Friday, December 6, 2024
Homeलेखबालपण हरवलंय का ?

बालपण हरवलंय का ?

“बाळा जो जो रे !” अशी अंगाई गीते गात आपल्या बाळांना जोजावणाऱ्या मातांची पिढी केव्हाच काळाच्या पडद्याआड गेली आणि त्या मातांना “आई, तुला दाखवू का बाबा होऊन ?” असे म्हणत लवकर मोठे होण्याची आस असलेली आमची पिढीसुद्धा आता सत्तरीत पोहोचली !
आमच्या काळात “मुलांनी फक्त अभ्यास एके अभ्यास करून, शिकून सवरून मोठे व्हावे!” हीच आई-वडिलांची धारणा होती. शालेय शिक्षणाच्या जोडीला इतर छंद, कला, वगैरे जोपासणे हा वेळेचा दुरूपयोग वाटत होता. “गावस्कर जन्माला यावा, पण शेजारच्या घरी !” कारण माझ्या मुलाने दिवसभर अभ्यास करून डाॅक्टर, इंजिनियर व्हावे, हीच मनोकामना बाळगून आमचे पालक रात्रंदिवस मेहनत करत होते.
पुढे काळ पालटला, आम्ही पालक बनलो; आणि आमच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा-आकांक्षा आमच्या मुलांवर लादत, त्यांना शिक्षण देण्याबरोबरच अनेक कला, क्रीडा शिकवून त्यांच्या मनासारखे करू देत, हा घोष करत राहिलो.

पण झाले उलटेच! मुलांवर एकाच वेळेस अभ्यास करून संगीत, नृत्य, चित्रकला , वादन कला, मैदानी खेळ, असले नाना प्रकार शिकण्याची बंधने आली. त्यांचा वेळ त्यांच्या मर्जीने घालवण्याची मुभाच राहिली नाही. कधी हा क्लास, तर कधी तो क्लास,असे अभ्यासाचे वाढते प्रेशर घेऊन जगत राहिली. कारण आम्हाला आमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवायचेच होते ! त्यासाठी लागेल तो खर्च करायला आणि पडेल ती मेहनत करायला आमची पिढी तयार होती, पण आमच्या मुलांनी परदेशवारी करावी, हीच आमची मनीमानसी इच्छा होती. ह्यातली काही मुले परदेशात जाऊन तिथेच स्थायिक झाली, आणि काही हे जमलं नाही, म्हणून निराशेच्या भोवऱ्यात अडकून भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक प्रगतीवर ताशेरे झाडत, इथेच धुसफुसत राहिले.

ही पिढी आता चाळीस ते पन्नाशीचे अंतर चालून स्वतः पालक बनली आहे. आजी- आजोबा झालेल्या आमच्या पिढीने कुटुंबात बॅक सीट घेतली असून गाडीची चाके मुलांच्या, सुनांच्या हातात दिलेली आहेत. आता सध्याच्या दोन-अडीच वर्षांपासून ते सतरा-अठरा वयापर्यंतच्या बालकांना वळण लावणे, शिस्त लावणे किंवा मुक्त संचार करू देणे, हे निर्णय आमची मुले व त्यांचे समवयस्क करत आहेत.

इथे आधी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेत स्थायिक झालेले उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना तिथल्या “सिस्टीम” मध्ये आवश्यक असे वाढवत असतानाच “इंडियन कल्चर” शिकवण्याचा, द्राविडी प्राणायाम करताना दिसत आहेत. मग तिथल्या शाळेत शिकत असतानाच, ती मुलं “रामरक्षा” किंवा “गणपती स्तोत्र” कशी घडाघड पाठ म्हणून दाखवतात, ह्याचे व्हिडिओज व्हायरल होतात, आणि आमच्या वयाचे आजी-आजोबाच आमच्या मित्रपरिवारात आमची नातवंडे परदेशात जन्माला येऊन सुद्धा कशी आपली संस्कृती जपून ठेवतात, ह्याचे कौतुक सांगत आपलीच पाठ थोपटत राहातात. म्हणजे ह्या मुलांना परदेशाचे नागरिकत्व मिळावे, म्हणून त्यांचे जन्म सुद्धा भारतात होऊ न देणारे पालक, त्यांच्यावर भारतीय संस्कार करून त्यांना आपली पाळेमुळे इथेच राखून ठेवण्याची कसरत करायला भाग पाडतात! कशाला हा अट्टाहास? मुलांना आपल्या वयाला आणि भोवतालच्या परिस्थितीला साजेसे वागण्याची मुभा द्याना !

