आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त चित्रपट निर्माते आणि संकलक श्री. विनोद गणात्रा यांना दक्षिण आफ्रिकेचा प्रतिष्ठीत असा नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे. बाल चित्रटांसाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
‘अल्प परिचय’ :-
मी १९८६ ते १९९१ या कालावधीत मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत असताना श्री विनोद गणात्रा यांच्याशी माझा नियमित संबंध येत असे. आपल्या कामात अतिशय कुशल, कामाप्रतीची अतोनात निष्ठा, हसतमुखपणा, निगर्वी स्वभाव, मदतीला तत्पर असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. ते स्वतः गुजराती असले तरी मराठी भाषा उत्कृष्ट बोलतात. मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे आणि गुजराती असल्यामुळे तर गुजरातीत पारंगत आहेतच.
श्री गणात्रा १९८२ पासून चित्रपट आणि दुरदर्शन कार्यक्रम निर्मितीशी संबधित आहेत. त्यांनी आता पर्यंत ४०० हून अधिक माहितीपट आणि दूरचित्रवाणी वृत्तांताचे दिग्दर्शन केले आहे. तर बाल आणि युवकांसाठी मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतून २५ टिव्ही कार्यक्रमांची निर्मिती केली आहे.
श्री. गणात्रा यांचा हेडा-होडा (आंधळा उंट) हा चित्रपट आतापर्यंत ५८ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा “लुक्काचूप्पी” हा चित्रपट लडाख येथे सर्वोच्च उंच ठिकाणी पूर्णपणे चित्रित केल्याबद्दल त्याची नोंद लिमका बुक ऑफ वर्ल्ड रिकार्डमध्ये झाली आहे. भारत पाकिस्तान सीमा प्रश्नावर आधारित त्यांचा गुजराती चित्रपट २६ व्या शिकागो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला आहे.
श्री गणात्रा स्वतःच्या कामाबरोबरच चित्रपट आणि टीव्ही विषयक वेगवेगळ्या उपक्रमात सातत्याने सहभागी होत आले आहेत. त्यामुळे त्यांचे विश्व दिवसेंदिवस विस्तारत गेले आहेत.
अहमदाबाद आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचे ते संस्थापक संचालक तसेच वर्ल्ड किंड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक आहेत.
जगभर प्रवास केलेले, श्री. गणात्रा हे एकमेव भारतीय चित्रपट निर्माते आहेत की, ज्यांनी गेल्या ३० वर्षांत १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरी म्हणून काम पाहिले आहे.
पुरस्कार :-
श्री. विनोद गणात्रा यांना आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे ३६ पुरस्कार मिळाले आहेत. यात त्यांनी दुरदर्शनसाठी निर्माण केलेल्या “बैगंण राजा” या कार्यक्रमाबद्दल “जानकीनाथ गौर पुरस्कार” आणि द असोसिएशन ऑफ फिल्म अँड व्हिडिओ एडिटर्स तर्फ देण्यात येणाऱ्या “दादासाहेब फाळके जीवन गौरव” या पुरस्कारांचा समावेश आहे.
श्री. गणात्रा यांना त्यांच्या ‘हरुन -अरुन’ या गुजराती चित्रपटाबद्दल लिव उलमन शांतता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत.
अशा या चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रासाठी आयुष्य वेचित असलेल्या श्री विनोद गणात्रा यांचे न्युज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
श्री विनोद गणात्रा यांचे अभिनंदन. भुजबळ आपणास धन्यवाद.. गणात्रा यांचा चांगला परिचय करुन दिल्याबद्दल.