नमस्कार मंडळी.
आपण मागील लेखात पाहिले की माझे ट्रेनिंग पूर्ण झाले. 7 दिवस सुट्टी मिळाली. पहिलीच पोस्टींग मुबंई महानगरात झाली. तयारी करून मुंबईच्या गाडीत बसलो. लक्झरी गाडी सकाळी पोहचली.
पण किस्सा असा घडला कि मागे डिकीत ठेवलेली बॅग घ्यायचे विसरले. गाडी निघून गेली. मी हडबडली. लगेच तिकीटा वरील फोन नंबर पाहून विचारून घेतले व पुढील स्टाॅपवर गाडी थांबविण्याची विनंती करून अखेर बॅग ताब्यात घेतली.
पहिलीच पोस्टींग विमानतळ सुरक्षा विभाग येथे झाली होती. तो 1987 चा डिसेंबर चा शेवटचा आठवडा होता. आम्हास रहाण्याकरीता मरोळ ट्रेनिंग स्कूलच्या निवासस्थानी जागा मिळाली. माझी दुसरी एक मैत्रिण सुजाता हिचा भाऊ देखिल आमच्या पुर्वीच्या बॅचचा होता. सुजाताने त्यांची ओळख करून दिली. त्यांनी आम्हाला मदत हवी असेल तर सांगा असे सांगितले. त्याच प्रमाणे माझे गावचे पोतदार साहेब (जे माझे रक्ताच्या नात्याच्या पेक्षाही जास्त आधार दिला ते माझे दादा व वहिनी) यांचेशी संपर्क साधला. तेही मरोळ येथेच रहात होते. वहिनींनी आम्हास काय हवे नको विचारले व एक स्टोव्ह, दोनतीन भांडी, ग्लास असे चहा करण्याइतपत साहित्य दिले व काही गरज लागल्यास घरी येण्यास सांगितले.
माझी मोठी बहिण देखिल दादर येथे रहात होती. त्यांचा देखिल पाठींबा, मदत मिळत होतीच.
आमची नेमणूक विमानतळ सुरक्षा विभाग येथे दाखवून आमचा परिविक्षाधिन कालावधी 6 महिने चालेल नंतर कायम स्वरूपी नोकरी होणार असे समजले.
आमचे पोलीस आयुक्तालय क्राॅफट मार्केट येथे आहे. तसेच परिविक्षाधिन म्हणून वेगवेगळ्या शाखा जसे कि, विषेश शाखा एक, विशेष शाखा 2, त्यांच्या उपशाखा, 2 ,जापु (महिला व लहान मुले कायदे मदत) शाखा, इतर शाखा व दोन महिने पोलिस ठाणे. असा एकंदरीत 6 महिने परिविक्षाधिन कालावधी होता.
मला व इतर दोघींना अंधेरी पोलीस ठाणे येथे 2 महिन्याचा कालावधी मिळाला. तेथे एक अधिकारी मला म्हणाले तुम्ही बी.काॅम. आहात बॅकेंत नोकरी करायची सोडून इकडे कशाला आलात ? असो.
त्या वेळी आम्ही सर्व महिला अधिकारी यांना 2, 3 मिळून एक असे वन रूम किचन निवासस्थान मिळाले. मी संगीता व सुजाता अशा तिघी एकत्र रहात असू. मुंबईत नविन असल्या कारणाने आम्ही सर्व युनिफॉर्मवर लोकलने फिरत होतो. तेंव्हा टी.व्ही. ला “ऊडान” नावाची मालिका सुरू होतो. लोकांना आम्हाला पाहून अप्रूप वाटे. आम्ही नवीन असल्या कारणाने लोकलनी प्रवास करताना आम्हाला फास्ट, स्लो, पटकन लोकल मधून न उतरता येणे व पुढील स्टेशन पर्यंत जावे लागे आदि गंमती जंमती होत असत.
अशा प्रकारे 6 महिने संपले. आमची नेमणूक विमानतळ सुरक्षा विभाग येथेच दाखविली.
विसुवि चे मुख्य ऑफिस सांताक्रूज विमानतळ येथे होते. ड्युटी सांताक्रूज व सहार (आताचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) येथे 12,12 तासांचे दोन दिवसपाळी, दोन रात्रपाळी, दोन दिवस सुट्टी असे शेड्युल असे.
सांताक्रूज विमानतळ देशांतर्गत सेवा असल्याने दिवसा खूप काम असे. आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे पूर्ण रात्रभर विमानांची धुमश्चक्रि असे. आम्हाला प्रामुख्याने महिला प्रवाशांची तपासणी हॅन्डमेटल डिटेक्टर व हाताने करावी लागे. डोअर फेम मेटल डिटेक्टर सुध्दा असे.
एक गोष्ट येथे आवर्जून सांगावी असे वाटते ते म्हणजे विमानतळ सुरक्षा विभाग येथे आमच्या आधी कार्यरत असणार्या सर्व वरिष्ठ महिला अधिकारी यांचे मुळे आम्हाला आधार वाटे. रात्रपाळी करून ॲसिडीटी होई त्याबाबत तसेच तेंव्हा पगार रोखीने मिळे, त्यामुळे बॅकेंत खाते काढण्याबाबत व इतर बाबतीत मदत करीत असत.
त्या दरम्यान 13/9/88 चे रात्रपाळी कर्तव्यात 7 नंबर होल्ड ला असताना एक नायजेरियन महिलेचे प्रोफाईल संशयास्पद वाटल्याने तिचा थोरो चेकअप केला असता तिच्या गुप्तांगाजवळ लपवून ठेवलेली ब्राऊन शुगर मिळून आली. मी वरिष्ठांना रिपोर्ट केला. दरम्यान ती नायजेरियन धिप्पाड महिला, आकांडतांडव करू लागली होती. सोबतचे माझे अधिकारी माझी मस्करी करू लागले. मला म्हणाले, ‘तिच्या पुढे तुम्ही किती छोट्या दिसत आहात, ती तुम्हाला एका हातानी उचलेल.’ थोड्या जुन्या महिला कर्मचारी यांना बोलावून पुरूष अधिकार्या सोबत सहार पो. ठाणे येथे पाठविण्यात आले. ते होते माझे पहिले प्रशंसनिय काम. मला विसुवि, उपायुक्त यांचे ‘Commendatory Note’ प्रशंसा पत्र मिळाले !

– लेखन : सुनिता नाशिककर.
पोलिस उपअधीक्षक, मुंबई .
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
Salute
एका वेगळ्या वाटेवरचा साहसी कष्टमय प्रवास..