ह्या उलट भारतात राहाणारे पालक आपल्या मुलांना अल्ट्रा मॉडर्न बनवण्याच्या मागे लागून त्यांच्यावर अमेरिकन संस्कार करण्याची धडपड करत राहतात. इंटरनॅशनल शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्यासाठी लाखोंच्या घरात डोनेशन आणि इतर शैक्षणिक खर्च करून मुलांना तत्सम उच्चभ्रू समाजाच्या मुलांमध्ये वावरण्यास योग्य बनवणे, मग त्याला साजेसे झुंबा, योगा, कराटे आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावणे, इथून येताजाताना मुले दमली म्हणून कधी बर्गर, कधी आईस्क्रीम, अशा छोट्यामोठ्या पार्ट्या आणि त्यातून मैत्री जमवलेल्या मुलांच्या बर्थ डे पार्टीज म्हणजे एखादे मोठे हाॅटेल,नाहीतर रिसॉर्ट बुक करुन, मुलांना डेक वर स्वच्छंद नाचू देणे ! एरवी कदाचित नातेवाईकांकडे एखादे फंक्शन असल्यास आपल्या ऑफिसच्या कामाचे किंवा मुलांच्या परीक्षांचे निमित्त करून तेथे जाणे टाळले जाईलही, परंतु मुलांच्या मित्र मंडळींच्या ह्या पार्ट्या चुकवणे म्हणजे मोठाच अपराध ! मग ह्या पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अगदी पाचसहा वर्षांची मुले असोत की नव्याने तारुण्य अंगावर पांघरायला लागलेली किशोरवयीन मुले असोत, त्यांना प्रत्येक पार्टीला नवीन कपडे हवेत, पार्लरमध्ये जाऊन मेकअप हवे आणि हातात नोटांचे बंडलही हवे ! महिन्यातून एकदा पन्नास-शंभर रुपये पाॅकेटमनी मिळवून धन्यता मानणारे आणि त्याचा वापर शाळेत कधी कॅन्टीन मध्ये खाणे किंवा कधीतरी वर्षाकाठी एकदोन वेळा, पालकांच्या पूर्वपरवानगीने, एकत्र हाॅटेलात जाऊन डोसा खाऊन येणारी आजच्या पालकांची पिढी आता आपल्या मुलांवर सढळ हाताने पैसा खर्च करताना दिसते. पण हा पैसा येतो कुठून ? म्हणजे त्यासाठी पालक आपल्या जीवाचा आटापिटा करत रात्रंदिवस राबताना दिसतात. मग अशा थकलेल्या पालकांचा ना मुलांना प्रेमळ सहवास लाभतो, ना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन! अशा वातावरणात वाढत असलेली मुले आई-वडिलांच्या मायेला पारखी होऊन बाहेरच्या जगात आपले मन रमवण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यामध्ये चूक कोणाची ? सुदैवाने काही मुलांना आजी-आजोबांचे सानिध्य लाभते आणि घरात जिव्हाळा मिळतो, पण जास्तीत जास्त मुले पाळणाघरात मोठी होत असतात आणि त्यालाच आपले विश्व बनवतात !

बरं, हे काही फक्त उच्च वर्गीय समाजाचे चित्र नाही. चाळीत किंवा त्याहून छोट्या घरात राहून लोकांच्या घरी मोलमजुरी करणाऱ्या आया आपल्या मुलांना तरी चांगले शिक्षण घेऊन पुढचे जीवन सुखकर व्हावे, असा विचार करून अशाच प्रकारच्या जीवन शर्यतीत उतरवतात. त्यांच्या शाळा वेगळ्या, माध्यमे वेगळी, पण आयुष्यात पुढे जाण्याची शर्यत हीच; आणि त्यामध्ये भरडली जाणारी मुलेही तीच, तशीच! माझी मोलकरीण मुलाला इंग्लिश मीडियम शाळेत शिकवण्यासाठी ट्युशन्स लावते, आणि त्यासाठी लागणारे पैसे कमावण्यासाठी दोनचार घरी जास्तीची कामे पकडते, तेव्हा आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घरात एकटे ठेवून आणि बाहेर कुठे जाऊ नये, म्हणून हातात मोबाईलवर एखादा शो लावून देते, तेव्हाच तिच्या घरात चार पैसे खुळखुळतात !
हे आजच्या सामाजिक जीवनाचे वास्तव आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. मुलांना जीवनाच्या स्पर्धेत पुढे जायचे असेल, तर आपले बालपण बासनात गुंडाळून ठेवून, जगाबरोबर चालत राहावेच लागेल! जग बदलत जाईल, तसतसे बदलत जाणेही अपरिहार्य आहे.

