नमस्कार मंडळी.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात गोव्यातील कवयित्री सौ.सुनीता नितीन फडणीस यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. त्यांचे शिक्षण एम्. कॉम, एम् ए. संस्कृत इतके झाले असून त्या संस्कृत शिक्षिका आहेत. संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्या आहेत. विशेष म्हणजे त्या मराठी बरोबर हिंदी आणि संस्कृतमध्ये देखील कविता करतात. सध्या त्यांचा कीर्तनशास्त्राचा अभ्यास सुरू आहे.
आता वाचू या सुनीता फडणीस यांच्या काही कविता….
— संपादक
१. रम्य पहाट
पहाटवेळी पूर्वदिशेला
भास्कर अवचित येई
विहगांची मंजूळ गाणी
मन पुलकित करून जाई
फुलापानांवर दवबिंदुंची
पखरण कोण करूनी जाई
सोनेरी कोमल किरणे पडता
त्या पाचूची गमे नवलाई
सुगंधी कलिका-सुमनांना
मंद पवन हळुवार छेडतो
लताद्रुमांच्या सान डहाळीवर
विसावून खग भासे झुलतो
प्रसन्नशा त्या वातावरणी
उत्साह रोमारोमांत उसळे
ओवी गात कुणी मानिनी
जात्यावरती दळण दळे
कुणी सुवासिनी सडा टाकता
कांकण किणकिण नाद करी
तिच्या करांनी रेखिता रांगोळी
व्दारी वर्षती मांगल्य-सरी
२. आयुष्याच्या वाटेवरती
आयुष्याच्या वाटेवरती
येतील, जातील सुखदुःखे
सोबत असतील, नसतील तुझ्या
कधी आप्त सोयरे -सख्खे
तरीही तुजला जगायचे
समतोल राखून आयुष्य अख्खे
प्रसंगाला तोंड देऊनी
कर तू आपुली स्थिर मती
चालायचे तुज हसत निरंतर
आयुष्याच्या वाटेवरती
आयुष्याच्या वाटेवरती
येतात नेहमी चढाव-उतार
व्यथित होईल मन कधी
अन् हृदय हे तार-तार
संस्कारांच्या नवनीतातून
संचित केले जे विचार-सार
त्यापासून घेऊन प्रेरणा
साध्य कर मित्रा उत्तम प्रगती
निराश न होता गाठ ध्येय तू
आयुष्याच्या वाटेवरती
३. पाश
गुंत्यात गुंतते नात्यांच्या
राबते जन्म सरे पर्यंत
हाती न गवसते काही
मनी सलते खंत अत्यंत
इच्छा आकांक्षा ठेवते
सदा गाशात गुंडाळून
सरतेशेवटी हात रिता
काही न गवसे धुंडाळून
पिल्ले उंचशी झेप घेती
ज्येष्ठ साथ सोडून जाती
एकटेपण येता शेवटी
विचार मग करिशी चित्ती
जगायचे उरलेच माझे
याचे जागते तेव्हा भान
भयभीत होत मानसी
गळते ते तुझे अवसान
वेळीच जाग सखे तु
घे बाई मोकळा श्वास
जग स्वत:करिता बये
तोडुनीया सर्व.. पाश
४. ऋतु वसंत
काव्यप्रकार – मधुसिंधू
ऋतु वसंत
येतसे बहर
चैतन्य लहर
मन पसंत……..१
रानावनात
लगडे डहाळी
हरखतो माळी
फुलझेल्यात……..२
फुटे अंकुर
पालवी कोमल
विकसित दल
पुष्प प्रचुर ……….३
फाल्गुन मासी
रंगांचा उत्सव
संस्कृती वैभव
हर्ष जनांसी………४
तिथी पावन
चैत्र प्रतिपदा
वैभव संपदा
प्रथा पूजन………….५
गुढ्या तोरणे
उभारिती जन
वर्षारंभ सण
धन्यच म्हणे……….६
रेखिती दारी
सुवासिनी नारी
चैत्रांगण भारी
रंगत न्यारी………..७
ती घरोघर
फुलांच्या स्तबकी
गौराई तबकी
दिसे सुंदर ………….८
गौराई संगे
युवती नटुनी
उद्यानी जाऊनी
पुजनी दंगे…………..९
कैरीची डाळ
पन्हे थंडगार
नैवेद्य अपार
सांजसकाळ………….१०
पानापानांत
कोकिळ कूजन
आनंदित जन
होती मनांत………..११
ऋतूंचा राजा
ऋतूराज खास
त्यात चैत्र मास
बहर ताजा…………१२
होई साजरी
वसंत पंचमी
ती राम नवमी
आनंदसरी………….१३
कुसुमाकर
धरित्रीचे रूप
खुलवीतो खूप
गंध आगर…………१४
ऋतू माधवी
उल्हास हृदयी
काव्य या समयी
रचतो कवी……….१५
गीताग्रंथात
म्हणे भगवान
वसंत महान
ऋतू चक्रात………..१६
रामायणांत
वर्णन अद्भूत
वाल्मिकी उद्धृत
ते करितात…………१७

— रचना : सौ. सुनीता फडणीस. पर्वरी, गोवा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800