मिशन आयएएसच्या प्रगतीमुळे
विकास खारगे समाधानी
शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, त्या दृष्टीने त्यांनी आपल्या करिअरची आखणी करावी या उद्देशाने २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या “मिशन आयएएस” ने केलेली प्रगती पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव श्री विकास खारगे यांनी समाधान व्यक्त केले.
“मिशन आयएएस”चे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे व राज्य समन्वयक देवेंद्र भुजबळ यांनी नुकतीच श्री खारगे यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन मिशनच्या आतापर्यंतच्या वाटचालीची आणि भावी योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आस्थेवाईकपणे सर्व जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. तसेच भावी उपक्रमांसाठी यथोचित सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे श्री विकास खारगे २१ वर्षांपूर्वी यवतमाळचे जिल्हाधिकारी असतांना त्यांच्याच हस्ते “मिशन आयएएस”चा शुभारंभ करण्यात आला होता. यावेळी श्री खारगे यांनी महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी वनीकरणाच्या अनुभवांवर आधारित लिहिलेले
“एक हरित चळवळ” हे पुस्तक, डॉ काठोळे व श्री भुजबळ यांना भेट दिले. तर डॉ काठोळे यांनी “महिला अधिकाऱ्यांच्या यशकथा” हे पुस्तक तर श्री भुजबळ यांनी त्यांचे “समाजभूषण” हे पुस्तक श्री खारगे यांना भेट दिले.
ओमप्रकाश गुप्ता यांची भेट
या भेटीनंतर प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे व श्री देवेंद्र भुजबळ यांनी वित्त विभागाचे प्रधान सचिव (व्यय) यांचीही भेट घेऊन त्यांना मिशनच्या प्रगतीची माहिती दिली. श्री गुप्ता अमरावती जिल्हाधिकारी असताना त्यांचे या मिशनला सहकार्य लाभले होते.
– टीम एनएसटी. 9869484800