आमच्या लहानपणी सहा वर्षांचे झाल्यावर मुलांना शाळेत घातले जायचे, आमच्या मुलांना अडीच ते तीन वर्षांपासून शाळेत प्रवेश घेणे आवश्यक ठरले, आता त्यांची मुले चालता-बोलता येऊ लागताच प्री-स्कुलमध्ये जाणे अपरिहार्य ठरणार आहे. त्यांचे बालपण हरवले, असे म्हणण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास तिथेच फुलणार आहे, फळणार आहे, आणि त्यातूनच एक विकसित मानव बनणार आहे, असा विचार करून हे बदल स्वीकारणे, ह्यालाच “जीवन ऐसे नाव !”

ह्यापुढे जाऊन विचार करताना असे लक्षात येईल की हे फक्त शहरी जीवनाचे चित्रण आहे. किंवा शहरातील उच्च वर्गीय (दारिद्र्य रेषेखालील) समाजाचे चित्रण आहे. आज खेडेगावातील मुलांना किंवा शहरांमध्येही उकिरड्यातून अन्न शोधून काढून पोट भरणाऱ्या मुलांना ह्यापैकी कोणत्या चित्रात बसवता येईल ? ह्या मुलांना शाळा काय, मैदानावरचे खेळ काय, आणि दोन वेळेस पोटभर जेवण मिळणे काय असते, हेच माहिती नाही; त्यांचे बालपण जन्माआधीच हरवलेले आहे. रस्त्यावर कोणीतरी खाऊन टाकलेले उष्टे अन्न चिवडणारी ही बालके असोत, किंवा गरीब मजुरांची मुले असोत; त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हा बालदिनाचा खरा अर्थ आहे. शहरातील किंवा गावातील उच्चभ्रू समाजाच्या मुलांना शाळेत, समाजात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून चॉकलेट्स, फुगे वाटून बालदिवस साजरा होत नाही; खरा बालदिवस साजरा करायचा असेल, तर गावकुसातील ह्या गरीब, उपेक्षित मुलांच्या उद्धाराचा मार्ग मोकळा व्हायला हवा. “इथे बाल कामगार काम करत नाहीत !” असे फलक लावून आतमध्ये उष्ट्या कपबशा, ग्लासेस विसळणा-या मुलांवर एखादी बशी फुटली म्हणून डाफरणारे हाॅटेल मालक अस्तित्वात आहेत, रोजचे वर्तमानपत्र थोडे उशिराने घरात येऊन पोहोचल्यावर ते टाकणाऱ्या शाळकरी मुलाला रागे भरणारे घरमालक अस्तित्वात आहेत, आणि आपल्या मुलांच्या सोबतीला चौदा-पंधरा वर्षांची मुलगी कामाला ठेवून, तिच्याकडून सगळेच घरकाम करून घेणाऱ्या मालकिणी अस्तित्वात आहेत, तोपर्यंत आपल्या देशात बालदिन हा “बालदीन” वाटत राहिल्यास नवल नाही.

ह्या साठी लागणारी समाज जागृती करणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच शासकीय पातळीवर ह्या मुलांच्या भरणपोषणाचे प्रयत्न होणे आवश्यक आहे.बाल कामगार कामावर ठेवू नयेत, हा कायदा झाला; पण त्या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी होण्यासाठी त्याला पूरक असे सामाजिक वातावरण निर्माण करणे, ही शासनाची खरी जबाबदारी आहे. मुलांना घरात खाणेपिणे उपलब्धच नसेल, तर त्यांचे आईवडील त्यांना कोठे चार घास अन्न मिळावे,म्हणून कामावर पाठवणारच ! आवश्यकता आहे, ती मुलांना तशी सामाजिक परिस्थिती निर्माण करून देण्याचा प्रयत्न शासन आणि सामाजिक संस्थांकडून अधिक प्रमाणात आणि जाणीवपूर्वक होण्याची! शाळेत शिकलात, तरच मुलांना अन्न वस्त्र निवारा मिळेल आणि पालकांवर त्यांचा भार येणार नाही, अशी खात्री होईल, तेव्हाच हे पालक मुलांना शाळेत पाठवून प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करतील आणि त्या मुलांचा जीवनस्तर उंचावून त्यांना आनंद मिळेल.ही उकिरड्यावरची मुले जेव्हा “हसरी फुले” होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने बालदिन साजरा होईल. अशा बालकांना मनःपूर्वक शुभेच्छा.

— लेखन : सौ. मृदुला राजे. जमशेदपूर, झारखंड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !