट्राचे महान ऐक्य जीवनात अनुभवण्याचे मंगल प्रयत्न होवोत.”

आज धुळ्याला आंतर भारती अध्ययन – अनुसंधान केंद्र कार्यरत आहे. कोकणात, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे भव्य असे “साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक” आहे. तेथून आंतर भारतीचे गुरुजींचे स्वप्न साकारत आहे. आंतर भारती अनुवाद सुविधा केंद्र विविध प्रादेशिक भाषांतील उत्तमोत्तम साहित्य मराठीत अनुवादित करून प्रकाशित करून साहित्य क्षेत्रात अनमोल योगदान देत आहे.

पत्रकार, संपादक, लेखक, अनुवादक ,साने गुरुजींवर तरुणपणी न्यू पुना कॉलेज मध्ये शिकत असतांना त्यांचे प्राध्यापक लक्ष्मणशास्त्री लेले, भिडे मास्तर, तसेच प्रतिभावान प्रख्यात साहित्यिक ना.सी.फडके यांचे संस्कार झाले. फ्रेंच राज्य क्रांतीत स्वातंत्र्यासाठी झगडणारा फ्रेंच लेखक थॉमस पेन यांच्या “मानवी हक्क” या पुस्तकातील स्वातंत्र्याचे विचार आणि पददलितांसाठी झोकून देऊन काम करण्याची त्याची वृत्ती, बेंजामिन फ्रँकलिन या अमेरिकन लेखकाच्या पुस्तकातील स्वातंत्र्याच्या विचारांचा पगडा गुरुजींच्या विचारांवर व लेखनावर झाला. थोर कादंबरीकार हरी नारायण आपटे पुणे महापालिकेचे जवळ जवळ २० वर्षे अध्यक्ष होते. निरक्षरता निर्मुलनासाठी पुण्यामध्ये साक्षर आणि निरक्षर लोकांची खानेसुमारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या त्यांच्या अभियानात सानेगुरुजी आणि त्यांचा मित्र राम यांनी स्वयंसेवक म्हणून मोठे योगदान दिले आणि तरुणवयात मोलाचा अनुभव त्याना मिळाला. हा शाळकरी वयांत मिळालेला समाजकार्याचा कार्यानुभव होता.

सानेगुरुजी एक सिद्धहस्त पत्रकार होते, पत्रकारितेतूनच त्यांचे साहित्य निर्माण झाले. अमळनेरला प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असताना सानेगुरुजी विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित वार्तापत्र लिहित असत जेणेकरून विद्यार्थ्यांना जगातील घडामोडी समजाव्या, तसेच बालमनावर राष्ट्रीय विचार बिंबवले जावे. पहाटे ४ ते ५ या वेळेत वार्तापत्राचे एकटाकी लिखाण करत. सुंदर हस्ताक्षरातील ते वार्तापत्र देश विदेशच्या वृत्तांनी भरलेले आणि अर्थपूर्ण सुभाषितांनी नटलेले असे. मुलाना विश्वदर्शन घडवीत असे. जणू बालवयातच मुलांना ज्ञानाबरोबरच पत्रकारितेची ओळख व्हावी हाच उद्देश गुरुजींचा असावा !.

त्याच काळात साधारण १९२८-२९ दरम्यान “विद्यार्थी” या मासिकाची संपादकीय जबाबदारी सानेगुरुजींनी जवळ जवळ एक ते दीड वर्ष सांभाळली, या मासिकातील लेखांमधून ‘निबंध’ कसा लिहावा याचा वस्तुपाठच गुरुनींनी आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना दिला.

पुढे स्वातंत्र्यलढयात १९३७-३८ दरम्यान गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी, कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी “कॉंग्रेस” साप्ताहिक सुरु केले. या साप्ताहिकातून मुख्यत्वे जातिभेद, अस्पृश्यता, द्वेष, हिंसा, दुष्टरूढी हे सर्व गाडून टाकण्यासाठी सानेगुरुजींची लेखणी धारदार तलवारीच्या पात्यासारखी चालली. जेमतेम दोन वर्षातच दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना कॉंग्रेस साप्ताहिक सलू लागले आणि त्यावर बंदी आणली गेली.

कॉंग्रेस साप्ताहिक बंद झाल्यावर काही काळ सत्याग्रह, चलेजाव आंदोलन, अटक आणि तुरुंगवासात गेला.
याच काळात राष्ट्र सेवा दलासाठी गुरुजींनी अनेक स्फूर्तीगीते लिहिली. लोकांच्या हृदयातील राष्ट्रप्रेमाच्या भावना साने गुरुजींच्या शब्दात साकार होऊ लागल्या. ही गाणी खानदेशात सगळीकडे घुमू लागली. वाऱ्याच्या वेगाने ती गाणी महाराष्ट्रभर पोचली आणि सर्वमुखी झाली. श्रमांच्या घामाने पिक फुलवणाऱ्या मेहनती शेतकऱ्यांचे आणि कष्टकरी कामगारांचे कैवारी सानेगुरुजी वेळप्रसंगी त्यांच्या हक्कांसाठी प्राणपणाने लढायला तयार असत. बळीराजाचे – कष्टकऱ्यांचे हक्क – अधिकार जपणारे राज्य यावे हे त्यांचे स्वप्न होते. गुरुजींच्या भावना व्यक्त करणारी अनेक प्रसिद्ध गीते आजही स्फुर्तीगीते म्हणून लोकप्रिय आहेत. “उठू दे देश पेटू दे देश“ तसेच “आता उठवू सारे रान, आतां पेटवू सारे रान“ “बलसागर भारत होवो “ इत्यादी. “बलसागर भारत” या नांवाने देशभक्तीपर गीतांचा संग्रह प्रकाशित झाला आहे.

महात्मा गांधींच्या हत्येनंतर सानेगुरुजी अत्यंत व्यतिथ झाले, त्यांनी १ फेब्रुवारी १९४७ पासून ११ दिवस अन्नत्याग केला. याकाळात त्यांनी “कर्तव्य” या सायंदैनिकाचे प्रकाशन सुरु केले, कर्तव्याच्या पहिल्या अंकात गुरुजींनी लिहिले “ महात्माजींच्या पूज्य स्मृतीस स्मरून हे कर्तव्य दैनिक जातीयवादी विचार नष्ट करून लोकशाही समाजवादी विचारांचा अखंड पाऊस पाडील.” दुर्दैवाने आर्थिक चणचणीमुळे कर्तव्य तीन चार महिन्यातच बंद पडले.

स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या वर्धापन दिनी , १५ ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजींनी “साधना” प्रकाशनाची स्थापना केली त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. साधनाची अनेक प्रकाशने जगभर वाचकांना वाचनाचा आनंद देत आहेत. आंतर भारतीची कल्पना साकारण्यात आणि प्रादेशिक भाषा संवर्धन तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यात साधना प्रकाशनाचे मोठे योगदान आहे. “ साधनेची कहाणी आणि पापणीत पाणी ” या लेखात कविवर्य प्रा. वसंत बापट लिहितात ,
“ सानेगुरुजी म्हणजे अहिंसेचे चिलखत चढवलेला एक योद्धा ! अहिंसा – सत्य – अस्तेय – ब्रम्हचर्य – असंग्रह – शरीरश्रम – अस्वाद – सर्वत्र भयवर्जन – सर्वधर्मी समानत्व – स्वदेशी – स्पर्शभावना या एकादश व्रतांचा मनोभावे स्वीकार केलेला बापुजींच्या स्वातंत्र्याचा सच्चा शिपाई ! दोन्ही हातांत पट्टे घेऊन “मारिता मारिता मरावे” या निश्चयाने अन्यायांशी सतत लढत राहिलेला हा शूर सैनिक. भाषण आणि लेखन (वाणी आणि लेखणी) या दोन शास्त्रांनी प्राणपणाने सानेगुरुजींनी आयुष्यभर झुंज दिली. आपल्या जीवनाचा हा मार्ग गुरुजींनी पहिल्यापासूनच निश्चित केलेला होता ”.

सानेगुरुजी एक कसलेले अनुवादक होते त्यांनी पंडित नेहरूंच्या “ Discovery of India “ चा “ मानवजातीची कथा “ आणि कृष्णा हाथीसिंग यांच्या “ With No Regrets “ चा “ ना खंत,ना खेद “ अशा दोन ग्रंथांचा उत्कृष्ठ अनुवाद केला आहे. तसेच “ कुरल ” या तमिळ ग्रंथाचा अनुवाद केला, या ग्रंथात १३३० कविता आहेत. त्याचबरोबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या “ Kalki or the Future of Civilization “ या ग्रंथाचा “ संकृतीचे भवितव्य “ या नांवाने अनुवाद प्रसिद्ध केला. लिओ टोलस्टोय च्या “ What is Art ? “ या ग्रंथाचा अनुवाद धुळ्याच्या तुरुंगात असताना केला. प्रकाशनातून, लेखनातून मिळणारे उत्पन्न गुरुजींनी नेहमीच राष्ट्रकार्यासाठी वापरलं, दुर्दैवाने अनेक प्रकाशकांनी त्यांना हातोहात गंडवलं. कॉपी राईट लिहून घेतले, मानधन दिलच नाही. प्रकाशकांनी साने गुरुजींच्या नावावर खूप कमाई केली. गुरुजी खऱ्या अर्थाने संत वृत्तीचे होते. त्यांनी कधी कोणाला मागितलं नाही ते आयुष्यभर देतच राहिले.

२४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० असं अवघं पन्नास वर्षाच आयुष्य लाभलेल्या या आधुनिक संताने सव्वाशेहून अधिक पुस्तकांचे लेखन केले. असंख्य कथा, लघुकथा, गोष्टी, कादंबऱ्या, निबंध, ललितलेख, परदेशी भाषेतील कथा कादंबऱ्यांचे अनुवाद अशा विपुल साहित्याची निर्मिती केली. न खाता पिता, कोणाशी एक शब्दही न बोलता, रात्रीचा दिवस करून काही पुस्तके तर एकटाकी लिहून पूर्ण केली आहेत. अनेक महान व्यक्तींची चरित्रेही गुरुजींनी लिहिली. यातील अधिकतर लेखन त्यांनी तुरुंगवासात असतांना केले. सानेगुरुजी मृत्यूनंतरही त्यांच्या साहित्यातून जीवंत राहिले, अजरामर झाले. म्हणून म्हणावसं वाटतं “ झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच !”
क्रमशः

आशा कुलकर्णी

— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आंतरभारतीच्या माध्यमातून साने गुरुजींनी राष्ट्रीय एकात्मतेचे महान कार्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments